नाले व कचरा सफाई ; केवळ कागदावरच नसावी

Share

पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत असली तरी खऱ्या अर्थांने सहा-सात जूननंतरच पाऊस बरसण्यास सुरुवात होते. पावसाळा सुरू झाल्यावर पथदिवे बंद पडलेले, रस्त्यात खड्डे पडलेले, गटारे-नाले तुंबलेले, रस्ते जलमय झालेले असे चित्र कोठेही निर्माण होऊ नये यासाठी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगर परिषदा या स्थानिक स्वराज्य संस्थांना एप्रिल आणि मे या दोन महिन्यांतच पावसाळीपूर्व कामांना गती द्यावी लागते. पावसाळीपूर्व कामांसाठी अर्थसंकल्पामध्ये विशेष निधीची तरतूद करण्यात येत असते. स्थानिक स्वराज्य संस्थांचे सभागृह अस्तित्वात असताना प्रशासन या कामांची यादी सादर करत असते व लोकप्रतिनिधी या कामांना मंजुरी देत असतात; परंतु कोरोना महामारीच्या साथीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्याच नसल्याने सर्वत्र प्रशासकीय राजवट असून प्रशासकाच्या मार्गदर्शनाखाली त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सध्या चालविला जात आहे. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प देशातील काही छोट्या राज्याहून मोठा आहे.

केवळ अर्थसंकल्पच नाही, तर महापालिका कार्यक्षेत्रात येणारी लोकसंख्याही कोटींच्या घरात आहे; परंतु मुंबई महापालिकेचा भूभाग तुलनेने कमी असून त्या कमी भूभागातच ही लोकसंख्या सामावलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हार्बरमार्गे मानखुर्दपर्यंत, मध्य रेल्वेने मुलुंडपर्यंत, पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते दहिसरपर्यंत तसेच कुलाबा याचा समावेश करून येणाऱ्या परिसरात मुंबई महापालिका सामावलेली आहे. मुंबई शहराची लोकसंख्या वाढत असताना व जलपुरवठा करणाऱ्या तलावांची संख्या तितकीच असताना व जलवहिन्या जुनाट असतानाही मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना कधीही करावा लागत नाही, याबाबत महापालिकेच्या कामगिरीला खरोखरीच ‘सलाम’च करावा लागेल. मुंबईतील नाले व गटारे पावसाळ्याचा अपवाद वगळता कोठेही तुंबलेले पाहावयास मिळत नाही. पथदिवे बंद दिसत नाही. मुसळधार पाऊस झाल्यास अथवा सोसाट्याचा वारा सुटला, तर फांद्या पडण्याच्या अथवा वृक्ष पडण्याच्या घटना घडत असतात. अन्यथा फारशा दुर्घटना घडत नाहीत. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये पावसाचे पाणी तुंबण्याचे अथवा परिसर जलमय होण्याचे प्रमाणही मंदावलेले आहे. प्रशासकीय राजवटीत मुंबई महापालिकेच्या कामाला काही प्रमाणात ‘शिस्त’ लागलेली आहे, असे म्हणणे देखील अतिशयोक्तीचे ठरणार नाही. जवळ आलेला पावसाळा पाहता पावसाळीपूर्व कामासाठी मुंबई महापालिका प्रशासन सतर्क झाले असून अधिकारी व कर्मचारी कामाला लागले आहेत. मुळातच नालेसफाई व गटाराची तळापासून स्वच्छता या दोन गोष्टी सांभाळल्यास मुंबईची तुंबई होण्याची पुनरावृत्ती होत नाही आणि अलीकडच्या काळात त्याचे प्रमाणही कमी झालेले आहे.

महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केल्याने अधिकारी व कर्मचारी त्या-त्या कामांना गती देऊ लागले आहेत. कंत्राटदारांचीही वेळेत कामे पूर्ण करून देण्यासाठी लगबग वाढली आहे. नाल्यातून काढलेला गाळ अनेकदा त्या ठिकाणी बरेच दिवस पडून असायचा, तो गाळ आणि कचरा वेळेत उचलला न गेल्यास कचरायुक्त गाळ रापण्यास सुरुवात होऊन त्या-त्या परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असतो. हे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिका आयुक्त गगरानी यांनी नालेसफाईतून काढलेला गाळ ४८ तासांमध्ये उचलण्याचे ठेकेदारांना निर्देश दिले आहे. हा कचरामिश्रीत गाळ वेळेवर उचलला गेल्यास मुंबईकरांची दुर्गंधीतून व बकालपणापासून मुक्तता होण्यास मदतच होणार आहे. मुंबईत गटारांची व नाल्यांची संख्या मोठी असल्याने गटारांची सफाई व नालेसफाई करण्याचे अग्निदिव्य महापालिका प्रशासनाला दरवर्षीच पार पाडावे लागत आहे. याशिवाय गटारे व नाले नागरी वस्तीतून, चाळींमधून वाहत असल्याने त्या ठिकाणी नालेसफाई करताना करावी लागणारे कामे हा एकप्रकारे ‘द्राविडी प्राणायम’ असतो, ही अतिशयोक्ती नसून वास्तविकता आहे.

रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यास सर्व कारभार ठप्प होतो, असा आजवरचा अनुभव आहे. रेल्वे रुळावर गुडघाभर पाणी साचले तरी रेल्वे सेवेचा खोळंबा होण्यास फारसा वेळ लागत नाही. अन्य भागांमध्ये असणाऱ्या नाल्यांमध्ये जेसीपी उतरवून सफाई करण्यात येते. गाळ व साचलेला कचरा काढणे शक्य होते. मात्र रेल्वे हद्दीमध्ये जेसीपीच्या माध्यमातून नालेसफाई अशक्य असल्याने मानवी हातानेच येथील नालेसफाई आजही करण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे हद्दीतील नालेसफाई तळापासूनच करण्यात यावी, असे निर्देशच महापालिका प्रशासनाकडून ठेकेदाराला देण्यात येतात व शहारातील सर्व नालेसफाई ३१ मेपूर्वीच करण्याचे बंधनही संबंधित ठेकेदाराला घालून देण्यात आलेले असते. पावसाळीपूर्व कामामध्ये नालेसफाईचा भाग महत्त्वाचा असून त्याखालोखाल रस्त्यांची डागडुजीला प्राधान्य देण्यात येत असते. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रस्त्यांची पाहणी करून डांबरीकरणाच्या कामाला गती देण्यात आलेली असते. रस्त्यात खड्डे निर्माण झाल्यास वाहतुकीला अडथळा होतो, पाणी साचून साथीच्या आजारांना निमत्रंण मिळते. रस्त्यांचे काम करूनही मुसळधार पावसामुळे रस्त्याची हानी झाल्यास भरपावसातही खड्डे बुजविले जातात, वेळ पडल्यास माती, सिमेंट टाकून पेव्हर ब्लॉकच्या आधारावर खड्ड्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यात येत असतो. त्यानंतर पालिका प्रशासन प्रभागाप्रभागातील वृक्षछाटणीला प्राधान्य दिले जाते.

ठिसूळ झालेल्या फांद्या अथवा मोडकळीस आलेले वृक्ष पडून जीवितहानी अथवा वाहनांचे अपघात होण्याची भीती असते. त्यापार्श्वभूमीवर वृक्षछाटणी करून अपघात होऊ नये याची काळजी घेतली जाते. पथदिवे खराब झाल्यास पावसाळ्यात गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. रात्रीच्या अंधारात वाटमारी, लुटमारी, विनयभंग, अत्याचार अशा घटना घडण्याची भीती असते. या घटना घडू नये म्हणून पथदिव्यांची दुरुस्ती तसेच अंधूक प्रकाशाची समस्या हटविली जाते. पावसाळीपूर्व कामे वेळेत केल्यावर सततच्या पावसामुळे पदपथावर शेवाळ साचून रहिवासी घसरण्याच्या घटना घडतात. त्यामुळे पावसाळ्यात पदपथावर ब्लिचिंग पावडर टाकण्याची मोहीम उघडली जाते. पावसाळी पूर्व कामाला प्रशासनाकडून गती देण्यात आलेली आहे. अजूनही ठिकठिकाणी नाल्यातच कचरा, गाळ दिसून येत आहे. सव्वा महिन्याच्या कालावधीत ही कामे पूर्ण करावयाची असल्याने प्रशासनदेखील ‘कामा’ला लागल्याचे मुंबई शहर व उपनगरातच पाहावयास मिळत आहे.

Recent Posts

कोकण रेल्वेच्या विनातिकीट प्रवाशांकडून २३ कोटीचा दंड वसूल

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कोकण रेल्वे प्रशासनाने मोठी मोहीम चालवली…

45 minutes ago

जास्तीत जास्त ४८ तासांत कापणी करुन शेत साफ करा, शेतकऱ्यांना BSF चा आदेश

नवी दिल्ली : पहलगाम अतिरेकी हल्ला झाल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत आहे. या…

2 hours ago

पहलगाममध्ये अतिरेक्यांना स्थानिकांनी केली मदत

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. नाव आणि धर्म…

2 hours ago

दुचाकीला धडकून विहिरीत पडली व्हॅन, सहा जणांचा मृत्यू

मंदसौर : भरधाव वेगाने जात असताना अनियंत्रित झालेली इको व्हॅन दुचाकीला धडकून विहिरीत पडली. या…

4 hours ago

Jalgaon Crime : सैराटची पुनरावृत्ती! प्रेम विवाह केल्याच्या रागात जन्मदाता उठला मुलगी अन् जावयाचा जीवावर

जळगाव : सैराट चित्रपटात (Sairat Movie) जसा पळून जाऊन प्रेमविवाह केलेल्या तरुणांवर प्राणघातक हल्ला होतो,…

4 hours ago

IPL 2025 : आयपीएलच्या सुरक्षेत वाढ; जाणून घ्या कारण

मुंबई : पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढतच चालला आहे. अशातच आता भारतात सुरू…

4 hours ago