
नवी दिल्ली : गंगा एक्सप्रेस-वेवर भारतीय हवाई दलाच्या युद्ध विमानांनी आज (दि २) आपली ताकद दाखवली. उत्तरप्रदेशच्या शाहजहांपूरमधील ३.५ किलोमीटरच्या हवाई पट्टीवर राफेल, मिराज आणि जग्वार यांनी एअर शो सादर केला. या लढाऊ विमानांनी गंगा एक्सप्रेसवेवर 'टच अँड गो' सराव केला. या एअर शोचा उद्देश युद्ध किंवा आपत्तीच्या वेळी या एक्सप्रेसवेचा पर्यायी धावपट्टी म्हणून वापर करणे आहे. याप्रसंगी उत्तरप्रदेशचे अर्थमंत्री सुरेश खन्ना, सहकार राज्यमंत्री जे.पी.एस. राठोड, लोकप्रतिनिधी आणि हवाई दलाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी, शाहजहांपूरमधील गंगा एक्सप्रेसवेवर बांधलेल्या ३.५ किलोमीटर लांबीच्या आधुनिक हवाई पट्टीची पाहणी केली होती. देशातील अशी ही पहिलीच पट्टी असेल जिथे हवाई दलाची लढाऊ विमाने दिवसा आणि रात्री उतरू शकतील. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, धावपट्टीच्या दोन्ही बाजूंना सुमारे २५० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. एअर शोच्या पार्श्वभूमीवर, भारतीय हवाई दलाने ही हवाई पट्टी आपल्या अधिकारक्षेत्रात घेतली आहे. रात्रीच्या वेळी धावपट्टीवर विमान उतरवण्याच्या क्षमतेची चाचणी घेण्यासाठी, दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी एअर शो आयोजित केला जाईल. या शो दरम्यान, चाचणी म्हणून लढाऊ विमाने धावपट्टीवरून एक मीटर उंचीवर उड्डाण करतील आणि त्यानंतर ही विमाने धावपट्टीवर उतरतील आणि नंतर उड्डाण करतील. यानंतर, संध्याकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत पुन्हा हाच सराव केला जाईल आणि सर्व लढाऊ विमाने बरेली येथील हवाई दलाच्या तळावरून येतील.
हा एअर शो सकाळी ११ वाजता होणार होता. विमाने उतरण्यापूर्वी शाहजहांपूरमध्ये वादळासह पाऊस पडला. दाट ढग दाटून आले होते आणि जोरदार वाऱ्यामुळे धुळीचे लोट निर्माण झाले होते. त्यामुळे वायुसेनेचे सराव दुपारी १२ : ३० वाजेच्या सुमाराला झाला. यावेळी लढाऊ विमानांचे लँडिंग पाहण्यासाठी आलेल्या शालेय मुलांमध्ये प्रचंड उत्साह होता.