Monday, September 15, 2025

भारत खरेदी करणार २६ मरीन राफेल फायटर्स

भारत खरेदी करणार २६ मरीन राफेल फायटर्स

फ्रांन्सशी झाला ६४ हजार कोटी रुपयांचा करार

नवी दिल्ली: भारत सरकार नौदलासाठी 26 राफेल मरीन लढाऊ विमान खरेदी करणार आहे. यासंदर्भात आज, सोमवारी फ्रान्सशी 64 हजार कोटी रुपयांच्या खरेदी करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या कराराच्या स्वाक्षरी कार्यक्रमावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि नौदलाचे व्हाइस चीफ व्हाइस ऍडमिरल के. स्वामीनाथन उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील या महिन्याच्या सुरुवातीला सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने भारतीय नौदलासाठी 26 अत्याधुनिक राफेल-मरिन लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली होती. या स्पर्धात्मक प्रक्रियेत अमेरिकन बोईंग एफ/ए 18 सुपर हॉर्नेटचाही समावेश होता. पण भारतीय नौदलाने राफेल लढाऊ विमानांची निवड केली. राफेल हे भारतीय आवश्यकतेनुसार अधिक योग्य असल्याचे आढळून आले. त्यामुळे राफेलची निवड करण्यात आली आहे.

ही राफेल विमाने अत्याधुनिक शस्त्र प्रणालींनी सुसज्ज असतील. यात लांब पल्ल्याची हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध यांचा समावेश असेल. या करारानुसार भारतात विमाने निर्मिती करणे अनिवार्य नसले तरी, राफेलमध्ये सहभागी असलेल्या डसॉल्ट, थेल्स आणि एमबीडीए सारख्या फ्रेंच कंपन्या त्यांच्या भारतीय भागीदारांना स्थानिक पातळीवर उपकरणे आणि उपप्रणाली निर्मितीसाठी ऑर्डर देण्याची शक्यता आहे.

या करारातर्गंत 22 सिंगल सीट राफेल-एम आणि 4 डबल ट्रेनर सीट राफेल-एम विमाने भारताकडून खरेदी करण्यात येणार आहेत. हिंदी महासागरातच ही विमाने तैनात केली जाणार आहेत. युद्धनौका तसेच अणुप्रकल्पांवर हल्ला करण्यात ही विमाने तरबेज मानली जातात. आयएनएस विक्रांत या युद्धनौकेवर या विमानांचा तळ असेल. याआधीही भारताने सप्टेंबर 2019 मध्ये फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमानांची खरेदी केली होती. त्यासाठी 59 हजार कोटी रुपये मोजले होते.

Comments
Add Comment