Thursday, May 22, 2025

विशेष लेखसंपादकीय

अक्षय्य फल देणारी तृतीया

अक्षय्य फल देणारी तृतीया

अश्विनी वैद्य


अक्षय्य तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त होय. हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. अक्षय म्हणजे कधीही नाश न होणारा, हिंदू धर्माप्रमाणे जैन धर्मियांमध्येही या दिवसाला विशेष महत्त्व आहे. हा दिवस भगवान विष्णू यांना समर्पित आहे. भगवान विष्णूंनी या मुहूर्तावर परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता असे मानले जाते, त्याचप्रमाणे त्रेतायुगाच्या सुरुवातीस हिंदू धर्मात सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी भगीरथींनी पृथ्वीवर आणली होती. तसेच या दिवशी देवी अन्नपूर्णेची ही पूजा लोक करतात.

विदर्भात या दिवशी चिंचवणे या खाद्यपदार्थाला विशेष महत्त्व असते. त्याचप्रमाणे महाभारतातील युधिष्ठराला अक्षय पात्र प्राप्त झाले होते, या अक्षय पात्रातील अन्न कधीही संपत नव्हते या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गोरगरिबांना अन्नदान करीत असे, याच श्रद्धेने लोक या दिवशी अन्नदानही करतात आणि या दिवशी मिळालेले पुण्य हे कधीही संपत नाही असे म्हणतात. तसेच या दिवशी श्रीकृष्ण आणि सुदामाची भेट झाली होती. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पित्रांना पाणी दिले जाते घरात मातीच्या भांड्यात पाणी भरून आंबा किंवा खरबूज ठेवून त्याची पूजा केली जाते. अक्षय तृतीयेची भुरळ मानवी मनाला अनादी अनंत काळापासून आहे. व्यासमुनींनी प्रत्यक्ष विष्णूचा अवतार असणाऱ्या प्रभू श्रीरामांना अक्षय भाता प्रदान केलेला दिसतो. वास्तविकता हा प्रभू श्रीरामांना म्हणजेच प्रत्यक्ष देवाला हा अक्षय भाता धारण करण्याची जरुरी का असावी? परंतु, युद्धाच्या प्रसंगी काय संकटे येतील आणि किती बाण खर्ची पडतील याची शाश्वती प्रत्यक्ष भगवंत देखील ठरवू शकत नाहीत आणि म्हणून प्रभू श्रीराम अक्षय भाता जवळ बाळगत. त्याचप्रमाणे दैनंदिन आयुष्याच्या लढाईत उत्तम असता आवश्यक असणारी संपत्ती ही अक्षय असावी ही प्रत्येक मनुष्याची इच्छा असते. हिंदू धर्मातील प्रत्येक सणामागे काही ना काही महत्त्वपूर्ण कारण असते बरेच लोक या दिवशी नवनवीन वस्तू खरेदी करतात नवीन प्रकल्प, व्यवसायाला सुरुवातही करतात तसेच सोने खरेदी करण्यालाही या दिवशी महत्त्व आहे. आज कालच्या पिढीला लॉजिकल कारण हवे असते जर आपण लक्षात घेतले, तर हा सण आपल्या आयुष्यात एक नवीन गोष्टीला नवीन उमेदीने सुरुवात करण्यास

प्रोत्साहन देतो. लोक सोने खरेदी करतात म्हणजे हा सण आपल्याला बचतीचे आणि गुंतवणुकीचे महत्त्व शिकवते. सर्वसामान्य व्यक्ती पैशाची बचत करून सोने विकत घेतात सोन्यात गुंतवणूक करणे हे लोकांना सुरक्षित आणि फायद्याचे वाटते आणि त्याला अशा शुभ मुहूर्ताची जोड लाभली की सोने खरेदी करताना लोकांमध्ये उत्साह खूप दिसून येतो. लोक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नवीन व्यवसायाला देखील सुरुवात करतात, हिंदू धर्मातील प्रत्येक सण काहीतरी सांगतो आणि व्यक्तीला नवीन उमेदीने जगण्यास शिकवतो व्यक्तीच्या आयुष्यातल्या प्रत्येक नवीन कार्याला जर सणाची साथ लाभली तर निश्चित जे ठरवले आहे ते नक्कीच पूर्ण होते यात वादच नाही.
Comments
Add Comment