Monday, April 28, 2025

स्वभाव

प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ

जपानमधल्या पहिल्याच दिवशी एक वेगळा अनुभव मिळाला. तिकडच्या हॉटेलमध्ये आम्ही नाष्ट्यासाठी गेलो होतो. प्रत्येकाच्या हातातील कुपन बघून ते विचारत होते की, तुम्ही किती जण एकत्र आहात? मी आणि माझ्या मैत्रिणीने सोबत असल्याचे सांगितले. तेव्हा एक माणूस आम्हाला सोबत घेऊन गेला आणि त्याने आम्हाला एका टेबलावर बसवले. टेबल सहा माणसांचे होते. त्या टेबलाच्या मध्यावर एक काचेची स्क्रीन होती जी हिरवा रंग दाखवत होती. तो माणूस म्हणाला की, तुमचा नाश्ता झाला की, खालचे बटन दाबा म्हणजे ही स्क्रीन लाल रंगाची होईल तोपर्यंत हा टेबल कोणालाही दिला जाणार नाही. ही त्यांची पद्धत आम्हाला खूप आवडली. कारण खांद्यावरच्या पर्समध्ये पासपोर्ट असल्यामुळे पर्स एक मिनिटसुद्धा खाली ठेवणे शक्य नसायचे; परंतु टेबल नंबर लक्षात ठेवून आम्ही वाढून घ्यायला गेलो. शंभरच्या वर असलेल्या पदार्थांमधून आपण काय खाऊ शकू, याचा विचार करण्यात खूप वेळ गेला आणि मग आपण वाढून घेऊन आपल्या टेबलापर्यंत आलो तेव्हा तो टेबल जणू आपलीच वाट पाहत बसलेला दिसला, याचे बरे वाटले. म्हणजे त्याचा कोणीही ताबा घेतलेला नव्हता.

एखादी गोष्ट आवडली म्हणून किंवा चहा-कॉफी, ज्यूससाठी आपण उठलो तरी आपल्या टेबलावर कोणीही येऊन बसणार नाही याची खात्री होती. त्यामुळे एका वेळेस दोघीजणी सोबतही उठू शकलो! हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे आमच्या बाजूला सहा माणसांचा टेबल होता. ज्यावर केवळ एक जपानी माणूस बसलेला होता. तो काहीतरी वाढून घेण्यासाठी उठला तितक्यात आमच्याच ग्रुपमधल्या एक बाईने आपली पर्स त्या टेबलाच्या कोपऱ्यावर ठेवली आणि तिने आपल्या नवऱ्याला फोटो काढायला सांगितले जेणेकरून त्या हॉटेलमध्ये उत्कृष्टपणे मांडलेले पदार्थ तिच्या फोटोत मागच्या बाजूला व्यवस्थित दिसावेत असे. इतक्यात हा जपानी माणूस काहीतरी वाढून घेऊन आला आणि त्याच्या खुर्चीवर बसला. तो बसला होता त्याच्या विरुद्ध कोपऱ्यावर या बाईने ठेवलेली पर्स पाहून तो चिडला. त्याने त्या बाईला आवाज दिला म्हणजे ‘बाई’, ‘मॅडम’ असा काही तो शब्द नव्हता बहुतेक जापनीज शब्द होता. मला समोर हे दृश्य दिसत होते. त्यामुळे मी त्या बाईला म्हटले की, अहो तो तुम्हाला बोलवत आहे. त्या बाईने त्यांच्याकडे वळून पाहिले, तर त्यांनी सांगितले की आधी ही पर्स उचला. तो हे जापनीजमध्ये बोलला; परंतु त्याच्या ॲक्शनवरून बाईला काय ते उमगले आणि तिने पर्स उचलली. आता एखाद्या माणसाला एक फोटो काढायला कितीसा वेळ लागणार? पण तितकाही मिनटा-दोन मिनिटांचा संयम या माणसाकडे नव्हता किंवा त्याच्या टेबलावर ठेवलेली वस्तू त्याला आवडली नाही. इथे कदाचित हायजिनचा (स्वच्छता) प्रश्न असेल किंवा त्याच्या रिझर्व्ह नेचरचा. (राखीव स्वभावाचा) याच गोष्टीमुळे जितके लोक सोबत एकत्र आहेत त्यांना एकत्रितपणे टेबल दिला जातो मग भले एक माणूस का सहा माणसांच्या टेबलावर असेना!

पहिल्याच दिवशी असा अनुभव आल्यामुळे आम्ही सहसा रस्त्यात भेटलेल्या जापनीज माणसांची बोलायला धजावलो नाही. तसेही त्यांना तरी कुठे आमच्याशी बोलायचे होते म्हणा? ते त्यांच्या कामात. दोन दिवसांनंतर आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो तिकडची वाय-फाय सर्विस (इंटरनेट आणि इतर नेटवर्कशी जोडणी) चालू नव्हती. मी रिसेप्शनमध्ये फोन करून याविषयी सांगितले. तीन मिनिटांत एक मुलगी आमच्या दाराशी आली. तिने बेल वाजवली. मी दार उघडल्यावर तिने तिची बूटं दाराशी काढून ठेवले आणि ती सॉक्स घालून आतमध्ये आली. तिच्या हातामध्ये कोणतेतरी यंत्र होते. त्याची जोडणी करून तिने आमची वाय-फाय सर्विस सुरू करून दिली. त्यानंतर ती मोबाईलमध्ये काहीतरी बराच वेळ टाईप करत होती. त्यानंतर तिने तो मोबाईल माझ्यासमोर धरला. मी त्यावर वाचत गेले. त्यात इंग्रजीमध्ये असे लिहिले होते की वाय-फाय सर्विस चालू नसल्यामुळे आपल्याला जो त्रास झाला त्यासाठी हे हॉटेल आणि मी आपली क्षमा मागते. गुगल ट्रान्सलेटर वापरून तिने जापनीजमध्ये जे काही टाईप केले होते ते मला इंग्रजीमध्ये वाचता आले.

जपानमध्ये ९० टक्के लोकांना अजिबातच इंग्रजीचे ज्ञान नाही; परंतु या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून ते कमीत कमी अशा तऱ्हेने आमच्याशी संवाद साधू शकले. मी तिच्या मोबाईलवर वाचताना सुद्धा तिच्या डोळ्यांतले आणि चेहऱ्यावरचे भाव वाचत होती तिला खरंच वाईट वाटल्याचं त्यातून प्रतीत होत होते. माझे वाचून झाल्यावर मी फोन तिच्या हातात दिला ती कमरेतून वाकली आणि तिने हात जोडून क्षमा मागितली.

अशी जपानमध्ये वावरत असताना अनेक माणसांची अनेक उदाहरणे आहेत. शेवटी माणूस सारखाच. एका हॉटेलमधील एक जपानी पाहुणा आणि त्याची एका भारतीय बाईशी वर्तणूक आणि दुसऱ्या हॉटेलमधील भारतातील आपण पाहुणे असताना तेथील हॉटेलच्या जपानी कर्मचाऱ्यांची आपल्याशी वर्तणूक पाहता जपानी माणूस म्हणजे असा… असे कोणतेही विधान आपण करू शकत नाही. ते दोघेही आपापल्या पद्धतीने बरोबरच होते. आपल्याला याविषयी काय वाटते बरे …?

pratibha.saraph@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -