Sunday, October 26, 2025
Happy Diwali

सरकारी अनास्थेमुळे आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर; मोखाड्यात पुन्हा बालमृत्यू, मातामृत्यूचे वाढते प्रमाण

सरकारी अनास्थेमुळे आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर; मोखाड्यात पुन्हा बालमृत्यू, मातामृत्यूचे वाढते प्रमाण
मोखाडा : तालुक्यातील मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याचे आता समोर आले आहे. दोन महिन्यांपूर्वीच एका मातामृत्यूने हादरलेल्या मोखाडा तालुक्यात पुन्हा बालमृत्यू झाल्याचे समोर आले. तालुक्यातील किनिस्ते ग्रामपंचायत मधील योगिता सचिन पुजारी या मातेने मोखाडा ग्रामीण रुग्णालयात शुक्रवार दि. २५ रोजी सकाळी ११ वाजता एका सदृढ बालकाला जन्म दिला. जन्मावेळी बालकांचे वजन ३ किलो असल्याचे सांगण्यात आले. मात्र यानंतर सायंकाळी त्या बालकाला श्वास घेण्यास अडचण निर्माण झाल्याने त्याला जव्हार कुटीर रुग्णालय येथे हलविण्यात आले. मात्र त्याठिकाणी सुद्धा आयसीयूची सुविधा नसल्याने त्याला नाशिक येथे हलविण्यात आले. मात्र नाशिक जिल्हा रुग्णालयात पोहचताच काही मिनिटांतच त्या बालकाला मृत घोषित केल्याचे पालकांनी सांगितले. यामुळे पुन्हा एकदा मोखाडा तालुक्यात एका बालकाचा मृत्यू झाल्याने आरोग्य व्यवस्था आणि दररोजच्या घोषणा करणाऱ्या प्रशासनावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. दोन महिन्यापूर्वी तालुक्यातील एका मातेला मोखाड्याहून जव्हार आणि तेथून नाशिक असा जीव वाचवण्यासाठी १०० किमीचा प्रवास करावा लागला होता. मात्र तरीही तिचा जीव वाचला नव्हता. आता पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली असून आता मात्र एका बालकाला अती दक्षता विभाग मिळवण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी पुन्हा १०० किमीचा प्रवास करावा लागला. मोखाडा तालुक्यात कुपोषण बालमृत्यू मातामृत्यू या घटना वाढत असताना आजही कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध न होणे, बालरोग तज्ज्ञांची भरती होणे, माता किंवा बालके यांच्यासाठी अती दक्षता विभाग उपलब्ध नसणे असे गंभीर चित्र कायम आहे. यामुळे जव्हारसह मोखाडा तालुक्यातील नागरिकांना आजही उपचारासाठी नाशिक किंवा वापी याठिकाणी स्थानांतर व्हावे लागत आहे. “ त्या बालकाला श्वास घेण्यास त्रास झाल्याने जव्हार येथे हलवण्यात आले होते मात्र येथेही त्याला ऑपरेट करणे शक्य न झाल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथे नेण्यात आले. यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती. मात्र कदाचित श्वास नलिका आणि हृदयासंबंधी काही आजार जन्मत असावेत असा अंदाज आहे." -डॉ. भरत महाले, वैद्यकीय अधीक्षक, मोखाडा ग्रामीण रुग्णालय " आमचे बाळ सुखरुप जन्म घेतल्याने आम्ही सगळे खुश होतो, मात्र संध्याकाळी अचानक आम्हाला बाळाची तब्बेत खराब होत असल्याचे सांगून जव्हार येथे नेण्यात आले. तिथे चार-पाच तास ठेवून नाशिकला पोहचताच नाशिक येथील डॉक्टरांनी पाच मिनिटात आम्हाला सांगितले की बाळ गेले आहे. तिथे पोहचेपर्यंत बाळ रडत होते. ३ किलो वजनाचे बाळ असून सुद्धा काही तासांत कसा जीव सोडला हे आम्हाला सांगायला हवे. तसेच पाठवलेल्या रुग्णवाहिकेत डॉक्टर सुद्धा नव्हते. यामुळे याची चौकशी व्हायला हवी." - सचिन पुजारी, मृत बालकांचे वडील
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >