Monday, April 28, 2025
Homeसाप्ताहिककोलाज“मिशी”... पुरुषाच्या अस्मितेचे, संस्कृतीचे आणि स्त्रीच्या मनाचे प्रतीक!”

“मिशी”… पुरुषाच्या अस्मितेचे, संस्कृतीचे आणि स्त्रीच्या मनाचे प्रतीक!”

डॉ. वैशाली वाढे

भारतीय संस्कृतीत प्रत्येक वस्तू, पोशाख किंवा शृंगाराचा अर्थ खोल आहे. स्त्रीसाठी ‘कुंकू’ जसे सौंदर्याच्या पलीकडे जाऊन तिच्या कुटुंबाशी असलेल्या नात्याचे, सत्त्वशुद्धतेचे आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जाते, तसेच पुरुषासाठी ‘मिशी’ ही केवळ चेहऱ्याची शोभा नसून त्याच्या आत्मविश्वासाची, परंपरेची आणि जबाबदारीची ओळख आहे. इतिहासात डोकावलं, तर आपण पाहतो की भारतातील बहुतेक थोर योद्धे, संत, क्रांतिकारक व राजे हे मिशीधारी होते. छत्रपती शिवाजी महाराजांची दिमाखदार मिशी त्यांचं तेज, शौर्य आणि नेतृत्व अधोरेखित करत होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असलेल्या स्वाभिमानाला मिशी अधिक भारदस्तपणे दर्शवते.

तात्या टोपे, झाशीच्या राणीचे सहकारी, त्यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांना झुंजवत ठेवले. त्यांची घनदाट मिशी त्यांचं बाणेदार, निर्भय आणि स्वदेशप्रेमी व्यक्तिमत्त्व व्यक्त करत होती.

स्वातंत्र्यवीर सावरकरांची मिशी ही केवळ सौंदर्यदृष्टीने नाही, तर विचार आणि विद्रोहाचे प्रतीक होती. त्यांची मिशी ही त्यांच्या क्रांतिकारी विचारांची आणि इंग्रजांच्या विरुद्ध बंडखोरीच्या मनोवृत्तीची जणू खूण होती. क्रांतिवीर भगतसिंग यांचं प्रगल्भ आणि गांभीर्यपूर्ण व्यक्तिमत्त्व त्यांच्या मिशीमधूनही व्यक्त होत असे. त्यांचं नेतृत्व, शिस्त आणि राष्ट्रहितासाठी घेतलेली ठाम भूमिका याला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने आणि स्वरूपाने अधिक ठोसपणा दिला.

राजपूत योद्धे, विशेषतः महाराणा प्रताप यांचे उदाहरणही घेतले तर, त्यांची कमानीसारखी उठलेली मिशी त्यांच्या अभिमानाचे, न झुकणाऱ्या वृत्तीचे आणि स्वराज्यासाठी प्राण देणाऱ्या वृत्तीचे प्रतीक होती.

आजही ग्रामीण भागात किंवा पारंपरिक कुटुंबांमध्ये मिशी ही पुरुषाच्या प्रतिष्ठेची आणि परंपरेशी जोडलेल्या अस्मितेची निशाणी आहे. अगदी लहान मुलाच्या ‘राजा ड्रेस’ मध्येही मिशी चिकटवली जाते. कारण आपल्या मानसिकतेत ही प्रतिमा खोलवर रुजली आहे.

हल्ली अनेक तरुण पुन्हा मिशीकडे वळताना दिसत आहेत. ‘स्टाईल’ म्हणून नाही, तर ‘स्टेटमेंट’ म्हणून! कारण मिशी असलेला चेहरा सांगतो… “मी तयार आहे!… जबाबदाऱ्या निभवायला, माझं मत मांडायला आणि माझ्या संस्कृतीचा अभिमान बाळगायला!”. अर्थात, आधुनिक काळात ‘क्लिन शेव्ह’ हे फॅशनचे प्रतीक बनले आहे, आणि ती सुद्धा व्यक्तिस्वातंत्र्याची एक अभिव्यक्तीच आहे. पण तरीही, आज अनेक तरुण पुन्हा मिशी ठेवण्याकडे वळताना दिसतात. कारण त्यांना त्या मिशीत एक ओळख, एक अभिमान, एक संस्कृतीची जाणीव आहे. जशी कुंकू लावलेली स्त्री सुंदर आणि आकर्षक वाटते, शृंगाराने सजलेली वाटते, तशीच अनेक स्त्रियांना “मिशी असलेला” पुरुष हा आकर्षक वाटतो. कारण त्यामागे केवळ शारीरिक आकर्षण नसून एक सुरक्षिततेची, कणखरतेची, स्थैर्याची भावना असते. एका आदर्श पुरुषाचं चित्रण करतांना स्त्रीच्या मनात जी प्रतिमा तयार होते, ती बऱ्याच वेळा “मिशीधारी, आत्मविश्वासपूर्ण, ठाम विचारांचा पुरुष” अशी असते. काहींसाठी ती ग्रामीण बाण्याची आठवण असते, काहींसाठी आपल्या वडिलांची आठवण, तर काहींसाठी ती ‘हिरो’सारखी छबी असते.

तेव्हा मित्रांनो, “मिशी ठेवा!… ती तुमची इतिहासाशी, परंपरेशी आणि स्वाभिमानाशी जोडलेली फक्त ओळख नसून ती तुमच्या मनगटातली ताकद, तुमच्या मनातील विचार आणि कोण्या स्त्रीच्या डोळ्यांतील ‘आदर्श’ आहे !”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -