अर्चना सोंडे
पहलगाम हल्ल्याने पाकिस्तानचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा जगाला दिसला. २६ निरपराध भारतीय नागरिकांना अतिरेक्यांनी गोळ्या घालून ठार केले. त्यात कोणाचा पती, कोणाचे वडील, कोणाचा मित्र, तर कोणाचा भाऊ मारला गेला. या भ्याड दहशतवादी हल्ल्याने अवघे जग हळहळले. असाच अतिरेकी हल्ला १६ वर्षांपूर्वी एका घरावर झाला होता. त्यावेळी एका तरुणीने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे तिचं कुटुंब तर वाचलंच, पण अतिरेक्यांना सुद्धा तिने यमसदनी धाडलं. ही प्रेरणादायी गोष्ट आहे, काश्मीरमधल्या रुखसाना कौसर या तरुणीची.
२७ सप्टेंबर २००९ ची रात्र रुखसानाच्या कुटुंबासाठी काळरात्र ठरली. कलसी येथे तिच्या घराजवळ घनदाट जंगल आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास अतिरेक्यांनी तिच्या घराचे दार ठोठावायला सुरुवात केली. रुखसानाच्या वडिलांनी काहीच साद दिली नाही. आतून कोणी प्रतिसाद देत नाही हे पाहून अतिरेक्यांचा राग अनावर झाला. तेव्हा ते घरात जबरदस्तीने खिडक्यांमधून घुसू लागले. रुखसानाच्या आईने तिला आणि तिच्या भावाला ताबडतोब एका खाटाखाली लपवून ठेवले. तिचे बाबा नूर हुसेन अतिरेक्यांशी लढण्यासाठी एकटे बाहेर पडले होते. आपल्या वडिलांना अडचणीत पाहून रुखसाना शांत बसू शकली नाही. तिच्या बाबांच्या तोंडातून रक्त वाहत होते. रुखसाना प्रतिकार करण्यासाठी काहीतरी शोधू लागली. शोधत असतानाच तिला बाजूला पडलेली कुऱ्हाड दिसली. तिने क्षणाचाही विचार न करता एका अतिरेक्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यामुळे रुखसानाची हिंमत वाढली. अतिरेकी कमांडर अबू उसामा बेशुद्ध. त्याचे इतर सहकारी घाबरून गेले. रुखसाना एवढ्यावरच थांबली नाही. तिने तिचा लढा सुरूच ठेवला. उरलेल्या अतिरेक्यांशीही ती दोन हात करू लागली. त्यात मारल्या गेलेल्या अतिरेक्याची एके-४७ रायफल तिच्या हातात आली. तिने अतिरेक्यांवर रायफलमधून गोळ्या झाडल्या. त्यात आणखी एक अतिरेकी जखमी झाला. बाकीचे अतिरेकी जीव वाचवण्यासाठी पळून गेले.
अशा कठीण प्रसंगात देखील प्रसंगावधान दाखवत तिने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तत्काळ जंगलात लपलेल्या अतिरेक्यांचा शोध घेत त्यांना पकडले. रुखसाना आणि तिच्या भावाच्या शौर्यामुळे काही अतिरेकी मारले गेले, तर काही पकडले गेले. मारला गेलेला अतिरेकी लष्कर-ए-तैयबा (LeT) या दहशतवादी संघटनेचा नेता असल्याचे निष्पन्न झाले.
सरकारने तिच्या शौर्याने प्रभावित होत तिला पोलीस दलात रुजू करून घेतले. राजौरी येथील तिच्या गावी पोलीस हवालदार म्हणून तिला पोस्ट मिळाली. तिच्या या अलौकिक शौर्याकरिता भारत सरकारने तिला कीर्ती चक्र बहाल केले. कौसरने कबीर हुसेनशी लग्न केले होते, जो आता राजौरी येथे सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून तैनात आहे. तिला तीन मुली आहेत. मिसबाह कबीर, सबा कबीर आणि सुमेरा कबीर. आपल्या मुलींनी दहशतमुक्त वातावरणात वाढावे, त्यांनी शिक्षित होत जबाबदार नागरिक व्हावे अशी रुखसानाची इच्छा आहे. त्या घटनेनंतर तिचा भाऊ आणि काका यांना देखील पोलीस दलात नोकरी मिळाली. तिच्या अतुलनीय शौर्यामुळे तिला अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले. यामध्ये कीर्ती चक्र पुरस्कार, राष्ट्रीय शौर्य पुरस्कार, सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, सरदार पटेल पुरस्कार, राणी झाशी शौर्य पुरस्कार आणि आस्था पुरस्कार यांचा समावेश आहे.
मात्र असे असले तरी देखील कौसरच्या कुटुंबाला सप्टेंबर २००९ च्या घटनेमुळे अनेक धमक्यांचा सामना करावा लागला आहे. सुरुवातीच्या काळात कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात आले होते; परंतु कालांतराने ते सोडून द्यावे लागले. पोलीस संरक्षण देऊनही, दहशतवाद्यांनी तीनदा रस्ता अपघात करून कौसर आणि तिच्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केला.
“आजही, मी हार मानत नाही आणि मला जे योग्य वाटते त्यासाठी लढते. स्त्रिया दुबळ्या नसतात. जर महिलांनी काही करण्याचा संकल्प केला, तर त्या कोणत्याही क्षेत्रात पुरुषांना मागे टाकू शकतात,” असे ती आत्मविश्वासाने सांगते. पहलगामसारखे अतिरेकी हल्ले हे थांबतील याची काही चिन्हे नाहीत. सरकार त्यासाठी उपाययोजना करेल. मात्र एक नागरिक म्हणून आपण देखील धैर्याने आलेल्या संकटास तोंड दिले पाहिजे हाच धडा रुखसाना कौसर समस्त भारतीय समाजाला देत आहे. निव्वळ निषेध मोर्चा काढून उपयोग नाही. या अतिरेक्यांशी जेव्हा सामान्य नागरिक निर्भिडपणे भिडेल तेव्हा कोणताच अतिरेकी आपल्या वाटेला जाणार नाही. हाच संदेश रुखसानाची शौर्यगाथा आपल्याला देत आहे.