डॉ. वीणा सानेकर
माझे बाबा लालबागच्या एका रात्रशाळेत शिक्षक होते. त्यांनी मुलांकडून करून घेतलेल्या एका हस्तलिखिताची एक प्रत आमच्या घरी होती. त्याचे संपादकीय बाबांच्या मोत्यांसारख्या अक्षरात होते. मुलांच्या कविता, गोष्टी, लेख, चित्रे यांनी अंक सजलेला होता. हस्तलिखिताची अशी सुंदर प्रतिमा लहानपणापासून माझ्या मनात कायम घर करून राहिली. मी पुढे जेव्हा सोमैया महाविद्यालयात मराठी अध्यापनासाठी रुजू झाले तेव्हा ही हस्तलिखिताची कल्पना मनात सारखी रुंजी घालू लागली. मुलांना विविध प्रकारचा आशय निर्माण करण्यासाठी संधी देणे हा अशा प्रकारच्या उपक्रमाचा उद्देश. अलीकडे ‘कन्टेन्ट’ हा परवलीचा शब्द झाला आहे. स्वतःची अभिव्यक्ती करण्यासाठी भाषा घडवावी लागते. नक्कल करण्याच्या अनेक वाटा उपलब्ध असताना स्वत:ची वाट तयार करावी लागते. आमच्या विभागातील विद्यार्थांचा आशय हा हस्तलिखित अंक १९९५ साली प्रथम प्रकाशित झाला. त्यानंतर दरवर्षी मुले आशयची निर्मिती करू लागली. वर्षातून एक किंवा दोन अंक साकार करणे हे मुलांच्या उत्साहावर अवलंबून असते. अभिजित देशपांडे या माझ्या सहकार्याने देखील ही कल्पना चांगलीच उचलून धरली. विविध विषयांवर आधारित आशय प्रकाशित होऊ लागले. अक्षरांचा श्रम करण्याच्या उपकमातून चांगले पत्रकार, निवेदक, माध्यमकर्मी घडले. १९९५ पासून आजवर एखाद्या अंकाची सातत्यपूर्ण वाटचाल सुरू असणे ही शिक्षकाला समाधान देणारी गोष्ट आहे.
मुळात मुलांच्या भाषा घडणी करता ३ ते १५ वर्षे हा उत्तम कालखंड असतो. या वयात त्यांना बोलण्याचे ऐकण्याचे व्यक्त होण्याचे विविध अनुभव देणे गरजेचे असते आणि त्याकरता बाल साहित्य मुलांसाठी विविध अंक यांची फार मोठी मदत होते. मुलांच्या मनामध्ये मराठीची रुजुवात व्हावी म्हणून धडपडणारे एक व्यक्तीमत्त्व म्हणजे मानकर काका. मुलांच्या दिवाळी अंकाचे स्वप्न पाहणारे मानकर काका म्हणजे एक आगळावेगळा माणूस! भन्नाट कल्पनांनी झपाटलेला! टॉनिक नावाचा काकांचा दिवाळी अंक त्यांनी खूप मनापासून जपला. काका कुशल संपादक, तर होतेच पण लेखकाची बीजे त्यांच्यात नक्कीच दडलेली होती. काका त्यांच्या अंकातून माझं एवढं एकाच नावाचे छोटे संपादकीय लिहायचे. ते छोटे पण मार्मिक असायचे. दिवाळी अंकाचे गठ्ठे घेऊन काका शाळा शाळांतून फिरायचे. लेखकांना लिहायला लावायचे. काकांनी दिवाळी अंकाचा संसार दीर्घ काळ पाहिलाच, पण मुलांच्या मराठी वर्तमानपत्राचाही संसारही मांडला. संबंध भारतात तेव्हा अशा प्रकारचा प्रयोग झालेला नव्हता. असे वर्तमानपत्र चालणार नाही असे कुणी म्हटले की, काका हसत म्हणायचे की, मलाही ९९ टक्के असेच वाटते.
१९८९ मध्ये वर्षभर काकांनी साप्ताहिक स्वरूपात चालवला. पुढे एक रुपया फंड ही कल्पना लढवून काकांनी वर्तमान काढायची धडपड सुरू केली. काकांनी अनेक कवी साहित्यिक जोडले होते, त्यामुळे त्यांना साहित्य मिळेल अशी खात्री होती. वितरण, छपाई यांचा खर्च, मनुष्यबळ तोकडे असताना करावी लागणारी वणवण, सर्व काही पणाला लावून (अगदी कथाकाकूचे दागिनेही) पणाला लावून घेतलेला ध्यास, काकांनी या सर्वातून रोजचा तोटा सहन करून जमेल तितके दिवस वर्तमानपत्र काढले.
आज काका जगात नाहीत पण मराठीच्या इतिहासात पहिल्या आणि (कदाचित अजून तरी शेवटच्या) मुलांच्या ‘टॉनिक’ या मराठी वर्तमान पत्राची नोंद व्हायलाच हवी. घरी मोठ्यांच्या वर्तमानपत्राप्रमाणे मुलांचे वर्मानपत्र येते आहे आणि मुले ते आनंदाने वाचत आहेत हे चित्र महाराष्ट्रात कधीतरी दिसेल हे स्वप्नच आहे. स्वतः पाहिलेल्या महाराष्ट्रातील तमाम मुलांच्या स्वप्नांचा ध्यास घेऊन आर्थिक तोटा सोसणारी माणसे किती आहेत? आणि ज्या मुलांनी मराठीत वाचन करायचे ती मराठी शाळांतील मुले तर ओसरत चालली.