Thursday, May 1, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

Punha Shivajiraje Bhosale : महाराष्ट्र दिनी शिवगर्जनेच्या सोबतीने ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाची घोषणा 

Punha Shivajiraje Bhosale : महाराष्ट्र दिनी शिवगर्जनेच्या सोबतीने ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाची घोषणा 

मुंबई : महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय घडामोडी जेव्हा संभ्रमाच्या उंबरठ्यावर उभ्या राहतात, तेव्हा इतिहास आपली उपस्थिती पुन्हा नोंदवतो. या पार्श्वभूमीवर, लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) एक नवा सिनेमॅटिक प्रवास घेऊन येत आहेत ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ (Punha Shivajiraje Bhosale) महाराष्ट्र दिनाच्या (Maharashtra Day 2025) औचित्याने या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून “महाराष्ट्र फक्त महाराजांनाच ऐकतो, म्हणूनच पुन्हा शिवरायांची महाराष्ट्राला गरज आहे,” असे सांगत महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचा सामाजिक आणि भावनिक गाभा स्पष्ट केला.

“हे माझ्या महाराष्ट्राचं भविष्य आहे. यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा... गाठ माझ्याशी आहे. या शिवगर्जनेच्या सोबतीने ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ या चित्रपटाचा उद्देश स्पष्ट होतो. हा केवळ ऐतिहासिक चरित्रपट न राहाता, आधुनिक महाराष्ट्राला त्याच्या मूळ विचारांकडे परत नेण्याचा प्रयत्न असून हा सिनेमा ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा गौरव करतानाच, आजच्या समाजातील निष्क्रियतेला जाबही विचारणार आहे.

या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज ही महत्त्वपूर्ण भूमिका अभिनेता सिद्धार्थ बोडके साकारणार आहे. सिद्धार्थने अलीकडील काळात मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली असून आता शिवरायांची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी त्याला मिळाली आहे. चित्रपटात त्याच्यासोबत बालकलाकार त्रिशा ठोसरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे लेखन अंतिम टप्प्यात असून, चित्रीकरण लवकरच सुरू होईल. महेश मांजरेकर यांचे दिग्दर्शन, कथा लेखन असलेल्या या चित्रपटाचे संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध करत आहेत. चित्रपटाच्या आशयात नेमके कोणते सामाजिक वा राजकीय विषय हाताळले जाणार, हे सध्या गुप्त ठेवण्यात आले आहे. मात्र, महाराष्ट्रच या सिनेमाच्या कथेचा मध्यवर्ती केंद्रबिंदू असणार आहे. आजच्या महाराष्ट्रातील मूलभूत प्रश्नांवर चित्रपटात भाष्य करण्यात येणार आहे, जे प्रश्न गेल्या काही दशकांपासूनही अनुत्तरितच आहेत.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात, “माझ्यातला कलाकार गप्प बसत नाही. मी कलाकृतीतून व्यक्त होतोय. हा नवा कोरा सिनेमा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न ठेवता, सामाजिक भान जागवणारा असणार आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट ऐतिहासिक किंवा काल्पनिक मांडणीपेक्षा आधुनिक वास्तवाशी संवाद साधण्याचा प्रयत्न आहे. आजच्या काळात ज्या प्रश्नांनी समाजाला जखडून ठेवलं आहे, त्या असंतोष, उदासीनता, सामाजिक भानाचा अभाव यावर शिवाजी महाराजांचे कालातीत विचारधन प्रकाश टाकणार आहे.’’

 
View this post on Instagram
 

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

सिद्धार्थ बोडके आपल्या भूमिकेविषयी बोलतो, “ही केवळ भूमिका नाही, ही एक जबाबदारी आहे. याआधी अनेकांनी महाराजांची भूमिका साकारली असून, आता ती जबाबदारी माझ्यावर आहे. ती योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.” या चित्रपटाच्या निमित्ताने महेश मांजरेकर पुन्हा एकदा एक संवेदनशील तरीही ठाम भूमिका घेत आहेत, की इतिहासातील आदर्श हे केवळ गौरवगाथा म्हणून सांगायचे नसतात, तर ते वर्तमानाला दिशा देण्यासाठी पुन्हा पुन्हा आठवावे लागतात.

Comments
Add Comment