
मुंबई : आरबीआयकडून (RBI) सातत्याने बँक व्यवहारांबाबत नियमावलीत बदल केले जातात. अशातच आता मे महिना सुरु होण्यास एक दिवस शिल्लक राहिला असून आरबीआयने बँकिंगबाबत नवी नियमावली जाहीर (RBI New Rule) केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार एटीएममधून पैसे काढणं महाग होणार आहे. त्यामुळे वारंवार पैसे काढणाऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (New ATM cash withdrawal Rule)
आतापर्यंत प्रत्येक बँकेकडून ग्राहकांना एका विशिष्ट मर्यादेपर्यंत एटीएममधून पैसे काढण्याची मोफत सुविधा दिली जात होती. परंतु आता मर्यादेपलिकडे वापरली जाणारी एटीएम सुविधाबाबत आरबीआयने विशेष लक्ष दिले आहे. या नियमांमध्ये बदल करुन एटीएम वापरण्यावर आकारल्या जाणाऱ्या शुल्काबाबत पारदर्शकता आणण्यासाठी आरबीआयने एटीएममधून पैसे काढण्यावर शुल्कवाढ केली आहे. यापूर्वी प्रत्येक एटीएम व्यवहारावर प्रति व्यवहार २१ रुपये शुल्क आकारले जात होते. आता नव्या नियमानुसार एटीएम व्यवहारावर प्रति व्यवहार कमाल २३ रुपये शुल्क आकारले जाणार आहेत. हे नवीन नियम १ मे २०२५ पासून देशभरात लागू केले जाणार आहेत.
मोफत व्यवहार मर्यादेत बदल नाही
एटीएममधून ग्राहक दरमहा पाचवेळा मोफत व्यवहार करू शकतात. या मर्यादेबाबत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र ग्राहकांनी ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक वेळेला पैसे काढल्यास नवीन शुल्क लागू होणार आहे.
काही बँकांचे वेगळे नियम
काही बँकांनी जास्तीत जास्त व्यवहारांमध्ये सवलत दिली आहे. यामध्ये एचडीएफसी बँक देखील समाविष्ट आहे. एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना फक्त एचडीएफसी एटीएममधून पैसे काढतानाच शुल्क आकारले जाईल. शिल्लक तपासणे, मिनी स्टेटमेंट काढणे आणि पिन बदलणे मोफत असेल.
तर दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढले तर पैसे काढण्याव्यतिरिक्त, तुमच्याकडून बॅलन्स तपासणे, मिनी स्टेटमेंट काढणे आणि पिन बदलणे यासाठी देखील शुल्क आकारले जाईल.
अतिरिक्त पैसे देणं कसं टाळता येणार ?
जर तुम्ही महिन्यातून एकदा किंवा दोनदाच एटीएममधून पैसे काढत असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. पण जे लोक एटीएममधून वारंवार पैसे काढतात त्यांच्यासाठी आम्ही काही सोप्या टिप्स आहेत.
- फक्त मोफत मर्यादेत व्यवहार करा.
- तुमच्या बँकेच्या एटीएमचा जास्तीत जास्त वापर करा.
- रोख रकमेची गरज कमी करण्यासाठी डिजिटल पेमेंट, यूपीआय किंवा मोबाईल वॉलेटसारखे पर्याय अधिक वापरा.