जयवंत दळवींचे मत्स्यप्रेम

वृंदा कांबळी


एक मोठा लेखक म्हणून तसेच एक मोठा माणूस म्हणून ते जगावेगळेच होते. दळवी हे एक मनस्वी लेखक होते तशाच त्यांच्या आवडी-निवडी, खाण्यापिण्याच्या सवयी याही मनस्वी होत्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील आरवली या समुद्र किनारी वसलेल्या गावात त्यांचे बालपण गेले. समुद्र किनारा लाभलेला असल्याने अर्थातच ताजे मासे व भात हेच त्यांचे आवडीचे अन्न असायचे. बालपणीच्या चवी व आवडी मोठेपणीही तशाच राहिल्या.


जयवंत दळवी यांनी आपल्या या मत्स्यप्रेमाबद्दल अगदी मोकळेपणी सांगितले आहे. ते वाचल्यावर हा माणूस एक लेखक म्हणून व माणूस म्हणूनही दळवी कसे जगावेगळेच होते याचा प्रत्यय येतो. खाण्यात, जेवण्यात त्यांची स्वतःची अशी वेगळी स्वतंत्र आवड होती. सर्वसामान्य माणसांपेक्षा ती वेगळी होती व ती आपली आवड ते जपत होते. पावसाळ्यात खाडीतील छोट्या माशांना विशेष चव असते. ते मासे दळवी पावसाळ्यात खात असत. पावसाळा संपताना मिळणारे बांडगुळे, पेडवे, इणगे असे मासे त्यांना प्रिय होते. इणगेत भरपूर काटे असतात. ते काट्यासकट खावे लागतात. हे मासे आरवली किंवा गोव्यातच मिळत असत. पापलेटमध्येही कापरा, नेमूड या जाती दिवळीकडे मिळतात. दिवाळीकडे येणारा बांगडा चविष्ट असतो. याच दरम्यान भरपूर अणकुचीदार काटे असणारा कर्ली नावाचा मासा मिळतो. तो तिरका कापावा लागतो म्हणजे त्यातील काटे सोडवता येतात.


दळवी सांगतात की, बाजारात येणारी फ्रोझन कोलंबी प्लॅस्टिक पाकिटातून येतात. ती कोलंबी दळवी पाहतही नसत. खाडीत मिळणारी हिरव्या रंगाची कोलंबी, काही पांढऱ्या रंगाची, पावसाळ्यात मिठागरात तयार होणारी शेवाळी रंगाची कोलंबी ते आणत असत.


दळवी जेव्हा स्वतःच्या मासे प्रेमाविषयी सांगतात तेव्हा त्यांच्यातील मिश्कील, विनोदी लेखक जागा होतो. ते म्हणतात, “चांगली मासळी खाल्ल्याशिवाय दिवस चांगला जात नाही आणि स्वतः पाहून आणल्याशिवाय चांगली मासळी मिळू
शकत नाही.’’


दळवी स्वतः रोज बाजारात जाऊन मासळी पाहून खरेदी करून आणत. त्यांना रोज वेगळा मासा हवा असायचा. मासे खरेदी करण्याचेही एक वेगळे कौशल्य असते. दळवी म्हणतात, “ माशाला एक वेगळी कांती असते. ती बघून डोळे तयार झालेले असतात. बघितल्यावर हा मासा ताजा आहे की शिळा आहे हे समजते. ताजा व बिन बर्फाचा मासा तेजस्वी दिसतो. तो बघूनच आणावा लागतो “ दळवी रोज बाजारात जायचे. त्यांचे हे मस्त्यप्रेम कोळणींनाही माहिती झालेले होते. त्या खास चिजा दळवी येईपर्यंत लपवून ठेवत.


दळवींचे मस्यप्रेम व्यक्त होत असताना त्यांनी ‘मासे’ या विषयाचा सर्वांगाने केलेला अभ्यास लक्षात येतो. ते म्हणतात “स्वयंपाक करण्यासाठीही आंतरिक जाणिवा समृद्ध व्हाव्या लागतात. “प्रत्येक जातीच्या माशांची त्याच्या जातीनुसार रेसिपी त्यांना माहिती होती. पावसाळ्यात मिळणारी कोलंबी आणली, तर पावसाळ्यात मिळणारे अंबाडे घालून जाड रसाची आमटी, पेडवे आणले तर त्याचे आमटीऐवजी सुके करावे. त्यात तिरफळांचा वापर करावा. सुक्या बांगड्यांची चटणी कशी करावी हे दळवींनी अगदी सविस्तर सांगितले होते. आताही मत्स्यप्रेमी असतात. काही ‘फिश’ खाणारे असतात. पण दळवी म्हणतात, “ फिश खाणाऱ्यांचे मत्स्यप्रेम आणि माझे मत्स्यप्रेम यात फरक आहे. “ पापलेट, हलवा, रावस, सुरमयी यासारखे चार पाच माशांचे प्रकार नसतील, तर फिश खाणारे अस्वस्थ होतात. हे एका काट्याचे मोठे मासे व कोलंबी खाणेच त्यांना माहिती असते. पण दळवींची आवडनिवड वेगळीच होती. बोथ, मुडदा, खजुरी, काळुंद्री, मोदके, तांबोशी यांसारखे मासे व टपटप उड्या मारणारी खाडीतली कोलंबी यासारखे मासे पावसाळ्यात मिळतात ते दळवींना आवडत असत.


