लता गुठे
भारतीय परंपरेमध्ये वाद्याला फार महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक देवतेचे काही ना काही वाद्य असते. उदाहरणार्थ शंकराचे डमरू, सरस्वतीची विना आणि कृष्णाची बासरी हे तर सर्व परिचित आहेत. सर्व वाद्यांमध्ये सर्वांनाच मोहीत करतो तो बासुरीचा मधुरव. बासरी म्हटले की आठवते ती राधा कृष्णाच्या प्रेमाला साक्षी असलेली बासरी. कुठून तरी दूरवरून बासरीचा आवाज ऐकू आला तरी तो आपले लक्ष वेधून घेतो आणि बासरीमधून निघालेले सूर थेट आपल्या हृदयाला पोहोचतात. अशी अलौकीक बासरी याविषयी मला जाणून घेण्याची उर्मी निर्माण झाली आणि इतिहासात तिच्या पाऊल खुणा शोधू लागले… भारतीय संगीत परंपरेमध्ये बासरी या वाद्याचे एक विशेष स्थान आहे. सहज, सौम्य आणि आत्मीय आवाज देणारे हे वाद्य केवळ संगीताचे साधन न राहता, अध्यात्म, भक्ती आणि निसर्ग यांच्याशी जोडले गेले आहे. पुराणकथांपासून ते आधुनिक संगीतापर्यंत बासरीची छाप सर्वच संगीत क्षेत्रातील प्रेमींवर पडते. कृष्णाच्या बासरीपासून ते पं. हरिप्रसाद चौरसियांच्या शास्त्रीय मैफलीपर्यंत, बासरीचे रूप अनेक पिढ्यांतून बदलत गेले असले तरी त्याचे मूळ सौंदर्य आणि पारंपरिक महत्त्व आजही टिकून आहे.
ग्रामीण भागांमध्ये पूर्वी गुराखी गाईंना चारण्यासाठी रानामध्ये जायचे. संध्याकाळच्या वेळेला सूर्य मावळतीकडे ढळला की गाई-वासरांना हाकारत त्याच्यामागे चालणारा गुराखी बासरी वाजवत हिरव्या कुरणांमधून यायचा. त्या वेळेला बासरीचा मधुर स्वर सारा परिसर आणि ती सायंकाळची वेळ मंत्रमुग्ध व्हायची. त्यावेळेला प्रत्येक बासरी वाजवणाऱ्या मुलांमध्ये बाळकृष्णाचे रूप आठवल्याशिवाय राहत नसायचे. या बासुरीचा इतिहास जाणून घेऊया. बासरीचा इतिहास अतिशय जुना आहे हे आपण जाणतोच आहोत. प्राचीन भारतात याचा उल्लेख ‘बंशी’, ‘मुरली’, ‘वेणू’ अशा नावांनी झाला आहे. वेदांमध्ये देखील वंशीचा उल्लेख आहे. महाभारत आणि रामायण यांसारख्या महाकाव्यांतही बासरीचे वर्णन आढळते. विशेषतः भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनाशी बासरीचे अतूट नाते आहे. त्यांच्या लीलांमध्ये बासरीचा महत्त्वपूर्ण सहभाग दिसतो. बासरी ही बांबूच्या अथवा इतर पोकळ लाकडांपासून बनवलेली एक सुलभ वाद्ययंत्र आहे. तिची रचना साधी असून तोंडाजवळ एक फुंकण्याची जागा व पुढे काही सूरनिर्धारणासाठी छिद्रे असतात; परंतु या साध्या रचनेतून निर्माण होणारा स्वर खूपच आत्म्याला भिडणारा असतो.
बासरी या वाद्यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व तर आहेच त्याबरोबर ती भारतीय संस्कृतीची ओळखही आहे. त्यामुळे बासरीचे स्थान फक्त एक वाद्य म्हणून न राहता कृष्ण भक्तांसाठी ते कृष्णाचे प्रेम भक्ती याचेही प्रतीक मानले जाते. बासरीच्या स्वरामध्ये आत्म्याची अर्तताही आहे. त्यामुळे बासुरीचा संबंध प्रेमाची जोडला गेलेला आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी बासुरी वाजवली जाते तेव्हा तिचे सूर वेगळे असतात आणि विरहामध्ये जेव्हा बासरी वाजवली जाते तेव्हा तिचे सूर वेगळे जाणवतात. त्यामुळे ईश्वराशी एकरूप होण्याचे सामर्थ्य बासरीच्या स्वरात असल्यामुळे त्या रूपाशी तादात्म्य पावण्याची शक्ती या वाद्यामध्ये आहे. यामुळे ती आत्म्यातून उमटणाऱ्या भक्ती भावनांना मूर्त स्वरूप देते. हे आपण अनेक ग्रंथांमधून वाचत आलो आहोत. पौराणिक ग्रंथांमध्ये असे वर्णन आहे की कृष्णाच्या बासरीच्या ध्वनीने गोप-गोपिका मंत्रमुग्ध होत असत, पशुपक्षी स्तब्ध होत आणि निसर्गदेखील त्या ध्वनीला प्रतिसाद देत असे. अशा प्रकारे बासरी ही निसर्ग आणि मानव यांच्यातील संवादाचे एक साधन ठरते.
