Friday, May 2, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

Chandrashekhar Bawankule : जातीनिहाय जनगणनेतून प्रत्येक वर्गाला न्याय मिळणार - चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule : जातीनिहाय जनगणनेतून प्रत्येक वर्गाला न्याय मिळणार - चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती : केंद्र शासनाने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रत्येक घटकाचे प्रतिनिधित्व माहिती होण्यास मदत मिळणार आहे. यातून आलेल्या संख्यात्मक आकडेवारीतून त्या-त्या घटकांसाठी विकासात्मक योजना राबविण्यास मदत होईल. यातून मागास वर्गासह प्रत्येक वर्गाला न्याय मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

वरुड तहसील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान घेण्यात आले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार सुधाकर कोहळे, उमेश यावलकर, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार आदी उपस्थित होते.

श्री. बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांचे जीवन सुखकर करण्यात येत आहे. जिवंत सातबारा ही मोहीम राबवून सातबारावरील मृत्यू झालेल्यांची नावे वगळून केवळ जिवंत व्यक्तींच्या नावांचे सातबारे शेतकऱ्यांना घरपोच वितरित करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला पांदण रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यात येत आहे. बंधारे बांधणे, नाला खोलीकरणनातून काढण्यात आलेले गौण खनिज या रस्त्यासाठी उपयोगात आणले जात आहे. शेतकऱ्यांना दुपारी १२ तास वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा फायदा प्रत्येक नागरिकांनी घ्यावा. प्रशासनाने ही त्यांना सहकार्य करून त्यांच्या तक्रारी येणार नाहीत याची काळजी घ्यावी. नागररिकांना शासनाच्या सुविधा मिळण्यास अडचणी येत असल्यास थेट संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार उमेश यावलकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान, मतदान कार्ड वाटप, पीएम किसान सन्मान निधीची वाटप, ट्रॅक्टर वाटप आदी योजनांच्या लाभाचे वाटप करण्यात आले.

Comments
Add Comment