
मुंबई : मुंबईत घर व्हावं हि प्रत्येकाची इच्छा असते. घरांच्या वाढत्या किंमतीमुळे काहींची ही स्वप्ने अपूर्णच राहतात. सोयीसुविधांचे अमिष दाखवून वेगवेगळ्या बिल्डरने आजपर्यंत अनेकांना फसवल्याच्या घटनाही घडत आहेत. अशातच जर तुम्हाला परवडेल अशा किंमतीत आणि मुंबईमध्ये तुम्हाला तुमचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर म्हाडाने मुंबईकरांसाठी परवडेल अशा किंमतीत घरांची विक्री सुरु केली आहे.
म्हाडाकडून लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी लॉटरी काढण्यात येणार असून, या घरांसाठीच्या अटींमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. म्हाडाने माहुलमध्ये तब्बल ४७०० घरे बांधली आहेत. ही घरे महापालिकेचे कर्मचारी १२ लाख ६० हजार रुपयांत घेऊ शकतात. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसांठी घरांची विक्री करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, त्याला प्रतिसाद कमी मिळाल्यामुळे प्रशासनाने अटींमध्ये काही बदल केले आहेत.
बदललेल्या अटींनुसार, आता श्रेणी १ मधील कर्मचारी वगळता सर्वच श्रेणीतील कर्मचारी आणि अधिकारी या घरांसाठी अर्ज करू शकतात. मुख्य म्हणजे, अर्ज करण्याची मुदत देखील १५ मे पर्यंत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. माहुल परिसरात २२५ चौ. फुटांची ४ हजार ७०० घरे बांधली असून, १२ लाख ६० हजारात ही घरे विकली जाणार आहेत.
एमएमआरडीएने प्रकल्प बाधित कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी महापालिकेला सदनिका दिल्या होत्या. मात्र, अनेक घरे रिक्त राहिल्याने ती कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय म्हाडकडून घेण्यात आला. मुंबई महापालिका प्रशासन म्हाडाच्या धर्तीवर तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच लॉटरी पद्धतीनं स्वत:ची घरे देणार आहेत.