Sunday, October 26, 2025
Happy Diwali

एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील १९ इमारतींमधील सर्व रहिवाशांना त्याच ठिकाणी घरे मिळणार!

एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील १९ इमारतींमधील सर्व रहिवाशांना त्याच ठिकाणी घरे मिळणार!

पुनर्विकास एमएमआरडीए करणार; फडणवीस-शिंदेंचा थेट दिलासा!

मुंबई : एल्फिन्स्टन पुलाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या १९ इमारतींबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेत येथील सर्व रहिवाशांना दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीत मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी स्थानिक रहिवाशांचा आवाज बुलंद करत मुद्दा लावून धरला. कालिदास कोळबंकर यांच्या सूचनेवर आधारित शिफारशीही समोर आल्या. मुळात, एल्फिन्स्टन पुलाच्या कामामुळे आधी १९ इमारतींना धोका होता; आता नव्या नियोजनामुळे केवळ २ इमारतींवर परिणाम होणार आहे. पण स्थानिक नागरिकांची भीती होती की "पुलाचे काम सुरू झाल्यावर अन्य १७ इमारतींनाही धोका निर्माण होईल!"

म्हणून भाजपा आमदार कालिदास कोळबंकर आणि अॅड. आशिष शेलार यांनी ठाम भूमिका घेत आक्रमकपणे मागणी केली की, "गिरणगावातील मराठी माणसाला उखडून फेकायला आम्ही देणार नाही. सगळ्या १९ इमारतींचा पुनर्विकास एमएमआरडीएनेच ताबडतोब करावा! कोणत्याही विकासकाची वाट पाहायची गरज नाही!"

मुख्यमंत्र्यांनीही हा आग्रह मान्य केला. त्यानुसार, संपूर्ण पुनर्विकासाच्या योजनेत, बाधित २ इमारतींतील रहिवाशांना कुर्ला येथे तात्पुरती घरे देण्यात येणार आहेत. आणि मग त्यांनाही आपल्या मूळ जागीच नव्या घरात वसवलं जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या निर्णयामुळे गिरणगावातील नागरिकांना आज मोठा दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment