
केदारनाथ : देवभूमी उत्तराखंडमधील केदारनाथ धामचे कपाट विधी पूजनासह आज, शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री पुष्कर सिह धामी यांनी देखील उपस्थित राहून सर्वांना सर्व भक्तांना शुभेच्छा दिल्या.
पुजाऱ्यांनी "ॐ नम् शिवाय" मंत्रोच्चार करत आणि भाविकांच्या बम बम भोले या जयजयकारात आज, शुक्रवारी सकाळी केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. गुरुवारी(दि.१) बाबा केदार यांची पंचमुखी पालखी केदारनाथ धामला पोहचली. केदारनाथाचं दर्शन करण्यासाठी जवळपास १५ हजाराहून अधिक भाविक तिथे दाखल झाले होते. मंदिराचे दरवाजे उघडले तेव्हा भक्तांच्या हर हर महादेवच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला.
१०८ क्विंटल फुलांची सजावट
केदारनाथ मंदिराचे कपाट उघडण्याच्या सोहळ्यासाठी मंदिराला १०८ क्विंटल फुलांनी भव्यप्रकारे सजवण्यात आले होते. गुरुवारी राज्याचे डीजीपी दीपम सेठ आणि अप्पर पोलीस महासंचालक वी मुरूगेशन यांनी श्री बद्रिनाथ आणि केदारनाथ धाम याठिकाणी पाहणी करत सुरक्षा व्यवस्था आणि अन्य तयारीचा आढावा घेतला. यंदा केदारनाथ यात्रेत गर्दीचं नियोजन करण्यासाठी टोकन व्यवस्था लागू करण्यात आली आहे. टोकन काऊंटर वाढवणे, पीए सिस्टममधून भक्तांची माहिती, स्क्रिनवर स्लॉट आणि नंबर जारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एटीएस, पॅरा मिलिट्री दल हेदेखील सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे.
हेलिकॉप्टरमधून भाविकांवर पुष्पवृष्टी
केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याच्या काही वेळ आधी, राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर धामी केदारनाथला पोहोचले. दरवाजे उघडताच, हेलिकॉप्टरमधून भाविकांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी प्रथम दर्शन घेतले. धाममध्ये पंतप्रधान मोदींच्या नावाने पहिली पूजा करण्यात आली.#WATCH | Uttarakhand: Flower petals being showered on the devotees as portals of Shri Kedarnath Dham opened for the devotees today pic.twitter.com/XSrPy0XydI
— ANI (@ANI) May 2, 2025
मोबाईलचा वापर करण्यास मनाई
केदारनाथ यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना गाईडलाईन्स जारी करण्यात आली आहे. केदारनाथ मंदिर परिसरात ३० मीटरमध्ये मोबाईलचा वापर करण्यास मनाई आहे. रिल अथवा फोटो शूट करताना कुणी आढळला तर त्याचा मोबाईल जप्त करण्यात येणार असून ५ हजार रुपये दंडही आकारला जाणार आहे. दरवर्षी हिवाळ्यात होणाऱ्या जोरदार हिमवृष्टीमुळे केदारनाथ मंदिराचे कपाट बंद केले जाते. उन्हाळा सुरू होताच पुन्हा कपाट उघडले जाते.