
मुंबई(सुशील परब): आज जयपूरमध्ये राजस्थान रॉयल विरुद्ध मुंबई इंडियन्सची महत्त्वपूर्ण लढत होत आहे. राजस्थान रॉयल आपल्या घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे त्यांना निश्चितच या गोष्टीचा फायदा होईल. तसेच मागच्या सामन्यात त्यांनी गुजरात टायटन्सचा सहज पराभवही केला होता. गुजरातचे २०९ धावांचे आव्हानही त्यांनी १५.५ षटकात सहज पार केले. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीची ३८ चेंडूत १०१ धावांची झंजावती खेळी व त्याला यशस्वी जयस्वालची मिळालेली अप्रतिम साथ ४० चेंडूत ७० धावा या खेळीमुळे सहज विजय मिळवला.
मुंबई इंडियन्सने सलग पाच विजय मिळविले आहेत. मुंबई इंडियन्सचा फॉर्म पाहता राजस्थानला कडवी झुंज द्यावी लागेल. मुंबईच्या संघामध्ये जसप्रित बुमराह, ट्रेट बोल्टसारखे जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत. त्यांच्यासमोर राजस्थानच्या फलंदाजांचा कस लागेल. तसेच रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रायन रिकेल्टन, हार्दिक पांड्या, हे फलंदाज फॉर्मात आहेत. त्यांची गोलंदाजी ही चांगली आहे.
राजस्थानसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यांच्या सलामीच्या फलंदाजांना आता सुर गवसलेला आहे. त्याचप्रमाणे मुंबई विरुद्ध ते एक आव्हानात्मक धावसंख्या उभारू शकतात. मुंबईसाठी चिंतेची बाब म्हणजे राजस्थानचा तेज गोलंदाज जोफ्रा आर्चर, त्याच्या सुरुवातीचा स्पेल खेळून काढणे मुंबईला कठीण जाईल. त्यामुळे अटीतटीची लढत प्रेक्षकांना पाहावयास मिळेल अशी अपेक्षा करुया. चला तर बघुया राजस्थान रॉयल मुंबई इंडियन्सचा विजय रथ रोखणार का?