इंडिया कॉलिंग - डॉ. सुकृत खांडेकर
भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधे पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या निरपराध २६ पर्यटकांच्या हत्येने सारा देश हळहळला. बंदुकीचा धाक दाखवत पर्यटकांना नाव आणि धर्म विचारून दहशतवाद्यांनी समोरून अगदी जवळून त्यांच्या डोक्यात, छातीत गोळ्या घातल्या. निसर्गाचा आनंद लुटायला आलेल्या परिवारासमोर २६ हिंदू पर्यटकांच्या रक्ताचा सडा पडला. पहलगामच्या या थरारक घटनने सारा देश हादरला. सर्वत्र संताप प्रकटला, दहशतवाद्यांना पोसणाऱ्या व भारतावर परोक्ष हल्ले घडविणाऱ्या पाकिस्तानला कायमची जबर अद्दल घडवावी, अशी देशातून मागणी होऊ लागली. पण दोनच दिवसानंतरच काँग्रेसने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. काँग्रेस पक्षाचे काही नेते आणि सोशल मीडियावरील काही अतिशहाणे रोज पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाला टार्गेट करीत आहेत. काँग्रेस पक्षाच्या वाचाळ नेत्यांना आणि युट्यूबवरील मस्तवाल निवेदकांना पहलगाम हत्याकांडानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपावर हल्ले चढवायला जणू धारदार हत्यारच मिळाले आहे. देशवासीयांचे संरक्षण करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कसे अकार्यक्षम, अपयशी आणि कुचकामी ठरले आहेत, हे सांगण्याची काँग्रेस पक्षात व युट्यूबवर सध्या चढाओढ चालू आहे.पहलगामच्या हत्याकांडानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची काँग्रेस पक्षात एक शर्यत सुरू झाली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, सोनिया गांधींचे जावई व प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वड्रा, काँग्रेस नेते आर बी तिम्मापूर, मणिशंकर अय्यर, तारीक हमीद कारा, सैफुद्दीन सोज, महाराष्ट्रातील विजय वड्डेट्टीवार अशा वाचाळवीरांची नावे सर्व देशाला ठाऊक झाली आहेत. भाजपाने या नेत्यांना जाब विचारताच, काँग्रेसची भंबेरी उडाली. अखेर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी खुलासा करून, पक्षाच्या नेत्यांची विधाने ही त्यांची वैयक्तिक मते आहे, ती पक्षाची भूमिका नाही, त्यांना पहलगाम हत्याकांडावर बोलण्याचा पक्षाने कोणताही अधिकार दिलेला नाही, असे स्पष्ट केले.
पहलगाममधे दहशतवाद्यांनी घडवलेले पाशवी व क्रूर हत्याकांड ही संवेदनशील घटना आहे. या संदर्भात पक्षाने पारीत केलेला प्रस्ताव, तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मांडली भूमिका ही काँग्रेसची अधिकृत भूमिका असेल. संवेदनशील विषयावर अन्य नेत्यांनी बोलण्याची गरज नाही, असेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे.कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले की, पाकिस्तानविरुद्ध युद्ध करण्याची गरज नाही. दहशतवादाला रोखण्यासाठी कठोर उपाय योजले पाहिजेत. युद्ध व्हावे असे आम्हाला वाटत नाही, शांतता तसेच सुरक्षा महत्त्वाची आहे... राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर तसेच देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर खरगे व राहुल गांधी बोलत असताना, सिद्धरामय्या यांना भूमिका मांडण्याची गरजच काय ? ते एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत, याचे भान ते विसरले असावेत.आर. बी. तिम्मापूर म्हणाले, दहशतवादी हल्ला करीत होते, तेव्हा त्यांनी पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले नव्हते. जरी विचारले असले तरी या मुद्द्याचे राजकारण करणे हा वेडेपणा आहे... मृतांचे परिवार दहशतवाद्यांनी नाव व धर्म विचारून हत्या केली असे सांगत आहेत. मग तिम्मापूर यांच्याकडे वेगळी माहिती कोठून आली ?विजय वड्डेट्टीवार यांनीही तसाच सूर लावला होता. ते म्हणाले, दहशवाद्यांकडे लोकांचा धर्म विचारायला वेळ तरी असतो का? भाजपाचे नेते, प्रवक्ते, स्वत: मुख्यमंत्र्यांनीही वडेट्टीवारांना चांगलेच फैलावर घेतले. मग वड्डेट्टीवारांनी सारवासारवी करीत माफी मागितली. आपले वक्तव्य अर्धवट दाखवले म्हणून त्यांनी माध्यमांनाच जबाबदार धरले. माझे भाषण पू्र्ण दाखवा, सरकारचे अपयश लपविण्यासाठी काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका असे बजावले. दहशतवादी हल्ला करताना लोकांशी बोलतात का, त्यांच्या धर्माची चौकशी करीत बसतात का ? काही पर्यटक म्हणतात हल्लेखोरांनी धर्म विचारला. काही म्हणातात, असे काही घडलेच नाही... या वड्डेट्टीवारांच्या विधानावरून वाद निर्माण झाला.
