रवींद्र तांबे
ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे जाऊ लागले आहेत. आपले ठीक आहे, आपण गावामध्ये कामधंदा करून कसे बसे कुटुंबाचा सांभाळ करेन ही मनाची तयारी. मात्र सध्या गावात कामधंदा सुद्धा नाही. मग उद्या मुलांचा उदरनिर्वाह कसा होणार यासाठी गावातील घर बंद करून ज्या शहरात नातेवाईक असतील त्यांच्या बरोबर जाऊन त्यांच्या जवळ काम मिळेपर्यंत राहायचे. काम मिळाल्यानंतर त्यांच्याच पुढाकाराने भाड्याच्या घरात राहून पगार बऱ्यापैकी असेल, तर एखाद्या चाळीत छोटीशी कर्ज काढून खोली घेणे. जेणे करून भाडे देण्यापेक्षा काही वर्षाने स्वत:च्या मालकीची खोली होईल. असे अनेकांनी केले आहे या गोष्टीला मी पण अपवाद नाही.
तेव्हा कामानिमित्त ग्रामीण भागातून कोणत्याही शहरात जाणे किंवा राहणे हे अलीकडच्या काळात वाढत आहे. तसेच मुलांना चांगल्या पगाराची नोकरी लागायची असेल तर केवळ मराठी येणे पुरेसे नाही, तर त्याला इंग्रजी लिहिता, वाचता व बोलता येणे गरजेचे आहे. यासाठी नागरिक मुलांच्या शिक्षणासाठी शहरात जात आहेत. तेव्हा काही वेळा दोन्ही बाजूने संसार चालविणे कठीण होऊन बसते. त्यामुळे गावी जी माणसे असतात त्यांना सुद्धा घेऊन आपल्या सोबत ठेवतात. यासाठी त्यांना गावचे घर बंद ठेवावे लागते. काही लोक शेजाऱ्याकडे घराची चावी ठेवतात आणि त्याला सांगतात, अधून मधून घराची साफसफाई कर तुला वरखर्चासाठी पाठवतो, तर काही आपल्या जवळच्या नातेवाईकाला घराची साफसफाई करायला सांगतात.
असे असले तरी बंद घर ते बंदच म्हणावे लागते. त्यासाठी घराचे दरवाजे, खिडक्या दिवसभर उघडून ठेवावे लागतात. घराची झाडलोट करावी लागते. घर शेणाने सारवून घ्यायचे आणि घरासमोर खळे करावे लागेल म्हणजे घर कसे लखलखीत दिसते. आजच्या सिमेंटच्या बंगल्यापेक्षा पाश्यांनी घर शेणांनी सारवणे, त्यावर कणे काढणे व भिंतीला गिलावा काढल्यामुळे घर देखणे दिसते. माझ्या गावात मी लहान असताना काही जण भिंतीला गिलावा काढण्यासाठी बिडवाडी गावातून माती घेऊन यायचे. कारण मातीच्या भिंती आणि घराच्या छतावर नळे किंवा कवले असल्याने घरात खेळती हवा त्यामुळे अशा घरात फॅनची गरज भासत नाही.
माझ्या आयनल गावामध्ये दळवीकाकी आणि भोगलेकाकी माझ्या आयेच्या जीवलग मैतरणी होत्या. त्या गावी आल्यावर न विसरता दुसऱ्या दिवशी आमच्या घरी यायच्या आणि म्हणायच्या कोतवालीन बाय, काल दार उघडून घरात गेलय मात्र घर खाऊक इला. आता जरा माणसात इला. खळा पण आता तोरसकरणीक सारख्या करून सारवून घेऊक सांगलय. ही तुला मुंबईची च्याय पावडर आणलय अशी दळवी काकी आयेक सांगायची, तर भोगले काकी पिशवीतून हळूच बिस्किटचो पुडो काढून आयेच्या हातात द्यायची. त्यावेळी मी आयेच्या पदराक धरून उभो असायचो. असे प्रत्येकाचे प्रेम आपल्या गावच्या घरावर व माणसांवर असते.
शहरातून घरी आल्यावर घरात जाण्यापूर्वी घराच्या पायरीला नतमस्तक होतात. तुला सोडून गेलय, वर्षान परत इलय, माझा चुकला माकला असात, तर क्षमा कर..! नंतर शेजारची काकी तांब्या भरून पाणी घेऊन येथली ते पाणी घटाघटा पितात आणि नंतर म्हणतात, आता जीव कसो थंड झालो. म्हणजे शहरातील आयस्क्रीमपेक्षा गावातील विहिरीच्या पाण्याला गोडवा तसा थंडावाही आहे. तेव्हा कामानिमित्ताने गेलेले चाकरमानी न विसरता एप्रिल-मे महिन्यामध्ये आपल्या गावी येतात. बंद असलेले घर स्वत: उघडतात. पंधरा ते वीस दिवस गावी राहून पुन्हा आपल्या रोजीरोटीसाठी शहरात जातात. जशी मुलांची परीक्षा संपत आहे तसे एक एक चाकरमानी आपल्या कुटुंबीयांसोबत गावी येत आहेत. तेव्हा वर्षभर बंद असणारी घरे आता मोकळा श्वास घेऊ लागली आहेत. काही जरी झाले तरी पंधरा दिवस सोडा दोन दिवस का असेना आपल्या गावी घरदार साफ करून चाकरमानी जात असतात.
आता मात्र चाकरमानी गावी आल्याने वस्तीतली रहदारी वाढली आहे. वाडीतल्या पायवाटांची सुद्धा चाकरमान्यांनी साफसफाई केली आहे. बंद घरे जरी आता मोकळा श्वास घेऊ लागली असली तरी रात्रीची अंधारात असणारी घरे प्रकाशमान दिसत आहेत. घराच्या परिसरात पातेरा साचलेला होता तो वाफ्यात नेऊन टाकल्यामुळे घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ दिसत आहे.
अशा मोकळ्या जागी संध्याकाळच्या वेळी वाडीतील व चाकरमानी मंडळी चटईवर बसून गप्पागोष्टी करीत आहेत. त्यात कोणाचे आंबे पिकले, कोणाचे फणस लागले, कोणाच्या पोराचा लगीन ठरला अशा चौकशा रंगू लागल्या आहेत. त्यात उद्या कोणत्या बाजाराला जायचे. कोकणात चाकरमानी गावी आल्यावर बाजाराला जाताना घरातील व वाडीतील मुलांना बाजाराला घेऊन जाणार हे मात्र नक्की. इतका प्रेमी कोकणातील चाकरमानी असतात. कोण बाजारात भेटल्यास भजी आणि चहा त्याला न चुकता देणार. कोण आजारी पडल्यास दोनशे रुपयांची नोट द्यायला मागे येणार नाही. तितकीच काळजी आपल्या बंद घराची गावी असेपर्यंत घेत असतात. तेव्हा कितीही काहीही झाले तरी न चुकता चाकरमानी एप्रिल-मे महिन्यामध्ये आपल्या गावी येतात. तेव्हा वर्षभर बंद असणाऱ्या घराची दारे, खिडक्या उघडल्यामुळे व साफसफाई केल्याने आता बंद घरे मोकळा श्वास घेऊ लागली आहेत.