दळवींचा अत्यंत आवडता मासा म्हणजे ‘गोब्रा’. याविषयी ते भरभरून बोलले. “एखादा ब्रिटीश अधिकारी असावा असे त्याच्या नावावरून वाटते. तो बाजारात दुर्मीळ असतो. गोब्रा माशांची आमटी रूचकर असते. शेवयाचा चुरा करून त्यात खोबरे व कांदा घालून त्याची कळपुटी व वाफाळता भात असा गोब्रा वर्षातून एकदा तरी मिळाला पाहिजे’’ असे त्यांना वाटत असे. मासे कसे खावेत, ते कसे तयार करावेत कोणत्या जातीच्या माशासाठी कोणते पदार्थ व किती प्रमाणात कसे वापरावेत इत्यादी त्यांनी सांगितलेली माहिती वाचताना थक्क व्हायला होते.


छोट्या-छोट्या गल्लीबोळातील खाणावळी व छोटी हाॅटेल त्यांना माहिती होती की जेथे माशांचे कोणते प्रकार चांगले मिळतात ते दळवींना माहिती असायचे.


जयवंत दळवी हे एक संवेदनशील व चिंतनशील, अलौकिक प्रतिभा लाभलेले लेखक होते. जीवनातील अनुभवांना सामोरे जातानाही त्यांची स्वतःची अशी एक वेगळीच चोखंदळ अशी असामान्य दृष्टी जाणवत राहाते.


मग ती राहणीमानातील, चालण्या-बोलण्यातील असेल किंवा खाण्यापिण्यातीलही असेल. जे खायचं ते चवीनं खायचं. ही रसिकता त्यांच्या लेखकाच्या जीवनपटावर उठून दिसते. जीवनातील प्रत्येक अनुभव हा असा समरसून रसिकतेने घ्यावा असे त्यांचे जीवन होते. प्रत्येक विषयात ते खूप निरिक्षण करीत त्यावर चिंतन करीत. एखाद्या विषयाच्या मुळाशी जाऊन शोध घेत व त्यावर विचार करीत. त्यांच्या मत्स्यप्रेमातही ते तसेच वागले. मासे आवडतात म्हणून ताटात पडतील ते खावे असे नाही, तर माशांच्या जाती, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांची वेगवेगळ्या प्रकारची रेसिपी इत्यादी सर्व अंगाने त्यांनी या विषयावर केलेले निरिक्षण व अभ्यास त्यांच्यातील वेगळेपणाची साक्ष देतो.

Comments
Add Comment

क्रिकेटमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

तंत्रवेध : डॉ. दीपक शिकारपूर आज क्रिकेट सामन्याप्रसंगी तसेच नंतर ॲक्शन रिप्ले आणि हायलाईट्सच्या माध्यमातून

साहित्यातला दीपस्तंभ - वि. स. खांडेकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर विष्णू सखाराम खांडेकर हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरीकार, एक लोकप्रिय

ए मेरे दिल कहीं और चल...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे प्रत्येकाच्या जीवनात असा एखादा क्षण येऊन गेलेलाच असतो की जेव्हा त्यावेळी

वंदे मातरम्’ मातृभूमीचे सन्मान स्तोत्र

विशेष : लता गुठे भारतीय संस्कृतीचा विचार जेव्हा मनात येतो, तेव्हा अनेक गोष्टी मनात फेर धरू लागतात. अतिशय प्राचीन

पारिजातक वृक्ष पृथ्वीवर येण्याची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे पारिजातकाला स्वर्गातील वृक्ष असेही म्हटले जाते. पारिजात हा एक सुगंधी

घर जावई

क्राइम : अॅड. रिया करंजकर लग्न या संस्काररूपी संस्थेवरून तरुणांचा विश्वास उडत चाललेला आहे. शादी का लड्डू नही खावे