
मुंबई: हवामान विभागाने राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाकडून पूर्व विदर्भात आज आणि उद्या हलक्या पावसासह जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला आहे. नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ३ मे पर्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे.
नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ३ मे पर्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे.
राज्यातील या भागांत अवकाळी पावसाचा तडाखा
राजस्थानच्या पूर्व भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे विदर्भातून केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे येण्यास सुरुवात
बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणावर राज्याच्या दिशेने येत आहेत. शिवाय स्थानिक पातळीवरील तापमान वाढीमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेतून उंचावर ढगांची निर्मिती होऊन, किमान पुढील चार दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावासमुळं पूर्व विदर्भ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये नागरिकांचा गोंधळ उडू शकतो.
विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी
भंडारा जिल्ह्यात हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला. हा पाऊस धान शेतीसाठी फायदेशीर जरी असला तरी मका, बागायती शेतीसाठी नुकसानकारक आहे. तसेच अमरावती जिल्ह्यातील मोझरी गाव आणि परिसरात गारपिटीचा तडाखा बसला. अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. गोंदिया जिल्ह्यातही विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी झाली. या पावसामुळे धाण, मका, भाजीपाला आणि इतर पिकांना फटका बसला आहे.
तापमानात चढ-उतार
बदललेल्या वातावरणामुळे आज आणि उद्या पूर्व विदर्भातील तापमानात थोडी घट होणार आहे. हवामान विभागाने लोकांना बदलत्या हवामानाचा विचार करून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. या पावसामुळे महाराष्ट्रात आणखीन जास्त उष्णता वाढण्याची शक्यता आहे.