
तोडफोड,दगडफेक आणि लाठीमार...अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर नैनितालमध्ये जातीय तणाव
उत्तराखंड: नैनितालमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर जातीय तणाव निर्माण झाला आहे. संतप्त जमावाने दुकाने, हॉटेल्सची तोडफोड करून, अनेक ठिकाणी हाणामारीच्या देखील घटना घडल्या आहेत. यामुळे येथील शाळा, महाविद्यालये आज बंद ठेवण्यात आली आहेत. नैनीतालमध्ये वाढलेल्या तणावाचा फटका तिथल्या पर्यटकांना सुद्धा बसला आहे.
नैनिताल येथे बुधवारी रात्री १२ वर्षाच्या मुलीसोबत दुष्कर्म केल्याची घटना समोर आल्यानंतर, संतप्त लोकांनी आणि विशिष्ट संघटनेनी या घटनेचा निषेध जाताना तोडफोड आणि दगडफेक करत धुडगूस घातला. यादरम्यान काही ठिकाणी माशीदीवरहि दगडफेक करण्यात आली. जमाव पांगवण्यासाठी स्थानिक पोलिसांनी सौम्य लाठीमार करावा लागला.
अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाने ६५ वर्षीय व्यक्तीविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली. १२ एप्रिल रोजी संशयित आरोपीने अल्पवयीन मुलीला पैशाचे आमिष दाखवून त्याच्या कारमध्ये नेऊन बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार कंत्राटदार म्हणून काम करणाऱ्या ६५ वर्षीय उस्मानवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेच्या आईने बुधवारी रात्री मुलीला पोलीस ठाण्यात आणले, त्यानंतर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) कायद्याअंतर्गत एकआयआर दाखल करून, संशयित आरोपीला अटक करण्यात आली.
घटनेच्या बातमीने वातावरण तापले
पोलीस तक्रारीनंतर घटनेची माहिती वेगाने पसरली, त्यांनतर बुधवारी रात्री ९:३० च्या सुमारास काही लोकं आरोपीचे जिथे कार्यालय होते तिथे एकत्र जमले, आणि तिथल्या अल्पसंख्याक समुदायाच्या दुकानांची आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉलची तोडफोड केली. व्हिडिओमध्ये काही लोक या दुकानांच्या कर्मचाऱ्यांना कानशिलात मारतानाही दिसत होते.
शहरात शांतता राखण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आरोपी उस्मानच्या घराभोवती बॅरिकेड्स लावले आहेत.
पर्यटक अडकले
शहरात निर्माण झालेल्या जातीय तणावामुळे हॉटेल आणि खाणपिण्याची दुकाने बंद असल्यामुळे नैनितालमध्ये आलेल्या पर्यटकांना त्याचा फटका बसला आहे. प्रवास बंदीमुळे पर्यटकांना तिथून हलता देखील येत नाही. असे असले तरी, लवकरात लवकर परिस्थिती आटोक्यात आणण्याचा आणि जातीय तणाव कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.