Sunday, April 27, 2025
Homeसाप्ताहिककोलाजअक्षय्य होण्यासाठी...

अक्षय्य होण्यासाठी…

भावार्थ देखणे

आज हिंदू धर्मालाही अक्षय्य होण्याची गरज आहे. तो व्यापक आहे. मात्र काही रुढींमुळे तो संकुचित होत असेल, तर त्यांचा त्याग करणे तितकेच गरजेचे आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चांगल्या कामाचा प्रारंभ करावा तसेच अयोग्य गोष्टींचा त्यागही करावा. महान लोकांनी सांगितलेल्या मार्गाने वाटचाल होते तेव्हा त्यालाच पंथ असे म्हणतात. आज ती परंपरा निर्माण करणे गरजेचे आहे. या अर्थाने या अक्षय्य तृतीयेचे महत्त्व जाणवते. आपल्या संस्कृतीमध्ये काही दिवसांना खास महत्त्व आहे. ‘अक्षय्य तृतीया’ हा असाच एक दिवस. या दिवसाला मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तातील हा अर्धा मुहूर्त कोणत्याही शुभकामाचा प्रारंभ करण्यासाठी उचित समजला जातो. त्यामुळेच या मुहूर्तावर आत्मोन्नती अणि समाजोनत्तीसाठी सुयोग्य असणारी कामे केली जातात. आत्मोन्नतीसाठी जपजाप्य, अनुष्ठान तर समाजोन्नतीसाठी दान-धर्म आदी कामे हाती घेतली जातात. कारण या दिवशी सुरू केलेले सारे काही अक्षय्य होत असल्याचा विश्वास, श्रद्धा बघायला मिळते. या दिवशी केलेले चांगले काम अविनाशी होते. सत्य असणारे, ज्ञान देणारे आणि अनंत असणारे सगळे काही ब्रह्म असल्याचे आपण म्हणतो. म्हणूनच ब्रह्माची, ब्रह्मतत्त्वाची उपासना करणारे आपण सगळेजण या दिवशी अविनाशी, शाश्वत, चिरस्थायी, अक्षय्य अशा कार्याचा, उपासनेचा प्रारंभ करतो. जसे की, ग्रंथ अक्षय्य आहेत. कीर्तन परंपरा अविनाशी आहे. याचप्रमाणे यज्ञयागही अविनाशी आहे. तेव्हा अशा कोणत्याही मार्गे अविनाशी कामाचा आरंभ करण्यास हा दिवस उत्तम मानला जातो. असे केल्यास ती गोष्ट ब्रह्मतत्त्वात विलीन होते. अक्षय्य तृतीयेचे हेच प्रयोजन आहे.

व्यावहारिक दृष्टिकोनातून बघायचे, तर या दिवशी मोठी खरेदी केली जाते. यामागेही घर, ऑफिस, मौल्यवान दागदागिने, वाहने, प्रावरणे यासारख्या गोष्टींचा दीर्घकाळ आनंद मिळत राहावा, त्याच्या वापरातून मिळणारा आनंद वृद्धिंगत व्हावा हीच भावना दिसते. म्हणूनच या दिवशी अक्षय्य राहण्यायोगे काम करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असावा असे वाटते. या दिवशी तर्पणही करतात. केवळ हिंदू धर्मामध्येच नाही, तर जैन धर्मातही या दिवसाला मोठे महत्त्व आहे. या दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली, असे म्हणतात. म्हणूनच हा प्रारंभीचा दिवस शुभ असल्याची सार्वत्रिक भावना बघायला मिळते. आपल्या प्रत्येक सणामागे ऋतूचा विचार दिसतो. सध्याचे उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गरजूंना दानस्वरुपात पादत्राणे, छत्री आदी उन्हापासून रक्षण करणाऱ्या वस्तू दिल्या जातात. त्याचप्रमाणे वाटसरूंची पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या उद्देशाने पाणपोया सुरू केल्या जातात. थोडक्यात, या सणाला सामाजिक दृष्टिकोनातूनही वेगळे महत्त्व आहे. दानही समाजोपयोगी असावे, हाच संदेश याद्वारे दिला जातो. खेरीज हा दिवस परशुरामाचा जन्मदिनही आहे. त्यामुळे या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते. त्याचबरोबर घरोघरी बसलेल्या चैत्रागौरीला निरोप देण्याचा हा दिवस आहे. या दिवशी मैत्रिणींना, परिचित महिलांना बोलावून कैरीचे पन्हे, भिजलेले हरभरे, काकडी, कलिंगड, कैरीची डाळ असे थंड पदार्थ देऊन सन्मानित केले जाते. मोगऱ्याचे गजरे देत वाढत्या झळा सुसह्य करण्याचा एक सुगंधी प्रयोग या दिवशी पार पडतो. थोडक्यात, हा सण आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहेच; खेरीज आम्रफलाचे, उसाच्या रसाचे सेवन करून तो बदलत्या ऋतूशी आहार-विहार जोडणाराही आहे. पूजा आणि कर्मकांडाच्या बरोबरीने सणाशी जोडलेला हा भाग सांस्कृतिक आणि सामाजिक उत्थापनाच्या निमित्ताने महत्त्वाचा आहे, हे समजून घ्यायला हवे.

