Friday, April 25, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखमानसिकता समजून घ्यावी लागेल!

मानसिकता समजून घ्यावी लागेल!

रवींद्र मुळे: अहिल्या नगर

काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला आहे. ज्यांच्या कुटुंबातले लोक या हल्ल्यात मारले गेले त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश कानात सर्वांच्या घुमतो आहे. क्रूरकर्म्यांचे ते क्रूर कृत्य लोकांच्या डोळ्यांसमोरून अजूनही जात नाही अशी स्थिती आहे.

गेला संपूर्ण आठवडा मूर्शताबाद आणि बंगालमधील मुस्लीम बहुल ठिकाणी तसेच अन्य सर्वत्र वक्फ बोर्डाच्या नवीन कायद्यासंदर्भात झालेली निदर्शने आणि त्या निमित्ताने झालेली आंदोलने, हिंदूंवर झालेले अत्याचार याने हिंदू जनमानस ढवळून निघाला होता. आणि आता ही घटना घडली आहे. समाज क्षुब्ध होत आहे. सरकारकडे कडक कारवाईच्या मागण्या होत आहेत. मोर्चे निघत आहेत. पाकिस्तान विरुद्धच्या घोषणा होत आहेत. नेहमीप्रमाणे राजकारणी गिधाडे या सगळ्या प्रसंगात ही आपली गिधाडी वृत्ती न सोडता सरकारवर आरोप करीत आहेत .

रॉबर्ट वडेरा हिंदुत्वाला दोष देत आहे. उबाठा गटाचे प्रवक्ते आणि तमाम उबाठा गँग भाजपाने धर्मावर आधारित भांडणे लावल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप करून आपला नालायकपणा सिद्ध करत आहे. फारुख अब्दुल्ला पाकिस्तानी लोकांनी बांगड्या भरलेल्या नाहीत अशी दर्पोक्ती करण्याची हिंमत करतो आहे आणि भारतातील या सगळ्या घडामोडींकडे बघून पाकिस्तानी राक्षस मनोमन हसतो आहे.

मोहम्मद बिन कासीम, गझनी मोहम्मद, मोहम्मद घोरी, तुघलक, खिलजी, बाबर, औरंगजेब, अफझल खान या आक्रमकांच्या अत्याचारांच्या कहाण्या पुन्हा जागृत होणारे हत्याकांड काल घडले. दहशतवादीवृत्तीला धर्म नसतो हे लिब्रांडू, डावे, तथाकथित सेक्युलरिस्ट यांच्या आवडत्या वाक्याला छाती ठोकून या दहशतवाद्यांनी धर्म विचारत, कलमा वाचायला लावून, सुंता झाली नाही याची खात्री करत निष्पाप लोकांना गोळ्या घातल्या आणि सिद्ध केले आमच्या दहशतवादाचा धर्म कोणता आहे ते. हिंदू समाज ही मानसिकता न समजल्यामुळे पारतंत्र्यात गेला. काही काळ गुलाम बनला. खंडित झाला.

स्वतंत्र झाल्यावर आजही ७५ वर्षांनी आतंकी छायेतून स्वतःला बाहेर काढू शकलेला नाही. राजकारण्यांनी ही मानसिकता जाणूनबुजून मतांच्यासाठी दुर्लक्षित केली. प्रशासकीय व्यवस्थेतील इंग्रज छाप बाबूंनी या मानसिकतेला जिवंत ठेवले. मुल्ला, मौलवी यांनी स्वतंत्र भारतात ही मानसिकता आणखी प्रज्वलित केली. परिणाम काश्मीर ते सर्वत्र भारतमाता रक्तबंबाळ होत चालली आहे. ही मानसिकता समजून घेण्यासाठी काफीर, गझवा ए हिंद, दार उल अरब, दार उल इस्लाम, जिहाद या संकल्पना ज्या मदरशांमधून शिकवल्या जातात आणि त्यातून रॅडिकल इस्लामी आतंकवादी जन्म घेतात या संकल्पना हिंदू समाजाला समजणे गरजेचे आहे. राजकारण्यांनी कुठल्याही पक्षाचे असेना आपल्या भावी पिढ्यांच्यासाठी का होईना याचा जमिनीवरील परिणाम मतांच्या लालसेतून बाहेर येत समजून घेतला पाहिजे . भाषिक अस्मिता, प्रांतिक अहंकार, जातीय दुराभिमान ज्यामुळे हा हिंदू समाज एकसंध होत नाही त्या वृथा गोष्टींचे अंकुर, काटे छाटून टाकले पाहिजेत कारण यापेक्षा वर उल्लेख केलेल्या संकल्पना उद्या तुमच्या घराचे दरवाजे तोडून कधी आत घुसतील ते कळणार पण नाही. पश्चाताप त्यावेळी करण्यापेक्षा हिंदूंनो वेळीच सावरा आणि संघटित व्हा.

