मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमध्ये सोमवारी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात १४ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीचे वादळ पाहायला मिळाले. वैभव सूर्यवंशीने केवळ ३५ बॉलमध्ये शतक ठोकत इतिहास रचला. त्याच्या या खेळीच्या जोरावर राजस्थानने गुजरातचे २१० धावांचे आव्हान केवळ १५.५ षटकांत ८ विकेट राखत पूर्ण केले.
वैभव आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणाऱ्या क्रिकेटरच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. त्याच्यापुढे केवळ वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आहे. त्याने २०१३मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूकडन ३० बॉलमध्ये शतक ठोकले होते.
या यादीत तिसऱ्या स्थानावर युसुफ पठाण आहे. त्याने २०१०मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सकडून ३७ बॉलमध्ये शतक ठोकले होते. तर डेविड मिलरने २०१३मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबसाठी आरसीबीविरुद्ध ३८ बॉलमध्ये शतक बनवले होते.
शतक ठोकणारा तरूण फलंदाज
वैभवने हे शतक केवळ १४ वर्षे आणि ३२ दिवस इतक्या कमी वयात लगावले आहे. म्हणजेच सर्वात कमी वयात टी-२० मध्ये शतक ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर प्रस्थापित झाला आहे. याआधी हा विक्रम विजय जोल यांच्या नावावर होता. त्यांनी २०१३मध्ये महाराष्ट्राकडून मुंबईविरुद्ध खेळताना १८ वर्षे आणि ११८ दिवस इतके वय असताना शतक ठोकले होते.
१७ चेंडूत ठोकले अर्धशतक
वैभवने गुजरातविरुद्धच्या सामन्यात केवळ १७ चेंडूत अर्धशतक ठोकले. या दरम्यान, वैभवने ३ चौकार आणि ६ षटकार ठोकले. वैभवने १७ चेंडूत अर्धशतक ठोकले हे या हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक आहे. राजस्थान रॉयल्सच्या इतिहासात झळकावलेले हे दुसरे वेगवान अर्धशतक आहे. याशिवाय कमी वयात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रमही वैभवच्याच नावे आहे.