Sunday, April 27, 2025
Homeसाप्ताहिककोलाजहे राष्ट्र देवतांचे

हे राष्ट्र देवतांचे

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
रामायणे घडावी येथे पराक्रमाची
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे

येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे

येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी भगवन्‌ तथागताचे

हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे

येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच ‘सत्य’ आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे

गीत : ग. दि. माडगूळकर
स्वर : राणी वर्मा

हे हिंदु नृसिंहा प्रभो…

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्ततम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना
करि अंतःकरण तुज अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची । चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी
जी बुद्धि पांच शाहींस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी

ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे
ती बुद्धि भाबड्या जिवां । लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं । वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो दिलें समर्थें तुज ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

गीत : स्वातंत्र्यवीर सावरकर
स्वर : लता मंगेशकर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -