Friday, May 23, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

तहव्वूर राणाला १२ दिवसांची एनआयए कोठडी

तहव्वूर राणाला १२ दिवसांची एनआयए कोठडी
नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला होता. या प्रकरणात तहव्वूर राणा याला दिल्लीच्या एनआयए न्यायालयाने बारा दिवसांची एनआयए कोठडी दिली आहे.



तहव्वूर राणा हा मूळचा पाकिस्तानचा नागरिक आहे. त्याने पाकिस्तानच्या लष्करात डॉक्टर म्हणून काम केले होते. कॅप्टन पदापर्यंत त्याला बढती मिळाली होती. पुढे तो लष्करातली नोकरी सोडून व्यावसायिक होण्यासाठी कॅनडाला गेला. कॅनडाचा नागरिक झाला. व्यवसायाच्या निमित्ताने विविध देशांचे दौरे करू लागला. भारतात व्यवसायाच्या निमित्ताने येऊन तहव्वूर राणाने मुंबईची पाहणी केली. नंतर तहव्वूर राणाने दिलेल्या माहितीचा वापर करुन पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला होता.



व्यावसायिक असल्याचे नाटक करुन मूळचा पाकिस्तानचा आणि नंतर कॅनडाचा नागरिक झालेला तहव्वूर राणा लष्कर - ए -तोयबा या अतिरेकी संघटनेसाठी काम करत होता. तहव्वूर राणा हा मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याचा एक सूत्रधार आहे, असा आरोप भारतीय तपास संस्थांनी केला आहे. सध्या तहव्वूर राणा विरोधात दिल्लीच्या एनआयए न्यायालयात कायदेशीर कारवाई सुरू आहे.

याआधी अतिरेकी संघटनेशी आणि त्यांच्या कट कारस्थानाशी संबंधित असल्याच्या आरोपावरुन तहव्वूर राणाला अमेरिकेच्या तपास यंत्रणेने अटक केली होती. राणाला अमेरिकेच्या न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. पण काही वर्षांनंतर तब्येतीचे कारण सांगून तहव्वूर राणाने जामीन मिळवला होता. यानंतर काही वर्षांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील चर्चेतून मार्ग निघाला. अखेर तहव्वूर राणाला मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्याप्रकरणी प्रमुख आरोपी म्हणून १० एप्रिल २०२५ रोजी दिल्लीत विशेष विमानाने आणण्यात आले. यानंतर सखोल चौकशी करुन अखेर तहव्वूर राणाला एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दिल्लीच्या एनआयए न्यायालयाने तहव्वूर राणाला १२ दिवसांची एनआयए कोठडी दिली.
Comments
Add Comment