या रॅडिकल, एकेश्वरवादी विचारांनी संपूर्ण जगाची शांतता बिघडवली आहे. जर्मनी, फ्रान्स, इटली, ब्रिटन, सगळे देश आज होरपळून निघत आहेत. स्वस्त मजूर मिळतात या मोहातून आणि उदार मानसिकता यातून केलेल्या चुकांमुळे त्यांना आज पश्चात्ताप होत आहे. सर्वत्र लोकसंख्येचे असंतुलन घुसखोरी आणि अमर्यादित प्रजनन या दोन मार्गांतून साधले जात आहे. संपूर्ण जग ज्वालामुखीच्या तोंडावर उभे आहे. ईश्वराने निर्माण केलेल्या मनुष्य या सर्वोच्च सुंदर निर्मितीला नष्ट करत आणि त्यातून निर्माण झालेल्या उज्ज्वल मानवी मूल्यांना पायदळी तुडवत खैबर खिंडीतून आलेल्या या वावटळीला कोणे एके काळी पृथ्वीराज चौहान, राणा सांग, राजा दाहीर, राणा प्रताप, गुरू गोविंद सिंग, राजा रणजीत सिंग, लाचित बड फुकान आणि अर्थात आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रोखून धरल्यामुळे जगातील मानवता अजूनही टिकून आहे.

छत्रपती शिवरायांनी ही मानसिकता ओळखली होती म्हणून प्रतापराव गुजर यांना त्यांनी दूषणे दिली. त्यांनी ही मानसिकता ओळखली होती म्हणून अफजलखान याचा वध झाला, शाहिस्तेखानाची बोटे गेली. हिंदू साम्राज्याची पुन्हा निर्मिती झाली. आमच्या आजूबाजूला असणाऱ्या आणि काळाच्या ओघात मुस्लीम झालेल्या मंडळीनी मुल्ला मौलवी यांचा पगडा झुगारून दिला नाही. हिंदूंच्या भावभावना समजून घेतल्या नाहीत, तर येणाऱ्या काळात संघर्ष अटळ आहे. ही लढाई एकेश्वर वाद आणि एकम् सत् विप्रा: बहुदा वदंती यातील आहे. जर हिंदू समाजाने ही मानसिकता समजून घेतली, तर या लढाईत हिंदू टिकाव धरू शकेल अन्यथा काय होईल हे सांगता येत नाही. कुठल्याही सरकारवर, पक्षावर, संघटनेवर आपले भविष्य सोपवून तात्कालिक मोर्चे काढून, स्मशान वैराग्य आणून हा प्रश्न सुटणार नाही. पाकिस्तान हा एक देश किंवा भूभाग नाही ती वृत्ती आहे. अखंड भारतात ती वृत्ती सर सय्यद अहमदखान याने जिवंत केली. मोहम्मद जीनाने त्यात अजून हवा भरली. परिणाम हिंदूंचा संहार. खिलाफत चळवळ परिणाम हिंदूंचा संहार. बांगला देशात सत्तांतर परिणाम हिंदूंचा संहार.

मंदिरे लक्ष्य करणे, स्त्रियांना बाटवणे आणि हिंदूंना अपमानित करण्याची एकही संधी न सोडणे यातून जे घडत आले त्यातील एक घटना पहलगाममधली आहे. पुढील रमझान येईल तेव्हा काश्मीर आपल्या ताब्यात असेल, असे उद्गार काढणारा अतिरेकी संघटनेचा सरदार आणि पाकिस्तान नेमके का निर्माण झाले हे छातीठोकपणे सांगणारा पाकिस्तानचा आर्मी चीफ सगळ्यांचे लक्ष एकच आहे. हिंदू म्हणणारे सर्व संपवणे. मग त्यात बौद्ध, जैन, शीख, आस्तिक, नास्तिक सर्व आले. कुणीही सुटणार नाही. हे लिहिण्यामागे प्रस्तुत लेखकाचे समाजाला भयभीत करण्याचा उद्देश बिलकुल नाही. भारतातील मुस्लिमांनी इंडोनेशियाचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून कट्टरता वाद नाकारला पाहिजे. यातच त्यांचे भले आहेच पण जागतिक शांततेसाठी ते आवश्यक आहे. हिंदू तत्त्व हे मूर्ती पूजा मानणारच.

हिंदू देव देवतांच्या हातात शस्त्र आहेत ते शांती प्रस्थापित करण्यासाठी. उच्च मानवी मूल्ये जिवंत ठेवण्यासाठी. पहलगाम घटना हा दोन्ही बाजूने धोक्याची घंटा आहे. ममता, मुलायम, लालू, राहुल, प्रियांका आणि अलीकडे या कंपूत सामील ठाकरे पिलावळ काळाच्या ओघात अस्तित्वहीन होणार आहेत, पण तोपर्यंत जे नुकसान सहन करावे लागणार आहे ते कालच्या घटनेने अधोरेखित झाले आहे. पहलगाम घटनेतून हिंदू समाज जागृत होऊन त्याला शत्रूबोध कळाला आणि आपली राजकीय शक्ती वाढवण्यासाठी तो अधिक संघटित झाला तरच ज्यांनी आज हे समर्पण केले ते कारणी लागेल, अन्यथा अतिरेकी कारवाईतील आणखी एक घटना म्हणून ही घटना इतिहास जमा होईल. एव्हढाच कालच्या सुन्न, दाहक घटनेचा अन्वयार्थ म्हणावा लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -