डॉ. सर्वेश सुहास सोमण
आपण आपले डीमॅट खाते उघडून त्यात काही पैस टाकले की आपण शेअरची खरेदी-विक्री म्हणजेच ट्रेडिंग करू शकतो. आपल्याला शेअर मार्केटमध्ये नफा किंवा परतावा (रिटर्न ऑन इन्वेस्ट्मेंट) कमवायचा असेल, तर साधारणपणे कमी किमतीला शेअर खरेदी करून तो जास्त किमतीला विकला गेला पाहिजे. कधी-कधी याउलट जास्त किमतीला शेअर खरेदी करून तो कमी किमतीला विकला जातो आणि आपल्याला तोटाही होऊ शकतो.
ट्रेडिंगसाठी खालील वेगवेगळे पर्याय आहेत.
इंट्रा डे ट्रेडिंग – आपण एखाद्या दिवशी शेअर खरेदी करून त्याच दिवशी विकला, तर त्याला इंट्रा डे ट्रेडिंग म्हणतात.
लागणारा वेळ (होल्डिंग पिरीअड )-कमी (एक दिवस)
अपेक्षित परतावा (रिटर्न ऑन इन्वेस्ट्मेंट) -कमी
जोखीम (रिस्क)-जास्त
स्विंग ट्रेडिंग – मार्केटच्या चढ-उताराचा (स्विंग)वापर या ट्रेडिंगमध्ये करतात. कमी किमतीला शेअर खरेदी करून तो काही दिवस किंवा आठवड्यांसाठी ठेवला जातो. त्यानंतर अपेक्षित किमतीला तो विकला, तर त्याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात.
लागणारा वेळ (होल्डिंग पिरीअड)-मध्यम (काही दिवस ते आठवडे)
अपेक्षित परतावा (रिटर्न ऑन इन्वेस्ट्मेंट) -मध्यम
जोखीम (रिस्क)-कमी
पोझिशनल ट्रेडिंग – शेअर खरेदी करून थोड्या जास्त कालावधीसाठी शेअर ठेवला (होल्ड केला) आणि त्यानंतर अपेक्षित किमतीला तो विकला, तर त्याला पोझिशनल ट्रेडिंग म्हणतात. या प्रकारात हा कालावधी (होल्डिंग पिरीअड) काही महिन्यांपर्यंत असू शकतो.
लागणारा वेळ (होल्डिंग पिरीअड)- जास्त (काही महिने)
अपेक्षित परतावा (रिटर्न ऑन इन्वेस्ट्मेंट)-थोडा जास्त
जोखीम (रिस्क)- कमी
लाँग टर्म ट्रेडिंग किंवा इन्वेस्ट्मेंट – सर्वात जास्त काळासाठी केला जाणारा ट्रेडिंग च प्रकार आहे. यामध्ये मोठ्या आणि सर्वांना माहीत असलेल्या, चांगली कामगिरी करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून ते काही वर्षांसाठी ठेवले जातात आणि मग आपल्या अपेक्षित नफ्यानुसार विकले जातात.
लागणारा वेळ (होल्डिंग पिरीअड) – जास्त (काही वर्षे)
अपेक्षित परतावा (रिटर्न ऑन इन्वेस्ट्मेंट) -सर्वाधिक
जोखीम (रिस्क)- कमी
या प्रकारात जोखीम कमी असल्याने नवीन गुंतवणूकदारांना बऱ्याचदा हा पर्याय सुचवला जातो.
ऑप्शन ट्रेडिंग – याला डेरिवेटिव ट्रेडिंग असेही म्हटले जाते. हा ट्रेडिंगचा एक वेगळाच प्रकार आहे ज्या मध्ये कमी गुंतवणुकीत आणि कमी वेळात खूप जास्त नफा कमावता येतो; परंतु हा तितकाच जास्त जोखीमीचा प्रकार असल्याने खूप जास्त तोटा होण्याची शक्यताही तेवढीच जास्त असते. योग्य अभ्यासाशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय नवीन गुंतवणूकदारांनी यामध्ये उतरूच नये हे योग्य.
(सूचना: लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)