धारावीतील युवश्री सर्वाननला या विद्यार्थिनीने मिळवले ९३.०२ टक्के गुण
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या सुरु करण्यात आलेल्य पहिल्या आयसीएसई मंडळाच्या शाळेचा निकाल तब्बल १०० टक्के लागला आहे. महापालिकेच्या माटुंगा पश्चिम येथील वुलनमिल ‘आयसीएसई’ मंडळाच्या शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून यामध्ये धारावीतील ९० फुट रोडवरील कामराज नगर परिसरात राहणाऱ्या युवश्री सर्वानन या विद्यार्थिनीने ९३.०२ टक्के गुण मिळवले आहे.
या वुलन मिल आयसीएसई मंडळाच्या शाळेतील २७ विद्यार्थ्यांपैंकी ७ विद्यार्थ्यांनी ८१ टक्क्यांहून अधिक गुण मिळववले आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात बुधवारी ३० एप्रिल २०२५ रोजी या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देवून या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मुंबई महानगरपालिकेमार्फत सन २०२०-२१ मध्ये जी-उत्तर विभागात मुंबई पब्लिक स्कूल वुलनमिल ही ‘आयसीएसई’ मंडळाची शाळा सुरू करण्यात आली. या शाळेत आयसीएसई मंडळाच्या नियमावलीनुसार अभ्यासक्रम सुरू आहे. सन २०२४-२५ मध्ये या शाळेत इयत्ता १० वी चा वर्ग होता. त्यामध्ये एकूण २७ विद्यार्थी इयत्ता १० वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ७ विद्यार्थी ८१ टक्के व त्याहून अधिक श्रेणीत उत्तीर्ण झाले. यामध्ये धारावीतील युवश्री सर्वानन या विद्यार्थिनीने ९३.०२ टक्के व अर्पित यादव या विद्यार्थ्याने ९१.०८ टकके गुण प्राप्त केले. मुंबई पब्लिक स्कूल वुलनमिल आयसीएसई मंडळाच्या शाळेचा इयत्ता १० वी चा १०० टक्के निकाल लागला आहे.
यासर्व विद्यार्थ्यांना अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे, शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती वखारिया, जी उत्तर विभागाच्या शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी (शाळा)स्नेहलता डुंबरे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.