पर्वतराज्यांमध्ये बासरीचा वापर मेंढपाळ, शेतकरी यांच्याद्वारे त्यांच्या विरंगुळ्याच्या आणि मनोरंजनाच्या साधनासाठी केला जातो. त्यामुळे बासरी हे ग्रामीण जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आजही आदिवासी संस्कृतीमध्ये बीजाला अंकुर फुटल्यानंतर शेतकरी शेताच्या बांधावर बसून बासरी वाजवतात त्यांचं म्हणणं असं आहे की बासरीमुळे पिकांची वाढ चांगली होते आणि बिजाचे मोड कोमेजून जातात तरारून वर येतात. भारतीय शास्त्रीय संगीतातील स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. बासरी ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये एक अत्यंत महत्त्वाचे वाद्य आहे. विशेषतः धृपद, ख्याल आणि लाइट म्युझिकच्या सादरीकरणामध्ये बासरीचा प्रभाव खूप मोठा आहे. तिच्या सजीव, लयबद्ध आणि आत्मीय ध्वनीमुळे अनेक शास्त्रीय गायक-वादक बासरीचा उपयोग साथीच्या वाद्यासाठी करतात. पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यासारख्या बासरी वादकांनी बासरीला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. त्यांनी बासरीच्या विविध प्रकारांच्या संयोगाने अनेक रचनांमध्ये नवीन प्रयोग केले आणि बासरीला सोलो वाद्य म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली.
लहान मोठ्या अशा विविध आकारांमध्ये बासऱ्या पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे बासरीचे सुरांनुसार विभाजनही होते. मंद्र सप्तकातील बासरी जाड, लांब व भारी असते; मध्यम सप्तकाची बासरी थोडी लहान आणि हलकी असते; तर तार सप्तकासाठी अगदी लहान बासरी वापरली जाते. अशाप्रकारे विविध वाद्य प्रकारासाठी अशा वेगवेगळ्या बासऱ्या वापरल्या जातात. लोक संगीतामध्ये तर बासरीचे अनन्य साधारण महत्त्व आहे. भारताच्या विविध प्रांतांमध्ये म्हणजे महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, उत्तरप्रदेश अशा विविध प्रांतांमध्ये पारंपरिक लोकगीतांमध्ये बासरीचा समावेश दिसून येतो. विशेषतः महाराष्ट्रात भावगीते, लोकगीते, लावणी, गवळण अशा पारंपरिक शैलींमध्ये बासरीचा उपयोग भावनात्मकता वाढविण्यासाठी केला जातो. बासरी आणि निसर्ग या दोन्हीचा संबंध एकरूपतेचा आहे. मुळातच बासरी ही निसर्गाच्या सान्निध्यात बासरीच्या सुरांमध्ये निसर्गाचे एक विशेष प्रतिबिंब उमटते. झुळूक वाऱ्याची सरसर, पक्ष्यांचे कूजन, नद्यांचा खळखळाट. या सर्वांचे अनुकरण बासरी सहजपणे करते.
म्हणूनच अनेक वेळा बासरी वाजवताना श्रोते निसर्गाच्या सान्निध्यात बासरी वादनाचा अनुभव घेतात. बासरी वाजवताना श्वासाची गती, शरीराची हालचाल आणि वातावरण यांचा सुसंवाद साधला जातो. बासरीचा उपयोग चित्रपट संगीत, फ्युजन, वर्ल्ड म्युझिक, मेडिटेशन ट्रॅक्समध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. विविध आधुनिक वाद्यांच्या साथीने बासरीला नव्या साजाने सजवले जाते आणि तिच्या सौंदर्याला नवीन अर्थ प्राप्त होतो. बासरीच्या स्वरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची शक्ती आहे. म्हणून बासरी हे फक्त एक संगीत वाद्य नसून तिच्यामध्ये एक मनाला आनंद, शांती देणारी आध्यात्मिक शक्ती आहे. भारतीय संस्कृतीचा सांस्कृतिक वारसा आहे. तिच्या सुरांत भक्ती आहे, सौंदर्य आहे, प्रेम आहे. ती मानवाच्या अंतर्मनाशी संवाद साधते. पारंपरिक महत्त्व असलेली बासरी आजही तिचं स्थान टिकवून आहे. एकही संगीत प्रेमी असा नसेल की त्याला बासरीचे स्वर आवडत नाहीत.भारतीय संगीत परंपरेत बासरीचे अनमोल स्थान आहे. मनाला सदैव ताजेतवाने ठेवण्याचे काम बासरी करते. बासरीचे महत्त्व समजून घेऊन, तिच्या सुरांच्या गंधाने आपले जीवन अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न प्रत्येक संगीतप्रेमीने करायला हवा.