तारीक हमीद कारा यांनी तर भारताने पाकिस्तानबरोबर चर्चा करायला हवी असा अनाहूत सल्ला सरकारला दिला आहे. फाळणीमुळे न सुटलेले प्रश्न म्हणजे पहलगाममधील दुर्घटनेचे प्रतिबिंब आहे का? अशी शंका मणिशंकर अय्यर यांनी बोलून दाखवली आहे. पहलगाममधील हल्ल्यात कोणताही सहभाग नाही, हे पाकिस्तानचे म्हणणे भारताने स्वीकारले पाहिजे असा सल्ला सैफुद्दीन सोझ यांनी दिला आहे.जेव्हा २६/११ चा दहशतादी हल्ला झाला तेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेवर होता. तेव्हा भाजपाने वेगवेगळी वक्तव्ये करून सरकारला टार्गेट केले नव्हते. आम्ही सरकारबरोबर आहोत अशी भूमिका भाजपाने घेतली होती. दहशतवादी हल्ल्यानंतर देशाची एकजूट, अखंडता व एकता सर्व जगाला दिसली पाहिजे, या उलट काँग्रेसचे नेते रोज नवनवीन सल्ले सरकारला देत आहेत. जो सूज्ञपणा व पोक्तपणा व सामाजिक भान जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी दाखवले, त्याच्या किंचितही १४० वर्षे वयाच्या काँग्रेस पक्षाकडे नाही असे चित्र देशाला दिसले. पहलगाम हत्याकांडानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीर विधानसभेचे एक दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले. विधानसभेत हत्याकांडात मरण पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ओमर अब्दुल्ला म्हणाले, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पर्यटकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपली होती. त्यांच्या परिवाराची माफी कशी मागावी, यासाठी आपल्याकडे शब्द नाहीत. जम्मू-काश्मीरच्या सुरक्षिततेच्या जबाबदारी लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची नाही. पण राज्याचा मुख्यमंत्री व पर्यटनमंत्री म्हणून आपण त्यांना इथे बोलावले होते. त्यांना आपण सुरक्षित परत पाठवू शकलो नाही याचे मला मोठे दु:ख आहे. ज्या मुलांनी आपल्या पित्याला रक्ताच्या थारोळ्यात पडताना पाहिले, त्यांना मी काय सांगू शकतो? नुकताच विवाह झालेल्या पण विधवा झालेल्या नौदलाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीचे मी कसे सांत्वन करू शकतो ? काही जण तर प्रथमच काश्मीरला आले होते पण परत जाताना आपल्या घरातील कर्त्या पुरुषाची शवपेटी
घेऊन गेले...पहलगाममधील बैसरनमध्ये झालेला हल्ला हे २१ वर्षांनंतर काश्मीर खोऱ्यात निरपराध लोकांचे झालेले सर्वात मोठे हत्याकांड आहे. जम्मू-काश्मीर हा केंद्र शासित प्रदेश आहे. विधानसभा निवडणूक झाली असली तरी काश्मीरला राज्याचा पूर्ण अधिकार केंद्राने दिलेला नाही. सरहद्दीवरील संवेदनशील राज्य म्हणून तेथील सुरक्षा व्यवस्था केंद्र सरकारच्या हाती आहे. तरीही ओमर अब्दुला यांनी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून हत्याकांडातील मृतांच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे. विशेष म्हणजे त्यांनी एका शब्दानेही केंद्र सरकारला दोष दिलेला नाही किंवा सुरक्षा दलाकडे बोट दाखवलेले नाही. ओमर अब्दुल्ला यांच्याकडे जो संयम, नम्रता आणि शहाणपणा दिसला तो काँग्रेसच्या नेत्यांना का दाखवता आला नाही ?
