नवी दिल्ली: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूज पेजेश्कियान यांनी शनिवारी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून बातचीत केली. यावेळेस त्यांनी या दुर्घटनेतील पिडीतांबाबत संवेदना व्यक्त केली.
दहशतवाद्यांनी २२ एप्रिलला पहलगामच्या बैसारन खोऱ्यामध्ये पर्यटकांवर हल्ला केला होता. यात २६ लोकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला २०१९च्या पुलवामा हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा हल्ला होता. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.
इराणच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींना केला फोन
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी एक्सवर लिहिले, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूज पेजेश्कियान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोनवरून जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. तसेच पीडितांबद्दल संवेदना व्यक्त केली. कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद खपवून घेतला जाणार नसल्याच्या गोष्टीवर दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती व्यक्त केली.
इराणच्या समर्थनासाठी पंतप्रधान मोदींनी मानले आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इराणच्या समर्थनासाठी आभार व्यक्त केले आहेत. तसेच क्षेत्रीय सहकार्य आणि एकता दहशतवादाविरुद्ध जागतिक लढाईसाठी आवश्यक असल्याच्या मतावर नवी दिल्ली तसेच तेहरान यांनी सहमती दर्शवली.