निश्चित मुदतीनंतरही भारत न सोडणाऱ्या पाक नागरिकांना होणार तुरुंगवास, कायद्यात देखील आहे तरतूद
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत सरकारने पाकिस्तान विरुद्ध अनेक कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना निश्चित मुदतीच्या आत भारत सोडून जाण्याची नोटीस बजावली होती. त्यानुसार त्यांची अंतिम तारीख २६ एप्रिल होती, तर वैद्यकीय व्हिसा असलेल्यांसाठी ही अंतिम तारीख 29 एप्रिल आहे. त्यामुळे भारत सोडून न जाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांवर (Pakistani Citizens) कोणती कारवाई होणार? याबद्दल कायदा काय म्हणतो? याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
जम्मू आणि काश्मीरयेथील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपले प्राण गमवावे लागले. या भ्याड हल्ल्याचा सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त केला जात असून, दहशतवाद्यांना समर्थन देणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध कठोर पाऊले उचलण्यासाठी भारत सरकारने अनेक मोठ्या कारवाईला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून, देश सोडून जाण्याचे अल्टीमेटम परराष्ट्र मंत्रालयाद्वारे देण्यात आले. त्यानुसार प्रत्येक राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना शोधून त्यांना देशाबाहेर पाठवण्याचा प्रयत्न आता केला जात आहे. असे असून देखील जर कोणताही पाकिस्तानी व्यक्ती दिलेल्या मुदतीच्या आत देश सोडून जर गेला नाही, तर त्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
मुदतीपूर्व भारत न सोडणाऱ्या पाक नागरिकांना कोणती शिक्षा होणार?
3 वर्षांचा तुरुंगवास आणि 3 लाख रुपये दंड होऊ शकतो. 22एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानशी संबंधित दहशतवाद्यांनी 26 जणांची हत्या केल्यानंतर सरकारने पाकिस्तानी नागरिकांना ‘भारत सोडून जा’ अशी नोटीस बजावली. सरकारने ठरवलेल्या मुदतीनुसार भारत सोडून न जाणाऱ्या कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीला अटक केली जाईल, खटला चालवला जाईल आणि त्याला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा जास्तीत जास्त 3 लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतो.
सार्क व्हिसा असलेल्यांसाठी भारत सोडण्याची अंतिम तारीख 26 एप्रिल होती. वैद्यकीय व्हिसा असलेल्यांसाठी ही अंतिम तारीख 29 एप्रिल आहे. 12 श्रेणीतील व्हिसाच्या धारकांना रविवारपर्यंत भारत सोडावा लागतो. व्हिसा ऑन अरायव्हल, बिझनेस, फिल्म, पत्रकार, ट्रान्झिट, कॉन्फरन्स, गिर्यारोहण, विद्यार्थी, अभ्यागत, गट पर्यटक, तीर्थयात्री आणि गट तीर्थयात्री. 4 एप्रिलपासून लागू झालेल्या इमिग्रेशन अँड फॉरेनर्स अॅक्ट 2025 नुसार, मुदतीपेक्षा जास्त काळ राहणे, व्हिसा अटींचे उल्लंघन करणे किंवा प्रतिबंधित क्षेत्रात अतिक्रमण करणे यासाठी तीन वर्षांचा तुरुंगवास आणि 3 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
सरकारने अल्टीमेटमनंतर ही भारत सोडून न जाणाऱ्या कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीला अटक केली जाईल, आणि त्यावर खटला चालवला जाईल. 4 एप्रिलपासून लागू झालेल्या इमिग्रेशन अँड फॉरेनर्स अॅक्ट 2025 नुसार, मुदतीपेक्षा जास्त काळ राहणे, व्हिसा अटींचे उल्लंघन करणे किंवा प्रतिबंधित क्षेत्रात अतिक्रमण करणे यासाठी तीन वर्षांचा तुरुंगवास आणि 3 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
कायद्यात काय म्हटलयं?
जो कोणी परदेशी व्यक्ती व्हिसा देण्यात आलेल्या कालावधीपेक्षा जास्त काळ भारतातील कोणत्याही क्षेत्रात राहतो किंवा कलम 3 च्या तरतुदींचे उल्लंघन करून वैध पासपोर्ट किंवा इतर वैध प्रवास दस्तऐवजाशिवाय भारतात राहतो किंवा त्याच्या अंतर्गत कोणत्याही भागात प्रवेश आणि वास्तव्यासाठी त्याला देण्यात आलेल्या वैध व्हिसाच्या अटींचे उल्लंघन करणारे कोणतेही कृत्य करतो, तसेच (ब) कलम 17 आणि 19 व्यतिरिक्त या कायद्याच्या इतर कोणत्याही तरतुदींचे किंवा त्याअंतर्गत केलेल्या कोणत्याही नियमाचे किंवा आदेशाचे किंवा या कायद्याच्या अनुषंगाने दिलेल्या कोणत्याही निर्देशाचे किंवा या कायद्याच्या अंतर्गत कोणत्याही विशिष्ट शिक्षेची तरतूद नसलेल्या आदेशाचे किंवा निर्देशाचे उल्लंघन करतो, त्याला तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा किंवा तीन लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असे कायद्यात म्हटले आहे.
कोणताही पाकिस्तानी भारतात राहू नये याची खात्री करण्याचा अमित शाह यांचा आदेश
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून देश सोडण्यासाठी निश्चित केलेल्या अंतिम मुदतीपेक्षा जास्त काळ कोणताही पाकिस्तानी भारतात राहू नये याची खात्री करण्यास सांगितले. मुख्यमंत्र्यांशी शाह यांच्या दूरध्वनी संभाषणानंतर, केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी मुख्य सचिवांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हिसा रद्द करण्यात आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना निश्चित मुदतीपर्यंत भारत सोडण्याची खात्री करण्यास सांगितले. महाराष्ट्र सरकारकडून देखील या संदर्भात ठोस पाऊले उचलली जात असून, राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना भारताबाहेर पाठवण्याच्या हालचालींना वेग आला आहे.