मुंबई : आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ५० साखळी सामने झाले आहेत. आणखी २० साखळी सामने होणार आहेत. आतापर्यंत झालेल्या सामन्यांच्या निकालाआधारे गुणतक्त्यात मुंबई इंडियन्स हा संघ पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. यंदा स्पर्धेच्या सुरुवातीला सलग चार सामन्यांत पराभूत झालेल्या मुंबई इंडियन्स नंतर सलग सात सामने जिंकत १४ गुण मिळवले आणि गुणतक्त्यात पहिले स्थान पटकाविले. आता मुंबईचे साखळी फेरीतले फक्त तीन सामने बाकी आहेत. यातील दोन सामने मुंबईतच होणार आहेत. यामुळे आयपीएलमध्ये पुन्हा एकदा मुंबईची स्थिती भक्कम दिसत आहे.
साखळी सामन्यांच्या फेरीतले रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे १० साखळी सामने झाले आहेत. त्यांनी सात सामने जिंकून आणि तीन सामने गमावून गुणतक्त्यात दुसरे स्थान पटकाविले आहे. पंजाब किंग्स संघ आतापर्यंत १० साखळी सामने खेळला आहे. यापैकी ६ सामन्यांत त्यांचा विजय झाला आणि तीन सामन्यांत त्यांचा पराभव झाला आहे. पावसामुळे त्यांचा एक सामना अनिर्णित आहे. यामुळे १३ गुणांसह पंजाब किंग्स गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानी आहे. गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ गुणतक्त्यात अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत. पण दोन्ही संघांचे गुण १२ आहेत. या संघांचे स्थान त्यांच्या धावगतीच्या आधारे निश्चित झाले आहे. गुजरात टायटन्सची धावगती .७४८ आणि दिल्ली कॅपिटल्सची धावगती .३६२ आहे.
लखनऊ सुपर जायंट्स दहा गुणांसह सहाव्या स्थानी आहे. कोलकाता नाईट रायडर्स नऊ गुणंसह सातव्या स्थानी आहे. राजस्थान रॉयल्स सहा गुणांसह आठव्या तर सनरायझर्स हैदराबाद सहा गुणांसह नवव्या स्थानावर आहे. चेन्नई सुपरकिंग्स फक्त चार गुण मिळवल्यामुळे गुणतक्त्यात सर्वात शेवटच्या दहाव्या क्रमांकावर आहे. चेन्नईचे यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपलयात जमा आहे. उर्वरित सामने जिंकले तरी चेन्नईचा संघ पुढल्या फेरीसाठी पात्र ठरण्याची शक्यता नाही.
मुंबई इंडियन्स संघाचे पुढील सामने
६ मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स, वानखेडे स्टेडियम मुंबई
११ मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स, एचपीसीए स्टेडियम धरमशाला
१५ मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, वानखेडे स्टेडियम मुंबई