बंगळुरू : आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ४४ सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये सर्व संघांनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेऊन समालोचक आणि टीम इंडियाचा माजी खेळाडू अनिल कुंबळे याने प्ले ऑफमध्ये कोण पोहोचेल याबाबतचे भाकीत वर्तविले आहे. अनिल कुंबळेच्या मते गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या पाच पैकी चार टीम प्ले ऑफमध्ये पोहोचतील. प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या बाबतीत गुजरात, दिल्ली, मुंबई आणि पंजाब यांची शक्यता सर्वाधिक आहे.
सध्या आयपीएल २०२५ गुणतक्त्यात गुजरात टायटन्स हा संघ पहिल्या स्थानावर, दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या, पंजाब किंग्स चौथ्या आणि मुंबई इंडियन्स पाचव्या स्थानी आहेत. गुजरात आणि दिल्ली या दोन संघांनी यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत प्रत्येकी आठ सामने खेळून आणि सहा सामने जिंकून गुणतक्त्यात आघाडी घेतली आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांनी प्रत्येकी नऊ सामने खेळले आहेत. बंगळुरू नऊ पैकी सहा तर पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स नऊ पैकी पाच सामने जिंकू शकले आहेत. पंजाबचा एक सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिला. समसमान गुण असल्यास धावगतीच्याआधारे गुणतक्त्यातील स्थान निश्चित करण्यात आले आहे.
मुंबई इंडियन्स रविवारी लखनऊ सुपर जायंटन्स विरोधात मैदानात उतरणार आहे. हा सामना मुंबईत वानखेडेवर होणार आहे. यामुळे घरचा सामना जिंकून स्पर्धेतील स्वतःची स्थिती भक्कम करण्याची संधी मुंबईकडे आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सुरुवातीचे सामने हरलेल्या मुंबईने नंतर कामगिरी सुधारत उसळी मारली आहे. हे बघता मुंबईला प्ले ऑफमध्ये धडक मारण्याची संधी आहे, असा विश्वास अनिल कुंबळेने व्यक्त केला आहे.
संध्याकाळी दिल्लीच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने असतील. हा सामना दिल्ली जिंकण्याची शक्यता जास्त आहे. कारण दिल्लीचा संघ फॉर्मात आहे, शिवाय आजचा सामना दिल्लीच्या मैदानात आहे. याआधी जेव्हा दिल्ली आणि बंगळुरू आमनेसामने होते त्यावेळी दिल्लीने बंगळुरू विरुद्धचा सामना सहा गडी राखून जिंकला होता. यामुळे कुंबळेने आयपीएल २०२५ च्या प्ले ऑफमध्ये गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स हे संघ जाण्याची शक्यता जास्त असल्याचे मत व्यक्त केले आहे.