
अमरावती : मोबाईल फोन काळजीपूर्वक हाताळला नाही तर तो धोकादायक ठरू शकतो. जगभरात अचानक फोन ब्लास्ट होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये, हे स्फोट प्राणघातक देखील ठरले आहेत. चार्जिंगला लावलेला मोबाईल फोन ब्लास्ट होण्याची घटनाअनेकदा घडली आहे. अशीच एक घटना अमरावती येथे घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
अमरावतीतील साईधामनगर येथील संजय टाले यांचा घरी ही घटना सकाळी ११ वाजता घडली. मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना त्याचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज व आवाका एवढा मोठा होता की संपुर्ण घरात कंपन झाले होते. स्फोटाच्या आवाजाने संजय टाले यांची पत्नी हॉलमध्ये आल्या असता मोबाईला आग लागलेलीत्यांना दिसली तसेच बाजूच्या कपड्यांनीसुद्धा पेट घेतला होता. त्यांनी प्लगचे बटन स्वीचऑफ केले व मोबाईलवर पाणी टाकले. सतर्कतेने मोठी हानी टळली. त्यावेळी घराच्या बेडरूममध्ये सुदैवाने कोणी नव्हते. संजय टाले यांनी सांगीतले की, मोबाईलच्या स्फोटाचा आवाज खुप मोठा होता.
घर थोडक्यात बचावले. पत्नीने जर तात्काळ येऊन मोबाईलची आग विझवली नसती तर खूप मोठी हानी झाली असती.मोबाईल स्फोट कसा होतो, तो आम्ही अनुभवलेला आहे. कुणीही चार्जिंगवर लावून मोबाईल पाहू नये व विशेष करून मोबाईल लहान मुलांना देऊ नये. नाहीतर खूप मोठी नुकसान होऊ शकते, असे संजय टाले यांनी सांगितले