कथा – प्रा. देवबा पाटील
दररोज सकाळी नेहमी उशिरा उठणारा स्वरूप आता रोज सकाळी लवकर उठू लागला व आपल्या आजोबांसोबत बाहेर मोकळ्या हवेत मस्त फिरायला जाऊ लागला. असेच त्या दिवशीही ते दोघे फिरायला निघाले.
चालता चालता स्वरूपचे लक्ष गवताच्या झाडाच्या पानांवरील थेंबांकडे गेले. “आज सकाळी पाऊस नसूनही झाडांच्या पानांवर, हिरवळीवर ते पाण्याचे चमकदार थेंब कसे काय पडलेले दिसतात हो आजोबा?” स्वरूपने विचारले.
“वातावरणातील पाण्याच्या वाफेचे थंडीने गोठून जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वस्तूंवर हिमस्फटिक बनतात तेव्हा त्याला दहिवर किंवा दव म्हणतात. बऱ्याच वेळा रात्री हवेपेक्षा झाडाझुडपांची, वनस्पतींची पाने, गवत अधिकाधिक थंडगार होतात. हवेतील बाष्पकण जेव्हा या थंडगार पानांवर पडतात तेव्हा त्यांचे पाण्याच्या थेंबात रुपांतर होते. पाण्याच्या या गोलाकार थेंबांना “दवबिंदू” म्हणतात. सूर्योदयाबरोबर त्यांवर पडलेल्या प्रकाशामुळे हे दवबिंदू छानपैकी चमकतात. असे अनंत दवबिंदू एकत्र आल्याने “दव” बनते.” आजोबांनी सांगितले.
“आजोबा दवबिंदू गोलाकारच का दिसतात?” स्वरूप म्हणाला.
“दवबिंदू म्हणजे पाण्याचा थेंबच असतो. निसर्गाचा असा नियम आहे की, कोणतीही वस्तू शक्य तितका आपला पृष्ठभाग कमी होईल असा आकार धारण करते. गोलाकार हाच कमीतकमी पृष्ठभाग असलेला आकार असतो. कोणत्याही द्रवाच्या एका थेंबामध्ये लाखो रेणू असतात. त्यांच्यामध्ये खूप आकर्षण असते. त्यामुळे हे सारे रेणू परस्परांना स्वत:कडे ओढून धरण्याचा सतत प्रयत्न करत असतात. थेंबाच्या आतील भागातील रेणू हे थेंबाच्या पृष्ठभागावरील रेणूंना आपल्याकडे खेचून घेत असतात. तसेच पृष्ठावरील रेणूसुद्धा एकमेकांना आपल्याकडे ओढत असतात. म्हणजेच दवबिंदूच्या पृष्ठभागावर चोहीकडून पृष्ठीय ताण असतो. रेणूंच्या या आपसातील ओढाताणीमुळे म्हणजेच त्या ताणाने द्रवाच्या दवबिंदूचा आकार लहानात लहान असा तयार होतो. कोणत्याही इतर आकारांपेक्षा गोल आकाराचा पृष्ठभाग हा सर्वात लहान असतो म्हणून दवबिंदू हा गोलाकार बनतो.” आजोबांनी स्पष्टीकरण दिले.
“हे दवबिंदू चमकदार का दिसतात हो आजोबा?” स्वरूपने प्रश्न केला.
आजोबा म्हणाले, “दवबिंदूच्या थेंबावर पडलेल्या प्रकाशाचा काही भाग हा त्यातून पलीकडे आरपार जातो. त्यामुळे तो पारदर्शक दिसतो. तसचे काही प्रकाश त्यावरून परावर्तितही होतो. त्यामुळे तो चमकदारही दिसतो. अत्यल्प प्रमाणात प्रकाश दवबिंदूत शोषलाही जातो. हे गोलाकार दवबिंदू भरीव असल्याने बहिर्वक्र भिंगासारखे कार्य करतात म्हणून त्यातून गवताचे पान आपणांस थोडेसे मोठेही दिसते.”
“मग ते दिवसा का नाही दिसत आजोबा?” स्वरूपने विचारले.
“सूर्य जसजसा वर वर येतो तसतशी जमीन तापू लागते, वातावरणात थोडी थोडी उष्णता वाढू लागते व जमिनीवरील वस्तू, झाडेझुडपेही तापू लागतात. त्यामुळे त्यांवर असणाऱ्या दवाची वाफ होऊन ते दवबिंदू नाहीसे होतात.” आजोबा म्हणाले.
“दव कमी-जास्त कोणत्या काळात पडतो?” स्वरूपने प्रश्न केला.
“आकाश जेव्हा निरभ्र असते तेव्हा हवेत पाण्याची वाफ जास्त असते. झाडेझुडपे, गवत, रोपटे ही रात्री थंड असतात म्हणून या वेळी दव जास्त पडतो. थंडीच्या दिवसांत दव जास्त पडतो. जेव्हा वातावरण ढगाळलेले असते तेव्हा झाडेझुडपे रात्री जास्त थंड नसतात. त्यावेळी दव कमी पडते.” आनंदरावांनी सांगितले व बोलता बोलता मागे फिरले. स्वरूप समजून गेला की आता आपणास घराकडे जायचे आहे. तोही आजोबांप्रमाणे मागे फिरला.