
पुणे: भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना अश्लील मेसेज आणि कॉल करुन त्रास देणाऱ्या, पुण्यातील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तो पंकजा मुंडेंना कॉल आणि मेसेजद्वारे त्रास देत होता.
पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करुन त्रास देणाऱ्या या व्यक्तीचे नाव अमोल काळे असं आहे. अनेक दिवसांपासून तो पंकजा मुंडे यांना कॉल आणि अश्लील मेसेज करून त्रास देत होता. या प्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी बीएनएसच्या कलम ७८ आणि ७९ तसंच आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. सायबर पोलिसांनी पुण्यातील भोसरी पोलिसांच्या मदतीने आरोपी अमोल काळेला अटक केली.
आरोपीला पुण्यातील भोसरी येथून अटक
पंकजा मुंडे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला आणि फोन करणाऱ्याचे ठिकाण शोधले. त्यावेळी अमोल काळे (२५) पुण्यातील भोसरीमध्ये राहत असल्याचे आढळून आले. यानंतर, सायबर पोलिसांनी भोसरी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याला अटक केली. चौकशीत काळेने पंकजा मुंडे यांना फोन केल्याची कबुली दिली. अमोल काळेला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आरोपी हा विद्यार्थी
एका सायबर अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी हा विद्यार्थी आहे आणि त्याने अपशब्द वापरण्यामागील आणि त्रासदायक वर्तनामागील हेतू सध्या तपासला जात आहे. मात्र, त्याला पुण्यातील भोसरी येथून अटक करण्यात आली. आरोपी अमोल काळे हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी आहे.