Saturday, May 24, 2025

ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजरायगड

Nitesh Rane : हिंदू म्हणून एकत्र या, हे सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे

Nitesh Rane : हिंदू म्हणून एकत्र या, हे सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे

मंत्री नितेश राणे यांनी दिला दापोलीवासीयांना विश्वास


दापोली : आज आजूबाजूची परिस्थिती बदलत आहे, त्यामुळे तुम्ही हिंदू म्हणून एकत्र उभे राहा, भक्कमपणे उभे राहा, तुमच्यामुळेच आज राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे. ज्यांचे हात तुमच्या दिशेने दगड भिरकावतील, त्यांचा हिशोब चुकता करण्यासाठी आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत आणि हाच विश्वास देण्यासाठी आज मी इथे दापोलीला आलो आहे, असा विश्वास राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दापोलीतील धर्म सभेमध्ये उपस्थित हिंदू बांधवांना दिला. अडखळ बंदरात काही दिवसांपूर्वी पार्किंगवरून झालेल्या मारहाणीत हिंदू तरुणांना मारहाण झाली होती. खरे पाहता ही जागा बंदर विभागाची असताना तिथे अनधिकृत पार्किंग होत होते. या सगळ्याची दखल राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी घेत मारहाण झालेल्या हिंदू तरुणांची भेट घेतली.



यानंतर झालेल्या धर्मसभेत बोलताना नितेश राणे म्हणाले, तुम्ही कुणीही घाबरण्याचे कारण नाही, या सगळ्याचा हिशोब करायला मी इथे आलो आहे. सुरुवात त्यांनी केली आहे, या सगळ्याचा हिशोब होणार आहे. आमच्या लोकांची डोकी फोडली आहेत, त्यामुळे हिशोब बरोबरीचा झाला पाहिजे. इथल्या हिंदू समाजाने लक्षात ठेवायचे की, आता काळजीचे दिवस गेले आहेत, आता डोकी फोडण्याचे दिवस गेलेत, आता आपण सत्तेत आहोत, हे हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. आमच्यासारखे भगवाधारी मंत्री म्हणून तुमच्यासोबत आले आहोत, तुमच्याकडे वाकड्या नजरेने कोणी बघत असेल, तर त्याचा हिशोब चुकता करण्यासाठी मंत्रालयात पोहोचलो आहोत.


तुम्ही काळजी करू नका, खरेतर त्यांनी दगड मारण्याआधी या खात्याचा मंत्री कोण आहे, हे बघायला हवे होते. यांनीच अनधिकृत बांधकाम करायची, नियम तोडायचा, चुकीच्या ठिकाणी डंपर लावायचे, कायदे मोडायचे आणि मग दगड आमच्यावरच मारायचे, असे कसे चालेल असा सवाल विचारताना मंत्री नितेश राणे म्हणाले कदाचित ते विसरले असतील गृहखात्याचे मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री एक कडवट हिंदुत्ववादी नेता आहेत. तिथे देवेंद्र फडणवीस बसले आहेत याचा त्यांना विसर पडला आहे, आठवण करून द्यायला मी आहे आणि तुम्हाला विश्वास द्यायला, ताकद द्यायला आलो आहे राज्याचा मंत्री म्हणून मी इथे आलो आहे, हे हिंदुत्ववादी सरकार तुमच्या पाठीशी उभे आहे

Comments
Add Comment