
पुणे : यंदा मार्चच्या सुरुवातीपासूनच उष्णतेची तीव्रता वाढली आहे. मागील आठवडाभर विदर्भात तापमानाने नवनवे उच्चांक गाठले. तापमानात (Maharashtra Weather) मोठी वाढ झाल्याने विदर्भासह संपूर्ण राज्यभर तीव्र उन्हाच्या झळा (Heat Wave) सोसाव्या लागल्या. परंतु आता उष्णतेच्या लाटेची डोकेदुखी सहन केल्यानंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या हजेरीला तोंड द्यावे लागणार (Unseasonal Rain) असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक भागांत उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसल्यानंतर राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) दिला आहे.
गेल्या आठवडय़ात कित्येक ठिकाणी तापमानाचा पारा ४५-४६ अंशांवर गेला होता. त्यानंतर वातावरणात अचानक मोठा बदल झाला आहे. अवकाळीचे ढग दाटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडू शकतो, असे भाकीत हवामान शास्त्रज्ञांनी केले आहे. यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत. पुढील दोन-तीन दिवसांत तापमानात घट होईल आणि राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पाऊस पडेल, असे हवामान अभ्यासकांचे मत आहे.
कोणत्या जिल्ह्यांत पावसाची शक्यता?
सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक, पुणे, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. (Maharshtra Unseasonal Rain)
तीन महिन्यांत जगभर तापमानवाढ तीव्र होणार
राज्यासह देशभरात उष्णता भयंकर वाढली आहे. याचदरम्यान जागतिक हवामानशास्त्र संघटनेने नव्या धोक्याची घंटा वाजवली आहे. पुढील तीन महिन्यांत जगभरात तापमानवाढ अधिक तीव्र होईल. उत्तर दक्षिण प्रशांत, पूर्व आशिया आणि अरब या भागात उष्णता उच्चांक गाठेल, असा अंदाज जागतिक हवामानशास्त्र संघटनेने वर्तवला आहे. मे ते जुलैदरम्यान जगातील बहुतांश भागात पारा वाढू शकतो, असे हवामानशास्त्र संघटनेने म्हटले आहे.