सध्या लोकांची मानसिकता, प्रवृत्ती, विचार करण्याची कुवत, अभ्यासाची क्षमता, एकाग्रता हे सगळे पाहता अक्षय्य राहण्याच्या दृष्टिकोनात संतांचे विचार, संतसाहित्याचा अभ्यास करण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. याचे कारण निर्मळ, निस्वार्थी, कार्यक्षम असणारा समाज अक्षय्य राहणे गरजेचे आहे. संतसाहित्याच्या अभ्यासातून समाजामध्ये या गुणांचे वर्धन होऊ शकते. अगदी आध्यात्मिक जाणिवांचा वा अभिव्यक्तीचा विचार केला, तर यातही सध्या सहजता हरवलेली दिसते. आपल्या आध्यात्मिक जाणिवा, विचारांची बैठक दाखवण्याची; त्याचे प्रदर्शन करण्याची वृत्ती बघायला मिळते, तेव्हा हे कुठे तरी थांबायला हवे असे प्रकर्षाने जाणवते. आजच्या समाजाने सगळ्यातील सहजता हरवली आहे. आपण खुलभर दुधाची कथा ऐकली आहे. घरातील सगळ्यांना देऊन, वासराला पुरेसे दूध पाजून उरलेले दूध त्या वृद्धेने शिवाला अर्पण केले आणि तेवढ्याशा दुधानेच गाभारा भरून गेला. पण या कथेचे सार आज कोणाच्याही स्मरणात नाही. अर्पण भावनेतील सहजता आता राहिलेली नाही. अध्यात्म हे दाखवण्याचे साधन झाल्यामुळे आता प्रतिष्ठेचे लक्षण होऊ पाहात आहे. म्हणूनच या चुकीच्या पद्धती बंद करण्यासाठी या दिवसाचे औचित्य साधणे गरजेचे वाटते. संतांनी आपल्याला हेच विचार दिले आहेत. म्हणूनच प्रत्येकाने या अक्षय्य विचारांचा अंगिकार करायला हवा. संतविचारांनी समाजाला दिशा दाखवली. या विचारांची कास धरून आणि त्याचा अंगिकार करूनच समाजात अनेक क्रांतिकारक, सुधारक, स्वातंत्र्यसैनिक घडले. संतांनीच समाजात प्रथम समानता आणली, ऐक्यभाव आणला. समाज कोणत्याही एका धर्माच्या चालीरितींवर चालत नसतो. सर्वांना सवे घेऊन जातो, तोच समाज अक्षय्य होतो. हा विचार संतांनी दिला आहे. जगात किती तरी संस्कृती आल्या आणि लयास गेल्या. किती तरी राज्ये उदयाला आली आणि संपली. आज त्यांचा लवलेशही राहिलेला नाही. मात्र संतांच्या खंबीर आणि सगळ्यांना एकत्र ठेवण्याच्या विचारांमुळे आपला समाज, इथली संस्कृती अक्षय्य राहिली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, गोरा कुंभार, सेना न्हावी, चोखोबा यांच्या नावाने आजही दिंड्या निघतात. हरिनाम सप्ताह पार पडतात. म्हणजेच या रुपाने ते अक्षय्य आहेत. त्यांचे काम, विचार अक्षय्य आहेत. संतपरंपरेनेच समाजाने डावललेल्या लोकांना अभंगातून व्यक्त होण्याची प्रेरणा दिली. विश्वास ठेवून त्यांच्यातील दिव्यशक्ती जागृत केली आणि ती अक्षय्य झाली. मात्र आज आपण हे विसरलो आहोत.

