Tuesday, April 29, 2025

क्रीडाताज्या घडामोडीIPL 2025

DC vs KKR, IPL 2025: कोलकत्ताचे दिल्लीला २०५ धावांचे आव्हान, रिंकू-रघुवंशीची शानदार फलंदाजी

DC vs KKR, IPL 2025: कोलकत्ताचे दिल्लीला २०५ धावांचे आव्हान, रिंकू-रघुवंशीची शानदार फलंदाजी

नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४८व्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ आमने सामने आहेत. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार अक्षऱ पटेलने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. केकेआरने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत २०४ धावा केल्या आहेत. कोलकाताने दिल्लीला विजयासाठी २०५ धावांचे आव्हान ठेवले आहे.

कोलकाताची या सामन्यात सुरूवात जबरदस्त झाली. गुरबाज आणि सुनील नरेनने कमालीची सुरूवात करून दिली. मात्र तिसऱ्या षटकांत ४८ च्या स्कोरवर गुरबाजची विकेट पडली. यानंतर रहाणेने मोर्चा सांभाळला. ८५ धावसंख्येवर असताना कोलकाताने नरेनची विकेट गमावली. यानंतर ८व्या षटकांत रहाणेची विकेट पडली. रहाणे २६ धावा करून बाद झाला. अय्यर पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. त्याने केवळ ७ धावा केल्या.

१० षटकानंतर केकेआरची धावसंख्या ४ बाद ११७ होती. यानंतर अंगकृष आणि रिंकु सिंह यांच्यात चांगली भागीदारी झाली. मात्र ६१ धावांची भागीदारी १७व्या षटकांत तुटली. अंगकृष ४४ धावा करून बाद झाला. त्यानंतर पुढच्याच षटकांत रिंकु सिंहही बाद झाला. त्याने ३६ धावा केल्या. शेवटचे षटक हे दिल्लीसाठी भारी ठरले. मिचेल स्टार्कने हे षटक टाकले. त्याने या षटकांत तीन विकेट मिळवल्या.

Comments
Add Comment