
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतून (Marathi) दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते प्रकाश भेंडे यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश भेंडे आजारी असून काल सोमवारी २८ एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली असून आज प्रकाश भेंडे (Prakash Bhende) यांच्या पार्थिवावर आज दुपारी दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
प्रकाश भेंडे यांचे कुटुंब
दिवंगत अभिनेत्री उमा भेंडे (Uma Bhende) या त्यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात मुले प्रसाद भेंडे आणि प्रसन्न भेंडे, सुना श्वेता महाडिक-भेंडे आणि किमया भेंडे, नातवंड असा परिवार आहे. त्यांचा थोरला मुलगा आणि सून हे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. चित्रपट आणि कलाक्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी दिवंगत अभिनेत्री उमा भेंडे आणि , प्रकाश भेंडे या दाम्पत्याला ओळखलं जायचं. यासाठी त्यांना एकता कल्चरल अकादमीतर्फे एकता कलागौरव पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं. (Prakash Bhende Passed Away)
कोण आहेत प्रकाश भेंडे?
प्रकाश भेंडे (Prakash Bhende) यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा इथल्या एका गावात झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते. जन्म मुरुड-जंजिरा इथल्या गावात झालं होतं, पण प्रकाश भेंडे यांचं बालपण मात्र गिरगावात गेलं. वडिलांच्या निधनानंतर कमी वयातच कुटुंबाची जबाबादारी प्रकाश यांच्यावर पडली. यासाठी त्यांनी काही वर्षे टेक्स्टाईल डिझायनर म्हणूनही काम केलं होतं. त्यामुळं सिनेइंडस्ट्रीत तसे ते उशीरानेच आले.
प्रकाश भेंडे अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शकाव्यतिरिक्त उत्तम चित्रकारदेखील होते. त्यांनी आपण यांना पाहिलंत का?, प्रेमासाठी वाट्टेल ते, चटक चांदणी, भालू, नाते जडले दोन जीवांचे या सिनेमात अभिनय केला होता. तर आई थोर तुझे उपकार, आपण यांना पाहिलंत का?, चटक चांदणी या सिनेमाचे दिग्दर्शन आणि भालू, चटक चांदणी, प्रेमासाठी वाट्टेल ते, आपण यांना पाहिलंत का?, आई थोर तुझे उपकार या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती.