जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांचा इशारा
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. यादरम्यान या दहशतवादी हल्ल्यात कथित सहभाग असल्याचा बदला म्हणून भारत पाकिस्तानमध्ये पाण्याचा एक थेंबही वाहून जाऊ देणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असा खणखणीत इशारा जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी शुक्रवारी दिला आहे.
भारताने १९६० चा पाकिस्तानबरोबर करण्यात आलेला सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पुढील धोरण ठरवण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर जलशक्ती मंत्र्यांनी हे विधान केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पाटील यांच्या व्यतिरिक्त इतर अनेक मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी या उच्चस्तरीय बैठकीला उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही निर्देश जारी केले आहेत आणि त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी याकरिता अमित शहा यांनीही काही सूचना दिल्याचे पाटील म्हणाले. त्यानंतर पाटील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये ते म्हणाले की, सिंधू जल कराराबाबत मोदी सरकारने घेतलेला ऐतिहासिक निर्णय हा कायद्याला धरून आणि राष्ट्रहिताचा आहे. सिंधू नदीचे एक थेंबही पाणी पाकिस्तानात जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. भारताने पाकिस्तानला आम्ही दहशतवाद सहन न करण्याबाबात कठोर भाषेत संदेश दिला आहे, असेही पाटील म्हणाले.
पहलगाम हल्ल्याच्या तटस्थ चौकशीसाठी तयार
पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरुद्ध भारताला जागतिक पाठिंबा मिळत असताना, पाकिस्तानवर दबाव वाढत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याच्या ‘तटस्थ, पारदर्शक आणि विश्वासार्ह’ चौकशीसाठी पाकिस्तान तयार असल्याचे म्हटले आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील काकुल येथील पाकिस्तान मिलिटरी अकादमीमध्ये पासिंग-आऊट परेडला संबोधित करताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबत वाढत्या तणावावर मौन सोडले. ते म्हणाले की, ‘पाकिस्तान काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तटस्थ आणि पारदर्शक चौकशीत सहकार्य करण्यास तयार आहे. शांततेला आमची पसंती आहे.
दहशतवादाचे कंबरडे मोडण्याची तयारी
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा दलांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर काश्मीरमधील संवेदनशील भागांमध्ये लष्कर, सीआरपीएफ आणि इतर सुलक्षा दलांनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा दलांकडून अत्यंत सतर्कता बाळगून शोधमोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेंतर्गत अनंतनाग जिल्ह्यातील विविध भागात धाडी टाकण्यात आल्या असून, दहशतवादी कारवाया आणि दहशतवाद्यांना सहकार्य करण्याच्या संशयावरून आतापर्यंत सुमारे १७५ जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचण्यास सुरुवात केली आहे.
सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर १४ दहशतवादी
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे काम लष्कराकडून केले जात आहे. आता काश्मीर खोऱ्यात उपस्थित असलेल्या स्थानिक दहशतवाद्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काश्मीरमध्ये १४ स्थानिक दहशतवादी सक्रिय आहेत. यादीत आदिल डेंटू, जैश-ए-मोहम्मद, एहसान शेख, हरीश नझीर, आमिर वाणी, अहमद भट्ट, आसिफ अहमद कंडे, नसीर अहमद वाणी, शाहिद अहमद कुटे, आमिर अहमद दार, अदनान सफी दार, जुबैर वाणी, हारून रशीद गनी, झुबेर गनी या दहशतवाद्यांचा समावेश आहे.