केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मोलाचा सल्ला
मुंबई : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे, जो या स्पर्धेत टिकेल तोच जगेल. त्यामुळे आपल्याला या स्पर्धेत टिकायचे असेल तर जात पात बाजूला ठेवा कठोर मेहनत करा. शिक्षण घ्या व नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करा व आपल्याचा बांधवासाठी नोकऱ्या निर्माण करा, असा मौलिक सल्ला भाजपा नेते, माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांनी दिला.
गाबीत समाजाच्या कौटुंबिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने खासदार नारायण राणे भांडुप येथे प्रमुख पाहुणे म्हणून रविवारी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
मी कोकणातील गरिबी पाहिली आहे, गरिबी अनुभवली आहे. १९९० साली बाळासाहेब ठाकरे यांनी मला कोकणात पाठवले. तेव्हाच निर्धार होता की, कोकणवासीयांना समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही. कोकणाचा आर्थिक विकास करण्याच्या उद्देशानेच मी कामाला लागलो. आज राजकारणात मी ११ पदे अनुभवली आहेत. खासदार, आमदार झालो, मुख्यमंत्रीही झालो. मात्र त्याचे बहुतांश श्रेय हे कोकणवासीयांना जाते असे सांगत नारायण राणे यांनी कोकणवासींयांचे आभार मानले.
आज महाराष्ट्रातील फक्त १२ टक्के मराठी समाज हा उद्योगधंद्यामध्ये आहे. मात्र गुजराती मारवाडी समाज हा मोठ्या प्रमाणात व्यवसायात आहे. त्यामुळे सर्वाधिक संपत्ती आज त्यांच्याकडे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मेडिकल कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे. चांगल्या पद्धतीचे रस्ते आहेत. आयटीआय आहे, मोठा समुद्र आहे, ताजे मासे आहेत. त्याचा लाभ घेऊन व्यवसाय वाढवा व कोकण समृद्ध करा. मेहनत करा, मुलांना शिक्षण द्या. संकुचित वृत्ती सोडा, दुसऱ्यांना प्रोत्साहन द्या असा सल्ला नारायण राणे यांनी दिला.
स्नेहसंमेलनाचा उद्देश फक्त एकत्र येऊन गप्पा करणे व भोजन करणे एवढाच नसावा तर त्या स्नेहसंमेलनात आपले अनुभव दुसऱ्याला आदान प्रदान करून त्याचा समाजाच्या उन्नतीसाठी करता यावा याच्यासाठी करावा, असा सल्लाही नारायण राणे यांनी दिला.
लवकरच सिंधुदुर्गात एक लाख रोजगार निर्माण होणार
सिंधुदुर्गातील दोडामार्ग येथे १ हजार ४०० एकर जमीन आरक्षित करण्यात आली असून तेथे अदानी व जिंदाल यासारखे मोठ्या उद्योगपतींकडून साधारण ५०० कारखान्या संबंधी बोलणी लवकरच सुरू होणार असल्याचे सांगत नारायण राणे यांनी यामुळे सिंधुदुर्गात एक लाख रोजगार निर्माण होतील असा आशावाद व्यक्त केला.
गाबीत समाजाच्या भांडुप विभागाच्या वतीने यावेळी विद्यार्थ्यी गुणगौरव समारंभ व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. हे स्नेहसंमेलन गाभीत समाज महाराष्ट्रचे अध्यक्ष सुजय घुरात यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार श्यामभाई सावंत, समाजाचे उपाध्यक्ष केटी तारी, सरचिटणीस वासुदेव मोंडकर, बाळ मंचेकर व समाजाचे भांडुप अध्यक्ष वामन हडकर उपस्तिथ होते.