आजचा समाज जातीपातीच्या राजकारणात अडकत चालला आहे. स्वातंत्र्यानंतर संविधानाने जातीपातीतील भिंती तोडण्याचे काम केले असले तरी आजही त्याला फारसे यश मिळालेले दिसत नाही. म्हणूनच एकतेचा, समतेचा, बंधुत्वाचा संतांनी सांगितलेला विचार अक्षय्य राहावा, असे या निमित्ताने सांगावेसे वाटते. ती तुम्हा-आम्हा प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण जातीपातीच्या भिंतींमध्ये समाजाचे विघटन होऊ लागले आहे. समाजाची ताकद संपू लागली आहे. परकीय आक्रमणाच्या काळात सगळ्यांनी एकत्र राहण्याची संतांनी ओळखलेली गरज आजचा तथाकथित आधुनिक आणि शिक्षित समाज विसरत चालला आहे. वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या जपत आपल्यापर्यंत पोहोचलेला ठेवा आपण हरवत चाललो आहोत. समाजकारण, राजकारणामधील चुकीचे विचार या नुकसानाला कारक ठरत आहेत. म्हणूनच यातून बाहेर पडणे ही अक्षय्य तृतीयेच्या दिवसाची खरी गरज आहे, असे वाटते. असे झाले तरच आपण हा दिवस खऱ्या अर्थाने साजरा केला, असे म्हणता येईल.
आज धर्माच्या नावानेही अनेक चुकीच्या गोष्टी बघायला मिळत आहेत. त्या निश्चितच समाजाला अक्षय्य सुखाच्या दिशेने नेणाऱ्या नाहीत. इथे लक्षात घ्यायला हवे की, परंपरा आणि रुढी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. परंपरा उज्ज्वल असते. त्याला ठोस पाया असतो. प्रत्येक परंपरेचे काही तरी म्हणणे असते. जसे की, महाराष्ट्रात वारीची परंपरा आहे आणि आजही ती कायम आहे. त्यामुळेच ती अक्षय्य आहे. तेव्हा धर्मामध्येही परंपरा सुरू राहून चुकीच्या, कालबाह्य रुढी मात्र बंद होणे गरजेचे आहे, असे वाटते. हे साधले तर धर्मही खऱ्या अर्थाने अक्षय्याच्या दृष्टीने पुढे जाईल. आज हिंदू धर्मालाही अक्षय्य होण्याची गरज आहे. तो व्यापक आहे. मात्र काही रुढींमुळे तो संकुचित होत असेल, तर त्यांचा त्याग करणे, संपवणे देखील तितकेच गरजेचे आहे. म्हणजेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चांगल्या कामाचा प्रारंभ करावा तसेच अयोग्य गोष्टींचा त्यागही करावा. महान लोकांनी, श्रेष्ठांनी सांगितलेल्या मार्गाने वाटचाल होते तेव्हा त्यालाच पंथ असे म्हणतात. आज ती परंपरा निर्माण करणे गरजेचे आहे. या अर्थाने अक्षय्य तृतीयेचे महत्त्व जाणवते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -