आठ लेकरांमध्ये सर्वांत ‘धाकटी लेक’ असणारी ती सर्वांची लाडकी होती. मागेल तो हट्ट पुरवायला मोठे ४ भाऊ, ३ बहिणी आणि आई-वडील होते असं ती नेहमी अभिमानानं सांगते. मग तुला त्यावेळी शाळेत का घातलं नाही? या प्रश्नाचं उत्तर मात्र तिच्याकडं नसतं. याबाबत तिला खंत असते मात्र ती कुणाला दोष देत नाही.
लग्नानंतर मात्र ती जवळजवळ माहेर इतकच मोठं असलेल्या कुटुंबांची ‘थोरली सुन’ होते. सासरबद्दल तक्रारीचा सुर नसला, तरी नव्वदच्या दशकात जी कौटुंबिक व्यवस्था होती त्यात ‘धाकटी लेक’ आणि ‘थोरली सुन’ यातील फरक तिने नक्कीच अनुभवला होता.
त्यात भर म्हणून ज्या व्यक्तीसोबत आपल्या साताजन्माच्या गाठी बांधल्यात त्या व्यक्तीला दारू पिण्याचं ‘व्यसन’ आहे, हे समजल्यानंतर, कित्येक वेळा त्याचे चटके सहन केल्यानंतरही जोडीदाराबद्दल माहेरच्यांकडे एक ‘ब्र’ सुद्धा न काढता, कित्येक वेळा मरणाच्या दारात पोहोचून सुद्धा आपलं घर न सोडता, स्वत:चं दु:ख झाकून ठेऊन कुटुंबाच्या भविष्याचा विचार करत ती कणखर बनली. परिस्थितीची ‘येसन’ तोडून कुटुंबाच्या गाडीचं चाक दारिद्र्याच्या चिखलात रूतू द्यायचं नसेल आणि पोरांना शिक्षणाचं बाळकडू पाजायचं असेल, तर आपल्याबरोबरच जोडीदाराच्या खांद्यावरचा काही भारही आपल्याला ओढावा लागेल, हे वास्तव स्वीकारून नातेवाईकांचा विरोध पत्करून ती ‘कासारीन’ बनली.
गावोगावी फिरून बांगड्या भरल्या. दोन मुलांना घडवताना, पतीची बिघडत जाणारी तब्येत सांभाळताना ती परिस्थितीशी दोन हात करून ‘मर्दानी’ सारखी लढली. पतीच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी पोराला ‘बापाला तू शब्द दिलाय ना, की माझा १२ वीचा रिझल्ट लागला की, तुम्हाला माझा अभिमान वाटेल असे मार्क्स असतील.” ते जिथंपण असतील तिथं त्यांना अभिमान वाटायला पाहिजे. तू शिकला, तरच आपला संघर्ष संपेल’ म्हणत मला परीक्षेला पाठवत ‘खंबीर आई’ची भूमिका तिने निभावली.
मोठ्या मुलगा डी. एड. झाल्यानंतर आणि धाकट्या मुलाचं डी. एड. सुरू असताना मोठ्या मुलाला नोकरी लागत नाही म्हटल्यावर अनेकांनी तिला सल्ला दिला, की त्याला गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी कामाला पाठवा. पण पोराला कामाला नाही पाठवणार ‘तो करेल तर नोकरीच!’ असं म्हणत बांगड्या विकण्याबरोबरच गावी आणि परगावी दुसऱ्यांच्या शेतात तिने मजुरी केली आणि थोरल्या लेकाला पण पुढील शिक्षणासाठी बाहेर पाठवलं. मी शिक्षक म्हणून नोकरीला लागल्यानंतर, राहायला घर नसताना सुद्धा सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेताना तिचा पूर्ण पाठिंबा होता. ‘आपला संघर्ष काय अजून थोडे दिवस सुरू राहील, पण तुला जे आवडतं ते कर’ असं म्हणत माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवणारी माझी ‘आक्का’ हीच अभ्यासाच्यामागे माझी खूप मोठी प्रेरणा होती. अभ्यास करताना कधी अभ्यासातून लक्ष विचलित होऊ लागलं की मला दुसऱ्याच्या शेतात काबाडकष्ट करणारी माझी माय आठवायची. तिच्या विश्वासाला पात्र ठरत मी २०१२ मध्ये ‘आयएएस’ (तिच्या भाषेत ‘कलेक्टर’ झालो). काही महिन्यांपूर्वी मी दुसऱ्या वेळी ‘कलेक्टर’ म्हणून चार्ज घेतला तेव्हा ती ऑफिसमध्ये आली होती. ती खूपवेळ फक्त कुतूहलाने माझ्याकडे बघत होती. तिच्या चेहऱ्यावर लेकाविषयीचा अभिमान स्पष्टपणे दिसत होता.
तिच्या भरलेल्या डोळ्यांकडे बघून मी कल्पना करत होतो की, ‘जिल्ह्यातील मुलींना शिक्षण मिळावे ही जबाबदारी माझ्याकडे आहे हे समजल्यावर तिच्यातील न शिक्षण घेता आलेल्या मुलीला काय वाटत असेल? अवैध दारू उत्पादनावर आम्ही कारवाया करतो म्हटल्यावर पतीच्या दारूच्या व्यसनामुळे संसार उद्ध्वस्त झालेल्या तिच्यातील एका ‘स्त्री’ ला काय वाटत असेल? जिल्ह्यातील सरकारी हॉस्पिटलच्या सर्व आरोग्य योजना लोकांपर्यंत कशा पोहोचतील याच्यासंबंधी मिटींग आम्ही करतो हे सांगितल्यावर, पती आजारी असताना कित्येक वेळा सरकारी दवाखान्यात दुर्लक्षितपणा अनुभवलेल्या तिच्यातील पत्नीला काय वाटत असेल? संघर्षाच्या काळात घरावर छत नसताना आमचं नाव बीपीएलमध्ये लावा आणि आम्हाला पण ‘इंदिरा आवास’मधून एक घरकूल मंजूर करा म्हणून तलाठ्याच्या ऑफिसचे उंबरठे झिजवलेल्या पण कधीही लाभार्थी न बनू शकलेल्या त्या महिलेला जेव्हा आज आपल्या पोराच्या सहीने जिल्ह्यातील बेघर लोकांना घरे मिळतात हे समजल्यावर तिच्या मनात काय भावना येत असतील? पतीचं निधन झाल्यावर एक-दीड वर्षे ज्या महिलेकडून ‘विधवा पेंशन’ मिळवून देते म्हणून गावातील सरकारी व्यवस्थेतील एका महिला कर्मचारीने पैसे उकळले होते हा कटू अनुभव पाठिशी असताना आज आपला मुलगा कॅम्प लावून जागच्या जागी लोकांना पेंशन मिळवून देतो हे समजून तिच्यातील त्या पेंशनसाठी अर्थिक शोषण झालेल्या महिलेला काय वाटत असेल?…’
आयएएस झाल्यापासून गेल्या ६ वर्षांत ती खूप वेळा मला म्हटलीय, ‘रमू, जे दिवस आपण बघितलेत, भोगलेत तशी लई लोकं इथंपण आहेत. त्यांच्या अडचणी आधी ऐकत जा. त्यांची काम करत जा. गरीब लोकांचे आशीर्वाद कमव फक्त. देव काहीसुद्धा कमी पडू देणार नाही!’एक मात्र नक्की… असं संस्काराचं आणि प्रेरणेचं विद्यापीठ घरात असताना मनातील संवेदनशीलता आणि लोकांसाठी काम करण्याची तळमळ जीवंत ठेवायला अजून कशाचीच गरज नसते.
दिल्ली: इंडियन प्रीमियर लीगमधील आजच्या सामन्यात घरच्या मैदानावर दिल्लीला पराभवाचा धक्का बसला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने…
छत्रपती संभाजीनगर : जगात आपल्या देशाची आरोग्य व्यवस्था सर्वात मोठी असून या आरोग्यव्यवस्थेने प्रगती केली…
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कोकण रेल्वे प्रशासनाने मोठी मोहीम चालवली…
नवी दिल्ली : पहलगाम अतिरेकी हल्ला झाल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत आहे. या…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. नाव आणि धर्म…
मंदसौर : भरधाव वेगाने जात असताना अनियंत्रित झालेली इको व्हॅन दुचाकीला धडकून विहिरीत पडली. या…