सोशल मीडिया विशेषत: युट्यूबवरून मोदी-शहांनाच पहलगाम हत्याकांडाविषयी दोष दिला जातो आहे. सोशल मीडियावर काही पोस्ट मोदी सरकारच्या बाजूने तर काही विरोधात असे युद्ध चालू आहे. मात्र काही पोस्टमधून अतिशय गलिच्छ भाषा वापरली जात आहे. काही पोस्टवर आई-बहिणींचा उद्धार केला जातो आहे. पोस्टवर शिवीगाळही वाचायला मिळते आहे. हत्याकांडात ज्यांच्या परिवारातील कर्ते पुरुष गेले, त्यांच्या घरी काय परिस्थिती आहे, याचा विचार त्यात कुठेही नाही. केवळ एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी पहलगाम घटनेचा वापर केला जातो आहे ही चिंतेची बाब आहे.
बस्तीस वर्षांपूर्वी, दि. २५ जून १९८९ रोजी पंजाबमध्ये मोगा येथे खलिस्तानवाद्यांनी जवाहरलाल नेहरू पार्कमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर सकाळी साडेसहा वाजता अंदाधुंद गोळीबार केला व त्यात २५ स्वयंसेवकांची हत्या झाली. नेहरू पार्कमध्ये सकाळी फिरायला येणारे ३५ लोकही जखमी झाले होते. खलिस्तानवाद्यांनी संघाच्या शाखेवर ध्वज फडकवू नये असे सांगितले होते. पण ध्वज फडकवून संघाची शाखा भरल्याने त्याचा रक्तरंजित बदला दहशतवाद्यांनी घेतला. मोगा हत्याकांडाने सारा देश हादरला होता. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासासाहेब ठाकरे व भाजपाचे नेते प्रमोद महाजन यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली आणि महाराष्ट्र बंदची घोषणा केली. तेव्हा एका महिला पत्रकाराने शिवसेनाप्रमुखांना विचारले, महाराष्ट्र बंदमध्ये जर मुंबईत एका मोटारीवर दगड पडला तर...? त्यावर शिवसेनाप्रमुख म्हणाले, दहशतवाद्यांनी मोगा हत्यांकांडात २५ जणांना एकाच वेळी मारले आहे. हा देशाच्या एकतेवर अखंडतेवर घाला आहे. देश अखंड आहे व देशातील लोकं दहशवादाच्या विरोधात एकजूट आहे हे जगाला दाखविण्यासाठी आम्ही महाराष्ट्र बंद पुकारला आहे. त्या बंदमध्ये एखाद्या मोटारीवर दगड पडून काच तडकली तर बिघडले कुठे ?शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व भाजपा नेते प्रमोद महाजन हे दोघेही आज हयात नाहीत. पण पहलगाम येथील हत्याकांडाच्या निषेधार्थ देशाची एकजूट व अखंड भारताचे दर्शन घडविणारे कोणतेही नेतृत्व पुढे आणले नाही... म्हणूनच आज शिवसेनाप्रमुखांची आठवण होते...
[email protected]
[email protected]