Monday, April 28, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलमाझ्या दृष्टीतून सुखी माणूस

माझ्या दृष्टीतून सुखी माणूस

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ – शिल्पा अष्टमकर

सुख ही एक अशी भावना आहे जी प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळी असते. काहींसाठी सुख म्हणजे भरपूर संपत्ती, आलिशान घर, गाडी; तर काहींसाठी ते म्हणजे शांत जीवन, प्रेमळ नाती आणि आरोग्य.

“माझ्या दृष्टीतून सुखी माणूस” माझ्या दृष्टीने “जो माणूस सुखी वाटतो तो सुखी” असा या शब्दसमूहाचा अर्थ होता. नंतर विचार केला मग वेळोवेळी जशी माझी वृत्ती बदलेल तशी सुखी माणसेही वेळोवेळी बदलत जातील. धर्मराजाला जशी सर्वच माणसे सुष्ट वाटली आणि दुर्योधनाला जशी सर्वच माणसे दुष्ट वाटली, त्याचप्रमाणे मी सुखी असेल त्यावेळी मला माणसे सुखी वाटतील आणि मी दुःखी असेल त्यावेळी दुःखी वाटतील. पण त्यावरून खरा सुखी कोण अथवा दुःखी कोण या गोष्टींचा उलगडा होणार नाही. पण अशा तऱ्हेने विचारांची गुंतागुंत सोडवताना श्री समर्थ रामदासांची अमर काव्यपंक्ती आठवली.

“जगी सर्व सुखी असा कोण आहे?” संपूर्णतः सुखी माणूस जगात नाही हेच व्यावहारिक सत्य त्यांना मांडावयाचे आहे. पण सुखाचा शोध करणे ही मनुष्य मात्राची नैसर्गिक प्रवृत्तीच आहे. तिच्याविरुद्ध कसे जाणार? मग अशा रीतीने आपण जगाकडे पाहू लागलो की, आपल्या मनात विचार येतो, “खरे आहे …जगात सुख थोडे आहे पण ते कोणाला तरी मिळते आहेच.” मग हे सुख कोणाला मिळाले आहे हे पाहण्याकरिता मी आजूबाजूला नजर टाकून विचार केला, पुष्कळ वेळा आढळतात जगतानाही किरकिरत असणारी माणसे! यांची सुखाची कल्पना संकुचित आहे की व्यापक? ना. सी. फडके म्हणतात, “ज्यांची सुखाची कल्पना संकुचित असते ते मोठे नव्हेत.” म्हणजे मनाच्या संकुचित किंवा व्यापक वृत्तीवर सुख अवलंबून असते. साधूसंताना आयुष्यात सुख मिळाले याचे कारण त्यांच्या मनाची व्यापक वृत्ती. सर्वांभूती परमेश्वर पाहण्याच्या वृत्तीत पाखराने शेत खाल्ले म्हणून गुरुनानकांना खेद झाला नाही, खंत वाटली नाही. माणसांना सुख मिळविण्याच्या मार्गात आणखी एक अडथळा असतो व तो म्हणजे “भीती.” निर्भयता प्राप्त झाली की सुख मिळते. हा सुखाचा राजमार्ग ज्यांना सापडला ते धन्य होत. आधुनिक शोधांनी समृद्धी वाढली आहे पण सुख वाढले आहे का? सुख सोयींच्या साधनांबरोबर सुखाची समृद्धी झालेली का आढळून येत नाही? सुख हे मनाच्या समाधानी वृत्तीवर अवलंबून असते व मनाची समाधानी वृत्ती समृद्धीवर अवलंबून असते. सारांशत: म्हणावयाचे तर सुखी माणूस तो ज्याला या चार सत्याची जाणीव झाली.

१) मनाची वृत्ती संकुचित न ठेवता व्यापक केली की सुख मिळते.
२) प्रेम धर्माने भीती नष्ट होते व निर्भयतेतच सुख मिळते.
३) पराभूत मनोवृत्ती सोडून लढाऊ वृत्ती अवलंबिल्याने यश व सुख मिळते.
४) सुख उपभोगात नसते सुख त्यागात असते.

सुख हे बाह्य गोष्टींवर अवलंबून नसून अंत:करणातून येणारा अनुभव आहे.कोट्याधीश असूनही जर माणूस अस्वस्थ असेल, सतत चिंतेत असेल, तर तो सुखी कसा म्हणावा? याउलट एक साधा शेतकरी जेव्हा आपल्या कुटुंबासोबत जेवणाच्या वेळेस हसत-खेळत संवाद साधतो, तेव्हा तो देखील तितकाच सुखी असतो जितका एखादा श्रीमंत उद्योगपती. माझ्या मते, खऱ्या अर्थाने सुखी माणूस तोच, जो आपल्या प्राप्त परिस्थितीत समाधानी आहे, आणि त्याला आपल्या कुटुंबातील प्रेम, समाजातील सन्मान आणि आत्मिक शांतता लाभली आहे.

सुखी माणसाची काही लक्षणे अशी असतात :- तो नेहमी सकारात्मक विचार करतो. त्याला इतरांविषयी द्वेष नसतो.
तो स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतो. संकटातही तो धीर राखतो.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तो इतरांचेही जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करतो.
सुखासाठी स्पर्धा, मत्सर, लोभ हे मार्ग कधीच योग्य नाहीत. जेव्हा आपण आपल्या छोट्या-छोट्या गोष्टींतून समाधान शोधू लागतो, तेव्हाच आपले आयुष्य खरे सुखी होते.

सुख ही कोणत्याही दुकानात मिळणारी वस्तू नाही, ती मन: स्थिती आहे. ती निर्माण करावी लागते. “सुख शोधण्यात नाही, तर अनुभवण्यात आहे.” जो माणूस हा अनुभव समजून घेतो, तोच माझ्या दृष्टीने खरा सुखी माणूस आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -