
मुंबई : भारतात एप्रिल महिन्यात जीएसटी कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढीस जीएसटी कलेक्शनने उच्चांक गाठला आहे. सरकारी आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये वस्तू आणि सेवा कराचे कलेक्शन दरवर्षी वाढत असून ते २.३७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जवळपास १२.६ टक्के इतकी वाढ झाली आहे. याआधी सर्वाधिक जीएसटी कलेक्शन एप्रिल २०२४ मध्ये झाले होते. २.१० लाख कोटी इतके जीएसटी कलेक्शन नोंदवण्यात आले होते. आता हा विक्रमही मोडला आहे. मार्च २०२५मध्ये १.९६ लाख कोटी रुपये जीएसटी कलेक्शन होते.
देशांतर्गत व्यवहारातून जीएसटी महसूल १०.७ टक्के वाढून १.९ लाख कोटी रुपये झाला आहे, तर आयात केलेल्या वस्तूंमधून मिळणारा महसूल २०.८ टक्क्यांनी वाढून ४६ हजार ९१३ कोटी रुपये इतका झाला आहे. मार्च महिन्यात जीएसटी कलेक्शन १.९६ लाख कोटी रुपये होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्च महिन्यात ९.९ टक्के वाढ झाली होती. फेब्रुवारीत गतवर्षीच्या तुलनेत ९.१ टक्क्याच्या वाढीसह १.८३ लाख कोटी रुपये जीएसटी कलेक्शन झाले. जानेवारीतही १२.३ टक्के वाढ झाली होती.
राज्यांमध्ये अरुणाचलमध्ये ६६ टक्के वाढ झाली तर मेघालय, नागालँडमध्ये अनुक्रमे जीएसटी कलेक्शनमध्ये ५० आणि ४२ टक्के इतकी वाढ झाली आहे. हरियाणा, बिहार, गुजरातमध्येही १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दिसून आलीय. तर आंध्र प्रदेश, त्रिपुरा, मिझोराममध्ये मात्र जीएसटी कलेक्शनमध्ये मोठी घसरण झाली आहे. देशात १ जुलै २०१७ रोजी जीएसटी लागू करण्यात आला होता.