
अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५१व्या सामन्यात आज गुजरात टायटन्सने सनरायजर्स हैदराबादवर ३८ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात गुजरातने हैदराबादला विजयासाठी २२५ धावांचे आव्हान दिले होते. मात्र हैदराबादला या सामन्यात केवळ १८६ धावाच करता आल्या. गुजरातने हा सामना ३८ धावांनी जिंकला.
पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरातची सुरूवात जबरदस्त राहिली. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी पावरप्लेमध्ये सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांमध्ये ४१ बॉलमध्ये ८७ धावांची भागीदारी केली. स्पिनर जीशान अन्सारीने साई सुदर्शनला बाद करत ही भागीदारी तोडली. सुदर्शनने ९ चौकारांच्या मदतीने २३ बॉलमध्ये ४८ धावा ठोकल्या. सुदर्शन बाद झाल्यानंतर शुभमनने २५ बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.
शुभमन गिल हळू हळू शतकाच्या दिशेने जात होता. मात्र दुर्देवाने हर्षल पटेलच्या थ्रोवर तो रनआऊट झाला. शुभमनने १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३८ बॉलवर ७६ धावा ठोकल्या. शुभमन आणि जोस बटलर यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी झाली. शुभमन बाद झाल्यानंतर बटलरने वॉशिंग्टन सुंदरसोबत मोर्चा सांभाळला. त्याने ३१ बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले.