
वणी: रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशातच सप्तशृंगी मातेच्या वणीच्या गडावर नवस फेडण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला. वळण रस्त्यावर चालकाला अंदाज न आल्याने वाहन रस्त्याच्या खाली उतरून उलटले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात गाडीत बसलेले २६ भाविक जखमी झाले असून जखमींमध्ये लहान मुलांसह महिलांचा देखील समावेश आहे. जखमींना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले. वणी नांदुरी रस्त्यावर दरेगाव नजीक मोहनदरी फाट्यावर हा अपघात झाला आहे. आज सकाळी छोटा हत्ती या मालवाहू गाडीतून परिवार व नातलग नवस फेडण्यासाठी नांदुरी गडावर जाण्यासाठी निघाले होते. वळण रस्त्यावर चालकाचा अंदाज चुकला नांदुरी गड काही अंतरावर असताना भाविकांच्या गाडीला अपघात झाला. वणी-नांदुरी रस्त्यावर दरेगाव नजीक मोहनदरी फाट्यावर वळण रस्ता असून येथे वाहन चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. यामुळे वाहन सरळ जाऊन रस्त्याच्या खाली उतरून भाविकांनी भरलेला टेम्पो वळणावर उलटल्याने टेम्पोत असलेले २० हुन अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. लहान मुलांसह महिला, पुरुष जखमी आहेत. यात काही जणांना अधिक मार लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्या वाहन धारकांनी लागलीच मदत करत जखमींना वणीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.