पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. हा अतिरेकी हल्ला करण्यासाठी सशस्त्र अतिरेकी आले कुठुन आणि कसे हा प्रश्न अनेकांना पडला आहे. सुरक्षा पथकांनी आतापर्यंत तीन अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. अतिरेक्यांचा शोध सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामजवळील बैसरन व्हॅली येथे भोवताली लहान मोठ्या टेकड्या आहेत. मागे काही किलोमीटर अंतरावर पर्वत आहेत. या भागात टेकडीत काही ठिकाणी गुहा आहेत. या गुहांपैकी एखाद्या गुहेत अतिरेकी लपले होते. या अतिरेक्यांना स्थानिक पातळीवर मदत मिळाली. यामुळेच अतिरेकी दीर्घ काळ शस्त्रांचे आणि स्वतःचे अस्तित्व लपवून पर्यटकांची वाट बघत लपून राहू शकले. ही बाब लक्षात येताच जम्मू काश्मीर पोलिसांनी १५०० पेक्षा जास्त संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संशयितांची कसून चौकशी सुरू आहे.
टेकड्यांमध्ये अनेक नैसर्गिक आणि निवडक मानव निर्मित गुहा आहेत. या गुहांमध्ये लपून राहणे शक्य आहे. स्थानिक पातळीवर अन्न – पाणी, औषधे, शस्त्रे, कपडे अशा स्वरुपाची मदत मिळाल्यास गुहेत दीर्घकाळ लपणे आणि थेट कारवाईच्यावेळी बाहेर येणे शक्य आहे. अतिरेक्यांनी स्थानिक पातळीवरील पैशांसाठी फितूर झालेल्यांची मदत घेऊनच पहलगाम हल्ला केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
फितूर शोधण्यासाठी गुप्तचर यंत्रणा, स्थानिक खबरी नेटवर्क यांची मदत सुरक्षा यंत्रणा घेत आहेत. संशयितांच्या आर्थिक व्यवहारांची आणि फोन रेकॉर्डची तपासणी केली जात असल्याचे सूत्रांकडून समजते. जम्मू काश्मीर पोलिसांनी तीन अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. अतिरेक्यांविषयी ठोस माहिती देणाऱ्या व्यक्तीला वीस लाख रुपयांचे बक्षिस दिले जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे. अतिरेकी हल्ला झाला त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी दिलेल्या माहितीआधारे पोलिसांच्या कलाकाराने रेखाचित्र काढली आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी दिलेली माहिती आणि पोलीस चौकशीतून हाती आलेली माहिती याची पडताळणी करुन पोलिसांनी तीन अतिरेक्यांची रेखाचित्र त्यांच्या नाव आणि पत्त्यासह प्रसिद्ध केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिल हुसेन ठोकर (रा. अनंतनाग), अली भाई उर्फ तल्हा भाई, हाशिम मुसा उर्फ सुलेमान या तीन अतिरेक्यांची रेखाचित्र प्रसिद्ध केली आहेत. ही तीन रेखाचित्रे प्रसिद्ध केली असली तरी आणखी काही अतिरेकी स्थानिक मदतनीस म्हणून सहभागी झाले होते. यात त्राल येथील आसिफ शेख हा एक अतिरेकी होता.
पहलगाम हल्ला प्रकरणातील एका अतिरेक्याचे घर स्फोटकांनी उडवले आणि दुसऱ्याचे घर बुलडोझरने पाडले
सुरक्षा पथकांना आदिल आणि आसिफ शेख या दोघांची घरे जम्मू काश्मीरमध्येच असल्याचे कळले. ही माहिती मिळताच सुरक्षा पथकांनी या घरांवर धाड टाकली. एका अतिरेक्याच्या घरात आयईडी आढळला. यानंतर बॉम्ब शोधक पथकाला बोलावण्यात आले. या पथकाने आयईडी न हलवता तिथेच स्फोट करुन नष्ट करणे हाच पर्याय उपलब्ध असल्याचे सांगितले. यानंतर आवश्यक ती खबरदारी घेऊन स्फोट करण्यात आला. अतिरेक्याचे घर आयईडी स्फोटात नष्ट झाले. यानंतर दुसऱ्या अतिरेक्याच्या घरावर बुलडोझर फिरवून ते घर पाडण्यात आले. दोन्ही घरे नष्ट झाली आहेत. पण अद्याप अतिरेकी सापडलेले नाहीत. या अतिरेक्यांचा शोध सुरू आहे. आदिलचे बिजबेहारातील गुरी येथील घर बुलडोझरने पाडण्यात आले. तसेच अतिरेकी आसिफ शेखचे घर स्फोटकांनी नष्ट करण्यात आले.
भारताने दिला पहिला दणका, लष्कर – ए – तोयबाच्या कमांडर अल्ताफ लल्लीचा खात्मा
लष्कर – ए – तोयबाच्या कमांडर अल्ताफ लल्लीचा खात्मा
ठोस माहिती मिळताच बांदीपोरात घेराव घालून भारताच्या सुरक्षा पथकांनी लष्कर – ए – तोयबा या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनेचा स्वयंघोषीत कमांडर अल्ताफ लल्ली याला ठार केले. जम्मू काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने संयुक्त मोहीम राबवून जवानांनी लष्कर – ए – तोयबाच्या कमांडर अल्ताफ लल्लीचा खात्मा केला.