
मुंबई : उन्हाळ्याची काहिली आता भलतीच ताप देतेय. त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पूर्वी एखादा माणूस उन्हातून आला की त्याला गुळाचा खडा आणि पाणी द्यायची पद्धत होती. कारण, गुळामुळे शरीरातलं ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रित राहायचं. अशा या गुणकारी गुळाचं सरबत कसं करायचं हे जाणून घेऊया :-
या गुळाच्या सरबतासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा कप गूळ, १ टेबलस्पून जिरं, १ टेबलस्पून बडिशेप, अर्धा टेबलस्पून मिरपूड, १ ते २ टेबलस्पून लिंबाचा रस, पाच ते सहा पुदिन्याची पानं, १ ते २ टेबलस्पून भिजवलेला सब्जा, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी.
सगळ्यांत आधी गूळ चिरुन किंवा किसून बारीक करून घ्यायचा. आता एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात किसलेला गूळ, जिरे, बडीशेप, चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर, लिंबाचा रस व पुदिन्याची पानं हे सगळे जिन्नस टाकायचे आणि त्या थोडं पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायची. तयार पेस्ट मिक्सरच्या भांड्यातून काढून एका काचेच्या बाटलीत भरुन स्टोअर करून ठेवा आणि ही बाटली फ्रिजमध्ये ठेवा. जेव्हा गरज वाटेल तेव्हा चमचाभर पेस्ट, सब्जा घालून त्यात गरजेनुसार पाणी ओतून घ्या आणि गार्निशिंगसाठी बारीक चिरलेला पुदिना भुरभुरा... झालं गुळाचं सरबत तयार.