फक्त आठच दिवसांपूर्वी मी काश्मीरच्या निसर्गसंपन्न कुशीत जाऊन आले. डोळ्यांत साठवून ठेवावं असं स्वप्नवत दृश्य. हिरव्यागार दऱ्या, बर्फाच्छादित पर्वतशिखरं, शांत झरे, नद्या आणि तितकेच मृदू, प्रेमळ लोक. स्वर्ग जर कुठे असेल, तर तो इथेच असं मनोमन वाटून गेलं. उगाचच नाही काश्मीरला भारताचं नंदनवन म्हणत! पहलगाम, सोनमर्ग, गुलमर्ग, श्रीनगर. प्रत्येक ठिकाणी सौंदर्याची नव्याने ओळख झाली. आयुष्यात एकदा तरी काश्मीर पहावं, ही इच्छा पूर्ण झाली. घरी परतल्यावर आनंदाने सर्वांनाच सांगत होते “ज्यांनी काश्मीर पाहिलं नाही त्यांनी नक्की जावं. आता काश्मीर खूप सुंदर आणि सुरक्षित आहे.” आणि… लगेचच हाच भ्याड हल्ला! तोही पर्यटकांवर? एवढ्या सुरक्षेच्या व्यवस्थेनंतरही? विश्वासच बसत नाही. त्या स्वर्गभूमीत मला एक गोष्ट अधिक भावली, ती म्हणजे आपलं सुरक्षा दल. प्रत्येक वळणावर, प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यांत जागरूकतेचा तेजस्वी प्रकाश होता. त्यांनी जणू त्या भूमीच्या सौंदर्याची देखभाल केली होती, जशी आई आपल्या लेकराची करते. त्यांचं अस्तित्व पाहून अभिमानाने छाती भरून आली. वाटलं ही माती फक्त फुलांनी नाही, तर इथल्या जवानांच्या रक्तानेही पावन झालेली आहे.
माझी इच्छा होती की एखाद्या जवानासोबत आठवण म्हणून एक फोटो काढावा आणि ती इच्छाही पूर्ण झाली. एक जवान आनंदाने तयार झाला. आज तो फोटो पाहताना डोळ्यांत अश्रू येतात. कारण आता त्या भूमीच्या बातम्या पाहवत नाहीत. त्या छायाचित्रांकडे पाहून अस्वस्थ वाटतं. पहलगाममध्ये पर्यटकांवर भ्याड हल्ला झाला आणि तेही नाव विचारून, हिंदू आहे की मुस्लीम याची खातरजमा करून? किती अमानवी आहे हे! मन सुन्न झालंय. वाटतंय, जणू पुन्हा एकदा ती भूमी रक्ताने माखली गेली. संताप उसळतोय. आपण अजून किती सहन करायचं? पुन्हा पुन्हा हे भ्याड हल्ले. आता पुरे झालं. आता कठोर निर्णय घ्यायची वेळ आली आहे. हा केवळ एक हल्ला नाही हा आपल्या देशाच्या मनावर झालेला घाव आहे. आपण प्रत्येक भारतीयाने आवाज उठवला पाहिजे, निषेधाचा, एकतेचा, आणि आपल्या जवानांच्या त्यागाच्या सन्मानाचा. काश्मीर हे खरंच स्वर्ग आहे आणि आपल्या जवानांनी तो स्वर्ग जपण्यासाठी निस्वार्थ सेवा दिलीय. आपण त्यांच्या त्यागाचा आदर करायला हवा. फक्त मेणबत्त्या लावून नाही, तर भ्याड विचारसरणीचा निषेध करून, सरकारवर दबाव आणून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी.
आज मी केवळ भावनिक नाही, तर मी संतप्त आहे. कारण मी नुकताच पाहिलेला स्वर्ग आता रक्ताने माखलेला आहे. म्हणूनच, हा माझा जाहीर, ठाम निषेध आहे अशा कृत्यांचा आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्या प्रत्येक सावलीचा. मला खात्री आहे आपले पंतप्रधान मोदीजी नक्कीच योग्य धडा शिकवतील, योग्य निर्णय घेतील.
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत सिंधू जल करार स्थगित केला.…
नवी दिल्ली : आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक मतदान ओळखपत्र, वाहन परवाना अन् पासपोर्ट एकाच…
इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे.…
माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांची माहिती कणकवली : तालुक्यातील करंजे येथे गोवर्धन गोशाळा उभारण्याचे…
पंचांग आज मीती वैशाख शुद्ध प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र भरणी. योग आयुष्यमान. चंद्र राशी…
नवी दिल्ली: भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे 22 एप्रिल…